Sunday, 19 February 2017

पाटण्यात साकारणाऱ्या गणीत नगरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थळ निरीक्षण


पाटण्यात साकारणाऱ्या गणीत नगरीचे
जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थळ निरीक्षण

       चाळीसगाव दि. 19 (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील पाटणादेवी येथे साकारण्यात येणाऱ्या गणित नगरीचे स्थळ निरीक्षण आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले. त्यांच्या समवेत उप विभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, पाटण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड, प्रा.लक्ष्मीकांत पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, यांच्यासह भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सार्वजानिक बांधकाम, महावितरण आदि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी गौताळा औट्रमघाट अभयारण्याच्या प्रवेशव्दारापासून तर परिसरातील वन विभागामार्फत यापुर्वी उभारण्यात आलेल्या सर्व वास्तुंची पहाणी करत त्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना केल्या. मुख्य प्रवेशव्दारापासून साकारण्यात येणारा रस्ता, पथीकाश्रम, डॉरमेट्री  हॉल, नियोजीत भास्कराचार्य माहिती केंद्राची जागा,  ग्रंथालय,  हत्ती बंगला, आकाश निरीक्षणाची जागा, लिलावती उद्यान, ॲम्पीथिएटर,  वॉच टॉवर, कन्हेरगड आदि भागाची पहाणी देखील त्यांनी केली. याच परिसरातील पाटणादेवी या धार्मीक स्थळाला भेट देऊन भावीकांसाठी असलेल्या सोयीसुविधांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. मधील उद्योगांचीही केली पहाणी
चाळीगावातील एम.आय.डी.सी. मध्ये उभारण्यात आलेल्या मोठ्या उद्योगातील भारत वायर व अंबुजा स्टार्च फॅक्टरीच्या कामकाजाची माहिती देखील जिल्हाधिकारी श्रीमती. अग्रवाल यांनी जाणून घेतली. शहरातील एम.आय.डी.सी. मध्ये उभारण्यात आलेल्या व येणाऱ्या बड्या उद्योगामुळे तालुक्यात रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक प्रशासनाने एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून अशा उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सुचना केल्या तर गिरणा डॅम मधून या उद्योगांना पाण्याची व्यवस्थाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी  भारत वायर रोप्स, लि.चे मुख्याधिकारी जयंता पटल यांच्यासह संजीव रॉय, आर.के.जैन, आशिष ठाकूर यांनी माहिती देतांना सांगितले की, एप्रिल-2015 मध्ये 700 कोटीचा हा मोठा उद्योग चाळीसगांव तालुक्यात उभारण्यात आला असून 750 इतक्या मनुष्यबळाचा या ठिकाणी वापर करण्यात येतो, तर या कंपनीचे डिसेंबर-2016 पासून उत्पादन सुरु करण्यात आले असून उद्योग उभारणीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य केल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहलिदार कैलास देवरे, एम.आय.डी.सी. चे कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, मंडळ अधिकारी संदेश निकुंभ, अमृतकार, कुलकर्णी यांच्यासह भारत वायर रोप्‍स लि. चे कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* * * * * * *

No comments:

Post a Comment