ग्राहक
संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज
चाळीसगाव दि. 15 (उमाका वृत्तसेवा) : जागृत ग्राहक,
तत्पर संघटना, प्रामाणिक दुकानदार व गतीमान प्रशासन यांनी ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी
तत्परता दाखवून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन केल्यास समाज समर्पित अशा जागृत ग्राहक
निर्मीतीसाठी वेळ लागणार नाही असे प्रतिपादन
आज अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे यांनी केले.
जागतिक ग्राहक दिनानिमीत्त ग्राहक प्रबोधनासाठी
तहसिल कार्यालयामार्फत तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत
होते. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उमंग समाजशिल्पी महिला
परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी
बाबासाहेब चंद्रात्रे, ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, सर्पमित्र राजेश ठोंबरे, आनंदा साळुंखे,
विकास वाणी, विवेक चौधरी, अरुण पाटील, विजया पवार यांच्यासह तहसिलदार कैलास देवरे,
विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, तालुका कृषी अधिकारी राजपुत, वैध मापन शास्त्र कार्यालयाचे संजय देशपांडे,
निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, जी.ई.भालेराव, संदेश निकुंभ, यांच्यासह
तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला ग्राहकांचे फसव्या जाहिरातींमुळे
फसवणूकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने त्यांना घराबाहेरील व्यवहारासाठी वंचित रहावे लागते.
यासाठी महिलांना स्वावलंबनाचे धडे देतांना जागृत महिला ग्राहक निर्मीतीकरिता त्यांना
प्रबोधन देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयेाजन करणे गरजेचे असल्याचे उमंग समाजशिल्पी
महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यावेळी म्हणाल्या.
माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती
होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण
कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तहसिलदार कैलास देवरे
यांनी आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या
कार्यक्रमात केले. यावेळी ते म्हणाले ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी जनजागृती
करण्यासाठी शासकीय यंत्रणा तत्पर असून यात ग्राहकांचा सहभागही महत्वाचा असल्याचे
ते यावेळी म्हणाले. ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर, 1986 साली पारित झाला असून
ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक
जिल्हयात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग
करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे
गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी बाबासाहेब चंद्रात्रे
म्हणाले की, अर्थ व्यवस्थेत ग्राहकाचे स्थान महत्वाचे असूनही त्यांचे
अस्तित्व ओळखण्यास कोणी तयार नाही. महागाई, फसवणूक या भडकत्या ज्वालांमध्ये तो रोज
होरपळून निघत आहे. ग्राहक हे आमचे माय-बाप आहेत असे म्हणतच या ग्राहकांचे प्रत्येक
व्यवहारात शोषण होत आहे. ग्राहकांचे मोठया प्रमाणावरील अज्ञान, उदासीन वृत्ती,
त्याचे असंघटीत स्वरुप यामुळे विक्रीव्यवहारात संघटित व्यापारी वर्गाच्या पुढे हा
ग्राहक दुबळा होत आहे. मी स्वत: व्यापारी वर्गात असूनही या विषयावर स्पष्टोक्ती
देतांना मला अभिमान वाटतो कारण ग्राहकांचे प्रबोधन होऊन त्यांना न्याय मिळण्यातच
मी धन्यता मानतो असे श्री.चंद्रात्रे यावेळी म्हणाले.
ग्राहकांच्या
न्याय व हक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदैव तत्पर आहे. परंतु ग्राहकांमधील
उदासिनता व प्रबोधनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदसय् तथा ग्रंथमित्र आण्णा धुमाळ यावेळी म्हणाले. प्रत्येक
ग्राहकाने ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब केल्यास ग्राहक राजा हे ब्रिदवाक्य
चिरकाल टिकविण्यासाठी नक्कीच मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी
तालुका प्रशासनातील विविध विभाग प्रमुखांनी त्यांची भुमीका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदेश निकुंभ यांनी केले तर आभार नायब तहसिलदार विशाल
सोनवणे यांनी मानले.
* * * * * *
* *
No comments:
Post a Comment