Thursday, 23 February 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती चाळीसगाव सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल जाहिर

जिल्हा परिषद, पंचायत समिती चाळीसगाव
सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल जाहिर
             
       चाळीसगाव दि. 23 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील 7 गटांसह  14 गणांसाठी दिनांक 16 फेब्रुवारी, 2017 रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल आज दिनांक 23 फेब्रुवारी, 2017 रोजी जाहिर करण्यात आला. शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड चाळीसगांव येथे सकाळी 10:00 वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी जाहिर केला.
            या मतमोजणीच्या अनुषंगाने गट व गणनिहाय निकाल खालील प्रमाणे
तालुक्यातील एकूण 7 गटांमधील विजयी उमेदवार
1.  गट क्रं. 61 (बहाळ-कळमडू) – श्री.साळुंखे शशीकांत भास्करराव – राष्ट्रवादी काँग्रेस
2.  गट क्रं. 62 (दहिवद-मेहुणबारे) – श्रीमती भिल मोहिनी अनिल – भारतीय जनता पार्टी
3.  गट क्रं. 63 (सायगांव-उंबरखेड) – श्री.भुषण काशिनाथ पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
4.  गट क्रं. 64 (करगांव-टाकळी) – श्रीमती जाधव मंगलाबाई भाऊसाहेब – भारतीय जनता पार्टी
5.  गट क्रं. 65 (पातोंडा-वाघळी) – श्री.भोळे पोपट एकनाथ – भारतीय जनता पार्टी
6.  गट क्रं. 66 (रांजणगांव-पिपरखेड) – श्रीमती चव्हाण सुनंदा सिताराम – राष्ट्रवादी काँग्रेस
7.  गट क्रं. 67 (तळेगांव-देवळी) – श्री.देशमुख अतुल अनिलदादा – राष्ट्रवादी काँग्रेस
तालुक्यातील एकूण 14 गणांमधील विजयी उमेदवार
1.  गण क्रं. 121 (कळमडू) – श्री.केदार भाऊसाहेब चिंतामण – राष्ट्रवादी काँग्रेस
2.  गण क्रं. 122 (बहाळ) – श्रीमती बोरसे स्मितल दिनेश – भारतीय जनता पार्टी
3.  गण क्रं. 123 (दहिवद) – श्री.निकम कैलास चिंतामण – भारतीय जनता पार्टी
4.  गण क्रं. 124 (मेहुणबारे) – श्रीमती साळुंखे रुपाली पियुष – भारतीय जनता पार्टी
5.  गण क्रं. 125 (सायगांव) – श्रीमती पाटील भारती सुनिल – राष्ट्रवादी काँग्रेस
6.  गण क्रं. 126 (उंबरखेड) – श्री.सोनवणे शिवाजी संपत – राष्ट्रवादी काँग्रेस
7.  गण क्रं. 127 (करगांव) – श्री.पाटील सुनिल साहेबराव – भारतीय जनता पार्टी
8.  गण क्रं. 128 (टाकळी प्रचा) – श्रीमती मोरे वंदना दत्तु – भारतीय जनता पार्टी
9.  गण क्रं. 129 (पातोंडा) – श्री.पाटील संजय भास्कर – भारतीय जनता पार्टी
10. गण क्रं. 130 (वाघळी) – श्रीमती पाटील मायाबाई सुभाष – भारतीय जनता पार्टी
11. गण क्रं. 131 (रांजणगांव) – श्रीमती पाटील सुनिता जिभाऊ – राष्ट्रवादी काँग्रेस
12. गण क्रं. 132 (पिंपरखेड) – श्रीमती दौंड लता बाजीराव – राष्ट्रवादी काँग्रेस
13. गण क्रं. 133 (देवळी) – श्री.पाटील अजय भाऊसाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस
14. गण क्रं. 134 (तळेगांव) – श्रीमती चकोर प्रिती विष्णु – राष्ट्रवादी काँग्रेस


* * * * * * * *

Wednesday, 22 February 2017

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडावी : प्रातांधिकारी शरद पवार


मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी
यशस्वीपणे जबाबदारी पार पाडावी
                                                      : प्रातांधिकारी शरद पवार

       चाळीसगाव दि. 22 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील 7 गट व 14 गणाच्या मतमोजणीची प्रक्रिया 23 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरु होणार असून या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी आयोजित प्रशिक्षण शिबीरात दिल्या.
            23 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरु होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण 28 टेबल लावण्यात आले असून एका गटासाठी दोन टेबल तर एका गणासाठी एक टेबल अशी संरचना करण्यात आली आहे, तर टपाली मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबल लावण्यात आला आहे. यासाठी मतमोजणी करतांना गटासाठी असलेल्या उमेदवारास मिळालेली मते नोंदविण्यासाठी पांढऱ्या रंगाचा तर गणासाठी असलेल्या उमेदवारास मिळालेली मते नोंदविण्यासाठी गुलाबी रंगाचा फॉर्म तयार करण्यात आला आहे. यावेळी टेबलनिहाय मतमोजणी करतांना संबंधित उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनीधी उपस्थित राहणार असून त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी दाखवून त्यांची खात्री झाल्यानंतर विहीत फॉर्मवर त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. तत्पुर्वी आलेल्या मतदान यंत्राचा क्रमांक हा आपल्याला मिळालेल्या फॉर्मनुसार बरोबर असल्याची खात्री करुन सदर यंत्राचे सिल हे उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनीधीसमोर उघडण्यात यावे. या व अशा अनेक सुचनाही प्रांताधिकारी श्री.पवार यांनी उपस्थित मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या.
            मतमोजणी कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी व्यवस्थीत रित्या पार पाडण्यासाठी मतमोजणी यंत्राचे प्रात्याक्षिकही यावेळी दाखविण्यात आले. तर मतमोजणी कामात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 चे कमल-134 अन्वये फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील प्रांताधिकारी श्री.पवार यांनी यावेळी दिली.
            जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी प्रक्रिया य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड चाळीसगांव येथे सकाळी 10:00 वाजता सुरु होणार असून उमेदवारांसह उमेदवारांच्या प्रतिनीधींना तर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकारांना मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील प्राधिकारपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या समोरच्या प्रवेशव्दारातुन केवळ उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनीधी यांनाच प्रवेश देण्यात येणार असून अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांना महाविद्यालयाच्या मागील प्रवेशव्दाराने प्रवेश देण्यात येणार आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र मिडीया कक्षही या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी कुठलेही खाद्यपदार्थ तसेच मोबाईल जवळ बाळगता येणार नाही अशा सुचनाही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी यावेळी दिल्या.


* * * * * * * *

Tuesday, 21 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : प्रातांधिकारी शरद पवार


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
                                                      : प्रातांधिकारी शरद पवार

       चाळीसगाव दि. 21 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील 07 गट व 14 गणांसाठी  16 फेब्रुवारी, 2017 रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी गुरूवार दि. 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10:00 वाजेपासून य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी कळविले आहे.
            निवडणूक निरीक्षक तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक अनिल लांडगे यांच्या निरीक्षणाखाली सकाळी 10:00 वाजता सुरु होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण 28 टेबल लावण्यात आले असून एका गटासाठी दोन टेबल तर एका गणासाठी एक टेबल अशी संरचना करण्यात आली आहे, तर टपाली मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबल लावण्यात आला आहे. सर्व गटासह गणाची एकाच वेळी मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक शिपाई अशा प्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी  4 रो ऑफीसर, 8  मॅन्युअल टॅब्युलेशन पथक, 4 संगणकीय टॅब्युलेशन पथक तर सुरक्षा कक्षातून ईव्हीएम मशीन ने-आण करण्यासाठी 12 कर्मचारी अशा 112 अधिकारी कर्मचारी तर टपाली मतमोजणी पथकातील 9 असे एकूण 121 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती  निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी केली आहे.
मतमोजणी साठी पोलीस प्रशासनही सज्ज
            तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून मतमोजणी प्रक्रियेसाठी 1 उप विभागीय पोलीस अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक, 10 उप पोलीस निरीक्षकांसह 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेषत: या मतमोजणी प्रक्रियेच्या वेळी शहरातील कुठलाही मार्ग बंद करण्यात येणार नसून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मतमोजणीच्या कालावधीत उमेदवारांच्या प्रतिनीधींनी नगर पालीकेच्या ग्राऊंडवर आपले वाहन पार्कींग करावे, रोडवर तसेच इतरत्र वाहन पार्कींग करुन वाहतुकीची कोंडी टाळावी.  नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने मतमोजणी कालावधीत कुठलाही मार्ग  बंद न केल्याने वैयक्तीक वाहनाएैवजी सार्वजानिक वाहनाचा वापर करुन परिसरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील व पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.


* * * * * * * *

Sunday, 19 February 2017

पाटण्यात साकारणाऱ्या गणीत नगरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थळ निरीक्षण


पाटण्यात साकारणाऱ्या गणीत नगरीचे
जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थळ निरीक्षण

       चाळीसगाव दि. 19 (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील पाटणादेवी येथे साकारण्यात येणाऱ्या गणित नगरीचे स्थळ निरीक्षण आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले. त्यांच्या समवेत उप विभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, पाटण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड, प्रा.लक्ष्मीकांत पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, यांच्यासह भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सार्वजानिक बांधकाम, महावितरण आदि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी गौताळा औट्रमघाट अभयारण्याच्या प्रवेशव्दारापासून तर परिसरातील वन विभागामार्फत यापुर्वी उभारण्यात आलेल्या सर्व वास्तुंची पहाणी करत त्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना केल्या. मुख्य प्रवेशव्दारापासून साकारण्यात येणारा रस्ता, पथीकाश्रम, डॉरमेट्री  हॉल, नियोजीत भास्कराचार्य माहिती केंद्राची जागा,  ग्रंथालय,  हत्ती बंगला, आकाश निरीक्षणाची जागा, लिलावती उद्यान, ॲम्पीथिएटर,  वॉच टॉवर, कन्हेरगड आदि भागाची पहाणी देखील त्यांनी केली. याच परिसरातील पाटणादेवी या धार्मीक स्थळाला भेट देऊन भावीकांसाठी असलेल्या सोयीसुविधांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. मधील उद्योगांचीही केली पहाणी
चाळीगावातील एम.आय.डी.सी. मध्ये उभारण्यात आलेल्या मोठ्या उद्योगातील भारत वायर व अंबुजा स्टार्च फॅक्टरीच्या कामकाजाची माहिती देखील जिल्हाधिकारी श्रीमती. अग्रवाल यांनी जाणून घेतली. शहरातील एम.आय.डी.सी. मध्ये उभारण्यात आलेल्या व येणाऱ्या बड्या उद्योगामुळे तालुक्यात रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक प्रशासनाने एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून अशा उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सुचना केल्या तर गिरणा डॅम मधून या उद्योगांना पाण्याची व्यवस्थाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी  भारत वायर रोप्स, लि.चे मुख्याधिकारी जयंता पटल यांच्यासह संजीव रॉय, आर.के.जैन, आशिष ठाकूर यांनी माहिती देतांना सांगितले की, एप्रिल-2015 मध्ये 700 कोटीचा हा मोठा उद्योग चाळीसगांव तालुक्यात उभारण्यात आला असून 750 इतक्या मनुष्यबळाचा या ठिकाणी वापर करण्यात येतो, तर या कंपनीचे डिसेंबर-2016 पासून उत्पादन सुरु करण्यात आले असून उद्योग उभारणीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य केल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहलिदार कैलास देवरे, एम.आय.डी.सी. चे कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, मंडळ अधिकारी संदेश निकुंभ, अमृतकार, कुलकर्णी यांच्यासह भारत वायर रोप्‍स लि. चे कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* * * * * * *

Saturday, 18 February 2017

भास्कराचार्य गणित नगरी साकारण्यासाठी वन विभागाचा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


भास्कराचार्य गणित नगरी साकारण्यासाठी
वन विभागाचा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक
                                                      : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल

       चाळीसगाव दि. 18 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे भास्कराचार्यांच्या नावाने जागतिक दर्जाची गणित नगरी साकारण्यासाठी वनविभागासह शिक्षण व सार्वजानिक बांधकाम विभागाचा  सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या.
            तहसिल कार्यालयाच्या सभागृहात भास्कराचार्य गणित नगरीच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरगाबाद श्री.धामगे, सहाय्यक वन संरक्षक (वन्यजीव) औरंगाबाद श्री.जगत, जिल्हा नियोजन अधिकारी, अधिक्षक अभियंता (सा.बा.) श्री.पांढरे, प्रांताधिकारी शरद पवार, अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, तहसिलदार कैलास देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, गट विकास अधिकारी श्री.वाघ, तालुका कृषी अधिकारी श्री.राजपूत, प्रा.लक्ष्मीकांत पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी पाटणा एल.एम.राठोड यांच्यासह भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सार्वजानिक बांधकाम, महावितरण, शिक्षणाधिकारी माध्यमिक आदि  विभागांचे प्रमुख या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, भास्कराचार्य गणित नगरी साकारतांना पर्यावरणाच्या पोषकतेसह वन्यजीवाला हानी पोहचणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. वन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. पर्यटकांचा विचार करुन सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्यास या जागतिक दर्जाच्या गणित नगरीमुळे पर्यटन विकासालाही गती मिळू शकेल. भास्कराचार्य मॅथ सिटीमुळे भावी पिढीला गणिताबद्दल आकर्षण, गणिताचे हसत-खेळत शिक्षण आणि संशोधन करण्यास मोठा हातभार लागू शकेल, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी समन्वयासह सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            यावेळी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे व गणित नगरीवर आधारित चित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले तर प्रा.ल.वी.पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व पाटण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी परिसराची सखोल माहिती जिल्हाधिकारी श्रीमती.अग्रवाल यांना सादरीकरणातून दिली.

* * * * * * *

Thursday, 16 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चाळीसगांव तालुक्यात 61.61 टक्के मतदान


जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
चाळीसगांव तालुक्यात 61.61 टक्के मतदान

चाळीसगांव,दिनांक 16 :-  तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 गटासह पंचायत समितीच्या 14 गणासाठी आज सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने  शांततेत मतदान पार पडले. या निवडणूकीत तालुक्यातून एकूण 61.61 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
            जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत चाळीसगांव तालुक्यातील 7 गटातून 24 तर 14 गणातून 51 उमेदवार उभे होते. तालुक्यातून 2 लाख 46 हजार 247 मतदारांपैकी 1 लाख 51 हजार 719 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये पुरूष 81 हजार 546 तर महिला 70 हजार 173 मतदार असून तालुक्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत एकूण 61.61 टक्के मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
गट निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी व टक्केवारी याप्रमाणे
(1) कळमडू-बहाळ : एकूण मतदार 33201 -  झालेले मतदान  21200  - (टक्केवारी   63.85 %)
(2) दहिवद-मेहुणबारे : एकूण मतदार 33688 – झालेले मतदान  19938 – (59.18 %)
(3) सायगांव-उंबरखेड : एकूण मतदार 35822 – झालेले मतदान  23808 – (66.46 %)
(4) करगांव-टाकळी प्रचा : एकूण मतदार 34073 – झालेले मतदान  17924 – (52.60 %)
(5) पातोंडा-वाघळी : एकूण मतदार  32643 – झालेले मतदान  21480 – (65.80 %)
(6) रांजणगांव-पिंपरखेड : एकूण मतदार  40052 – झालेले मतदान  24559 – (61.32 %)
(7) देवळी-तळेगांव : एकूण मतदार  36768 – झालेले मतदान  22810 – (62.04 %)


* * * * * * * *

Wednesday, 15 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा : प्रातांधिकारी शरद पवार


जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत
मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा
                                                : प्रातांधिकारी शरद पवार

चाळीसगांव,दिनांक 15 :-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून तालुक्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा निर्भयपणे हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
            जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत चाळीसगांव तालुक्यातील 7 गटातून 24 तर 14 गणातून 51 उमेदवार उभे आहेत. या निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी भयमुक्त  वातावरणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
            चाळीसगाव तालुक्यात एकूण 257 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर 7 कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत. तालुक्यातून 2 लाख 46 हजार 247 मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 1 लाख 31 हजार 532 तर महिला मतदार 1 लाख 14 हजार 715 अशी आहे. यासाठी 257 मतदान केद्रांची रचना करुन मतदान यंत्राची तपासणी व सिलिंग झाले आहे. तर याची चाचणी देखील प्रशासनामार्फत घेण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 4 मतदान अधिकारी, 1 शिपाई व 1 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. दरम्यान सर्व मतदान केंद्रावर क्रमांक टाकण्याची कार्यवाही देखील पूर्ण झाल्याचे प्रातांधिकारी श्री.पवार यांनी कळविले आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी फौजफाटा तैनात
            मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील तर सहाय्यक प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उप निरीक्षक, 261 पोलीस कर्मचारी, 95 गृहरक्षक (होमगार्ड), 1 एस.आर.पी.सेक्शन, 1 आर.सी.पी.सेक्शन असा फौजफाटा तैनात करण्यात आला असून तालुक्यातील सर्व मतदारांनी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात आपला अनमोल असा मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील व पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.

* * * * * * * *

Saturday, 4 February 2017

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराच्या प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराच्या
प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

चाळीसगांव,दिनांक 04 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार,सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रवेशिका पाठविण्यासाठी  दिनांक 31 जानेवारी, 2017 ही शेवटची मुदत होती त्यास 9 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर,2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून  विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने  www.dgipr.maharashtra.gov.in  किंवा  www.maharashtra.gov.in  तसेच  www.mahanews.gov.in  या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.  
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढील प्रमाणे :-  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार- शासकीय गट(मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार,  स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये,  मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे :-  अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि.म.परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग.गो.जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

* * * * * * * *