Tuesday, 14 March 2017

चाळीसगांव पंचायत समितीच्या सभापती/उपसभापती पदाची निवड प्रक्रीया संपन्न

चाळीसगांव पंचायत समितीच्या
सभापती/उपसभापती पदाची निवड प्रक्रीया संपन्न
             
       चाळीसगाव दि. 14 (उमाका वृत्तसेवा) :  पंचायत समिती, चाळीसगांव सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने  सभापती व उपसभापतीच्या निवड प्रक्रियेसाठी आज पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पिठासीन अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी कामकाज पाहिले.
            यावेळी एकूण 14 गणातील विजयी उमेदवार (सदस्य) उपस्थित होते. सकाळी 11:00 ते 01:00 यावेळेत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. सभापती पदासाठी सौ.स्मितल दिनेश बोरसे (बहाळ-गण), सौ.लता बाजीराव दौंड (पिपरखेड-गण) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले तर उपसभापती पदासाठी  श्री.संजय भास्कर पाटील (पातोंडा-गण) व सौ.सुनिता जिभाऊ पाटील (रांजणगांव-गण) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.
            माघारीसाठी दिलेल्या मुदतीत कुणीही माघार न घेतल्यामुळे 03:30 मिनीटांनी सदस्यांनी हात उंचाऊन मतदान करण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये वर्णमालीकेनुसार उमेदवाराचा क्रम निश्चित करुन सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सौ.स्मितल बोरसे यांना सात मते तर सौ.लता दौंड यांना सहा मते मिळाल्याने सभापती पदासाठी सौ.स्मितल दिनेश बोरसे (पक्ष-भाजपा) यांना सर्वाधिक मते मिळाल्याने विजयी घोषीत करण्यात आले.

              उपसभापती पदासाठी श्री.संजय भास्कर पाटील यांना सात मते तर सौ.सुनिता जिभाऊ पाटील यांना सहा मते मिळाल्याने उपसभापती पदासाठी श्री.संजय भास्कर पाटील (पक्ष-भाजपा) यांना सर्वाधिक मते मिळाल्याने विजयी घोषीत करण्यात आले.

            यावेळी गट विकास अधिकारी मधुकर वाघ, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ तसेच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
                                                        * * * * * * * *

No comments:

Post a Comment