जलसंधारणाचा जळगावचा प्रयोग संपूर्ण राज्यासाठी आदर्श
कांताई बंधारा जलपूजन आणि उद्घाटन सोहळाप्रसंगी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उदगार
जळगाव, दि.16- गिरणा नदीवर जैन इरिगेशन
सिस्टीम्स लि. च्या आर्थिक सहयोगातून बांधण्यात आलेला कांताई बंधारा हा खाजगी
क्षेत्राच्या सहभागातुन जलसंधारणाचा पहिला प्रयोग आहे,या बंधा-याचे झालेले काम
पाहता आणि त्यामुळे काठावरील शेतक-यांना होणा-या लाभाचे प्रमाण पाहता, हा प्रयोग
संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरावा असाच आहे, असे उदगार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी आज येथे काढले.
तापी
पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या
आर्थिक सहयोगाने गिरणा नदीवर येथील
नागझिरी ता. जि. जळगाव येथे उभारण्यात आलेल्या कांताई बंधा-याचे उदघाटन व जलपूजन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री
सुनिल तटकरे हे होते. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की,पाणी
ही अशी गरज आहे की जी आपण कारखान्यात निर्माण करु शकत नाही. त्यासाठी आपल्याला निसर्गावरच
अवलंबून रहावे लागेल. एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशा विचित्र
स्थितीचा सामना महाराष्ट्राला करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळावर कायमस्वरुपी
तोडगा काढण्यासाठी साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्यासाठी या वर्षी आपण 655 कोटी रुपयांच्या
खर्चाची तरतूद केली आहे. या शिवाय अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठीही प्राधान्य आपण
देत आहोत. यंदाच्या चांगल्या पावसामुळे
पिकलेल्या शेतीमालाला चांगली आधारभूत किंमत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
त्यासाठी लवकरात लवकर शासनाची धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. केंद्र
सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न
करीत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जैन उदयोग समूहाचे संस्थापक भवरलालजी
जैन यांनी सामाजिक बांधिलकी जपून चालविलेल्या कार्याचा ना. पवार यांनी गौरवपूर्ण
उल्लेख केला.
यावेळी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री सुनिल
तटकरे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन
अनेक उपाययोजना करीत आहे. त्यात चार मध्यम प्रकल्पांचे कामे पूर्ण करुन 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे
उद्दीष्ट् आहे. याशिवाय बंद पडलेल्या उपसासिंचन योजना कार्यान्वित करणे, गिरणा
नदीवर सात ठिकाणी बंधारे बांधण्याची योजना कार्यान्वित करणे अशा अनेक उपायांचा
समावेश आहे.
या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय
सावकारे, खासदार हरिभाऊ जावळे, ए.टी.
पाटील, आमदार गिरीश महाजन, चिमणराव पाटील, गुलाबराव देवकर, राजीव
देशमुख, दिलीप वाघ, जगदीशचंद्र वळवी, शिरीष चौधरी, साहेबराव पाटील, मनीष जैन, जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, महापौर
राखीताई सोनवणे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, तापी पाटबंधारे विकास
महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रकाश भामरे, मुख्य अभियंता हणमंतराव शिंदे, अधीक्षक
अभियंता वसंत पाटील, अशोक पवार तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे भवरलाल जैन व
ज्येष्ठ साहित्यीक ना. धों. महानोर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अतुल जैन
यांनी , आभार प्रदर्शन अशोक जैन तर
सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले. याप्रसंगी अनेक मान्यवर, तसेच परिसरातील
शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment