Tuesday, 1 October 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश

मुंबई, दिनांक १ ऑक्टोंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.
अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. रुग्णालयातील सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment