सर्व शासकीय तथा अशासकीय कार्यालयांनी
वृक्षलागवडीत सक्रीय सहभाग नोंदवावा
:
तहसिलदार कैलास देवरे
चाळीसगाव,दि.3 मे
(उमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्यभरात 4 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार
आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा,
महाविद्यालये तसेच सर्व शासकीय कार्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग
नोंदवावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी आज केले.
तहसिल कार्यालयात
वृक्षलागवडीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गट विकास
अधिकारी मधुकर वाघ, वनक्षेत्रपाल(प्रा.) संजय मोरे, वनक्षेत्रपाल (वन्यजिव)
एल.एम.राठोड, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे,
गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्तार अधिकारी अे.बी.राणे, के.एन.माळी, लागवड
अधिकारी खैरनार, अे.ई.तायडे, अे.आर.चंदिले, ज्ञानेश्वर अमृतकार आदि उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार
श्री.देवरे म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस 364 रोपांचा पुरवठा
करण्यात येणार आहे. गांवपातळीवरील स्मशान भुमी, नदीकाठ, गावाचे जोडरस्ते अशा
ठिकाणी वृक्षलागवडीचे नियोजन करावयाचे आहे. त्याच बरोबर तालुक्यातील सर्व स्थानिक
स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्याकडे उपलब्ध
असलेल्या जागेत 1 ते 7 जुलै दरम्यान शासन निर्णयानुसार वृक्षलागवड करावयाची आहे.
त्यासाठी वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या जागेचे जी.पी.एस.रिडींग/अक्षांश रेखांशसह
आवश्यक असलेल्या रोपांचे मागणीपत्र सोमवार दिनांक 15 मे, 2017 पर्यंत वनक्षेत्रपाल
(प्रादेशिक), चाळीसगांव यांच्या कार्यालयात पाठविणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी
यावेळी नमूद केले.
वृक्षलागवडीसाठी
हरित सेना ही संकल्पना राबविण्यात येणार
राष्ट्रीय वननीती
नुसार राज्याचे 33 टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि
राज्यात हे प्रमाण 20 टक्केच असल्याने लक्षणीय वाढ करण्यासाठी येणाऱ्या 3 वर्षात
एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्याकरिता
अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा
निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्रत्येक नागरिक
वैयक्तिकरित्या महाराष्ट्र हरित सेनेचा सदस्य होऊ शकतो
शालेय
विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी/अधिकारी (कार्यरत
तसेच सेवा निवृत्त दोन्ही वर्गाचे अधिकारी), खाजगी संस्थांचे कर्मचारी/ अधिकारी,
व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी
सामुहिक स्वरुपात
सुद्धा सदस्य नोंदणी करता येईल
निमशासकीय संस्था,
अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी
संस्था इत्यादींना महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होणे शक्य आहे.
सदस्य कसे होता
येईल
महाराष्ट्र हरित सेनेच्या सदस्यत्वासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत
संकेतस्थळावर नोंदणी करावी.
हरितसेना
महाराष्ट्राच्या सदस्य/स्वयंसेवकाची भूमिका
वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी,
वनांच्या संरक्षणाकरीता सामुहीक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग,
वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत साज-या केल्या जाणा-या वसुंधरा
दिन, पर्यावरण दिन, जागतीक वन दिन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभाग, वनमहोत्सव
कालावधीत वन विभागामार्फत राबविल्या जाणा-या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, वन्यजीव
सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणासंबंधीत सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, पर्यावरण
संवर्धनासाठी आयोजित प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली इत्यादी जनजागृती
कार्यक्रमांमध्ये सहभाग.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment