Tuesday, 30 May 2017

सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य : तहसिलदार कैलास देवरे


सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास
नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य
                                         : तहसिलदार कैलास देवरे

चाळीसगाव दि. 30 मे (उमाका वृत्तसेवा) :  नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य असल्याचे तहसिलदार कैलास देवरे आज म्हणाले. जुन महिन्यात सुरू होणाऱ्या मान्सूनपुर्व तयारीसाठी तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
            याप्रसंगी गट विकास अधिकारी एम.के.वाघ, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन.के.सोनवणे, उप अभियंता सचिन जोशी, सहा.अभियंता जयेश सुर्यवंशी, डॉ.विशाल पाटील, उप विभागीय अधिकारी वरखेड-लोंढे प्रकल्पाचे सहा. अभियंता एस.आर.पाटील, भारत संचार निगमचे पी.एम.पाटील, देवेंद्र शिंदे, ए.जी.चव्हाण, पी.एस.बावीस्कर, दत्ता गवळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार श्री.देवरे यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभाग निहाय आढावा घेतला. यावेळी संबंधीत विभागाचा सन 2017 चा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, SOP (आदर्श कार्यप्रणाली) व महत्वाच्या दुरध्वनी क्रमांकाच्या अद्यावत याद्या तयार करुन तालुका प्रशासनास सादर करणे. 24 बाय 7 विभाग निहाय नियंत्रण कक्ष स्थापन करणे. विभागनिहाय मदत व बचाव पथकांची स्थापना व नोडल ऑफीसर यांची नियुक्ती करणे. शहरातील सर्व लहान मोठ्या गटारी, नाले तसेच शहरातील सार्वजानिक विहीरीतील गाळ काढण्याच्या कामांना गती देणे. शहरातील अतिक्रमीत भागातील अतिक्रमणे त्वरीत दुर करणे. अग्निशमन दल सुसज्ज व अद्यावत ठेवणे तसेच अग्निशमन कार्यासाठी आवश्यक वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे. विज वितरण कंपनीने विज व अटकाव यंत्रणा सज्ज असलेबाबत आपले स्तरावर खात्री करणे. धरणाच्या विसर्गाची माहिती ज्या-ज्या वेळी धरणातुन विसर्ग केला जाईल त्या-त्या वेळी या कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात कळविणे व योग्य दखल घेणे. पुररेषेची आखणी करुन त्या ठिकाणावरील अतिक्रमणे त्वरीत काढणे. मान्सुन कालावधीत साथीचे रोग पसरु नयेत म्हणुन त्या दृष्टीने पुर्व नियोजन करणे. मान्सुन कालावधीत सर्व नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कामी नियोजन करणे. विभागनिहाय शोध बचाव साधन सामग्रीची देखभाल व दुरुस्ती करणे व ते सुसज्ज ठेवणे. विज वितरण कंपनीने विज वाहक तारांना अटकाव होणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून विज वाहक तारा मोकळ्या करणे. तसेच आपल्या विभागाशी संबंधीत सर्व यंत्रणा तसेच आराखडे अद्यावत करुन सुसज्ज करणे, अशा सुचना तहसिलदार श्री.देवरे यांनी आयोजित बैठकीत उपस्थितांना केल्या.
             तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात अंगावर विज पडून तीन जणांवर मृत्यू ओढवला अशा वेळी त्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून देण्यात येणारी शासकीय मदतीसाठी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे तहसिलदार कैलास देवरे यांनी कौतुक करत तालुक्यातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बाधितांना तात्काळ मदत पुरविण्यासाठी तत्पर राहून कामकाज केल्यास नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला सहजपणे करता येईल असा विश्वासही तहसिलदार श्री.देवरे यांनी व्यक्त केला.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment