Wednesday, 15 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा : प्रातांधिकारी शरद पवार


जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत
मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा
                                                : प्रातांधिकारी शरद पवार

चाळीसगांव,दिनांक 15 :-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून तालुक्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा निर्भयपणे हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
            जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत चाळीसगांव तालुक्यातील 7 गटातून 24 तर 14 गणातून 51 उमेदवार उभे आहेत. या निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी भयमुक्त  वातावरणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
            चाळीसगाव तालुक्यात एकूण 257 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर 7 कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत. तालुक्यातून 2 लाख 46 हजार 247 मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 1 लाख 31 हजार 532 तर महिला मतदार 1 लाख 14 हजार 715 अशी आहे. यासाठी 257 मतदान केद्रांची रचना करुन मतदान यंत्राची तपासणी व सिलिंग झाले आहे. तर याची चाचणी देखील प्रशासनामार्फत घेण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 4 मतदान अधिकारी, 1 शिपाई व 1 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. दरम्यान सर्व मतदान केंद्रावर क्रमांक टाकण्याची कार्यवाही देखील पूर्ण झाल्याचे प्रातांधिकारी श्री.पवार यांनी कळविले आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी फौजफाटा तैनात
            मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील तर सहाय्यक प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उप निरीक्षक, 261 पोलीस कर्मचारी, 95 गृहरक्षक (होमगार्ड), 1 एस.आर.पी.सेक्शन, 1 आर.सी.पी.सेक्शन असा फौजफाटा तैनात करण्यात आला असून तालुक्यातील सर्व मतदारांनी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात आपला अनमोल असा मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील व पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment