Wednesday, 28 June 2017

महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज -- राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे


 वृत्त विशेष                                                                                                     दिनांक :  28 जून, 2017
महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज
                                          --- राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे

         चाळीसगाव दि.28 जून:- महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा, विविध कायदे असले तरी महिलांवर अत्याचार होवू नयेत यासाठी महिला स्वसंरक्षण प्रशिक्षणासारखे उपक्रम गाव पातळीवर राज्य महिला आयोगाच्या वतीने राबविले जात आहेत. महिला स्वसंरक्षणासाठी अशी प्रशिक्षण शिबिरांची आज काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी  केले.  
          राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रायोजित महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण  शिबिराच्या समारोप प्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात श्रीमती ठाकरे बोलत होत्या.
         याप्रसंगी  व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, चाळीसगाव पंचायत समिती सभापती   स्मितल बोरसे,  जि.प सदस्य अतुल देशमुख, घोडेगाव गृप ग्राम पंचायतीच्या सरपंच अनुसया जाधव,  उमंग समाज शिंपी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील व्यासपीठावर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, घोडेगाव जि.प उच्च प्राथमिक व  माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण,  पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
             श्रीमती ठाकरे पुढे म्हणाल्या की, महिला संरक्षणसाठी असलेल्या कायद्यांची माहिती महिलांना व्हावी यासाठी महिला आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयेागाच्या वतीने जिल्हास्तरीय, विभागस्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कायद्याची महाविद्यालयीन स्तरावरीन विद्यार्थिनींना माहिती मिळावी म्हणून राज्यातील 11 विद्यापिठांमध्ये 15 हजार विद्यार्थिनींना आयोगाच्या माध्यामातून प्रशिक्षण देण्यात आले आहेत.
        यावेळी अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव , जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट भोळे , संपदा पाटील, जि.प सदस्य अतुल देशमुख,पोलीस उप निरिक्षक सुप्रिया देशमुख यांनी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 4 डिजीटल वर्ग खेाल्यांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात 200 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. शिबिरातील सहभागी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी  विदय्यार्थिनीनी प्रात्यक्षिके करून दाखविलीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन चेतना निकम यांनी तर आभार विनय राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी घोडेगाव  जि.प शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष वसंत चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


****

Tuesday, 20 June 2017

शिधापत्रिका धारकांनी आधार क्रमांक स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावे



वृत्त विशेष                                                                                                      दिनांक :  21 जून, 2017
शिधापत्रिका धारकांनी आधार क्रमांक
स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावे

चाळीसगाव दि. 21 :- केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्याने आधार क्रमांक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे किंवा तहसिल कार्यालयात दिनांक 30 जून 2017 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. जे पात्र लाभार्थी विहीत मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत त्यांना खालील कागदपत्रांची पडताळणी संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडून केल्यानंतरच लाभ अनुज्ञेय होणार आहेत. पडताळणी करण्यात येणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे.
शिधापत्रिका, आधार नोंदणी केल्याची स्लीप किंवा आधार नोंदणी करण्यासाठी केलेल्या विहीत नमुन्‍यातील विनंतीची प्रत, तसेच पुढीलपैकी कोणतेही एक कागदपत्र. मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला वाहन चालक परवाना, राजपत्रित अधिकारी किंवा तहसिलदार यांच्या पत्रावर निर्गमित ओळखपत्र/फोटोयुक्त बँक पासबुक, पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवासी पत्ता असणारे कार्ड ( नाव व फोटोसहित), किसान फोटो पासबुक, अन्य राज्य शासन, केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून विनिर्दिष्ट अन्य दस्तऐवज.  वरील पध्दतीचे 1 जुलै, 2017 पासून तंतोतंत पालन करणे सर्व परवानाधारकांवर  बंधनकारक असल्याचे तहसिलदार कैलास देवरे यांनी कळविले आहे.
0000

Tuesday, 13 June 2017

सुधारीत कृषि औजाराच्या लाभार्थी निवडीसाठी 15 जून रोजी सोडत

चाळीसगाव दि. 13 :- सन 2017-2018 या वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती-समृध्द शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सुधारीत कृषि औजारे अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, पॉवर टिल, कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर औजारांसाठी विहित प्रपत्रातील अर्ज कृषि विभागाकडे सादर केले आहे. तालुक्यास वर्गवारीनुसार प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यामुळे लाभार्थ्यांची निवड दिनांक 15 जून, 2017 रोजी दुपारी 2-00 वाजता कृषि चिकित्सालय, चाळीसगाव येथे सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. सोडत पध्दतीने निवड केलेल्या लाभार्थीस निवडपत्र देण्यात येणार आहे.  निवडी व्यतिरिक्त शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार असून ही यादी 31 मार्च, 2018 अखेरपर्यंत वैध राहणार आहे. तालुक्यातील अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी सोडत पध्दतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आर. एस. राजपुत, तालुका कृषि अधिकारी चाळीसगाव यांनी केले आहे.

0000

Tuesday, 30 May 2017

सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य : तहसिलदार कैलास देवरे


सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास
नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य
                                         : तहसिलदार कैलास देवरे

चाळीसगाव दि. 30 मे (उमाका वृत्तसेवा) :  नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य असल्याचे तहसिलदार कैलास देवरे आज म्हणाले. जुन महिन्यात सुरू होणाऱ्या मान्सूनपुर्व तयारीसाठी तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
            याप्रसंगी गट विकास अधिकारी एम.के.वाघ, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन.के.सोनवणे, उप अभियंता सचिन जोशी, सहा.अभियंता जयेश सुर्यवंशी, डॉ.विशाल पाटील, उप विभागीय अधिकारी वरखेड-लोंढे प्रकल्पाचे सहा. अभियंता एस.आर.पाटील, भारत संचार निगमचे पी.एम.पाटील, देवेंद्र शिंदे, ए.जी.चव्हाण, पी.एस.बावीस्कर, दत्ता गवळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार श्री.देवरे यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभाग निहाय आढावा घेतला. यावेळी संबंधीत विभागाचा सन 2017 चा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, SOP (आदर्श कार्यप्रणाली) व महत्वाच्या दुरध्वनी क्रमांकाच्या अद्यावत याद्या तयार करुन तालुका प्रशासनास सादर करणे. 24 बाय 7 विभाग निहाय नियंत्रण कक्ष स्थापन करणे. विभागनिहाय मदत व बचाव पथकांची स्थापना व नोडल ऑफीसर यांची नियुक्ती करणे. शहरातील सर्व लहान मोठ्या गटारी, नाले तसेच शहरातील सार्वजानिक विहीरीतील गाळ काढण्याच्या कामांना गती देणे. शहरातील अतिक्रमीत भागातील अतिक्रमणे त्वरीत दुर करणे. अग्निशमन दल सुसज्ज व अद्यावत ठेवणे तसेच अग्निशमन कार्यासाठी आवश्यक वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे. विज वितरण कंपनीने विज व अटकाव यंत्रणा सज्ज असलेबाबत आपले स्तरावर खात्री करणे. धरणाच्या विसर्गाची माहिती ज्या-ज्या वेळी धरणातुन विसर्ग केला जाईल त्या-त्या वेळी या कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात कळविणे व योग्य दखल घेणे. पुररेषेची आखणी करुन त्या ठिकाणावरील अतिक्रमणे त्वरीत काढणे. मान्सुन कालावधीत साथीचे रोग पसरु नयेत म्हणुन त्या दृष्टीने पुर्व नियोजन करणे. मान्सुन कालावधीत सर्व नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कामी नियोजन करणे. विभागनिहाय शोध बचाव साधन सामग्रीची देखभाल व दुरुस्ती करणे व ते सुसज्ज ठेवणे. विज वितरण कंपनीने विज वाहक तारांना अटकाव होणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून विज वाहक तारा मोकळ्या करणे. तसेच आपल्या विभागाशी संबंधीत सर्व यंत्रणा तसेच आराखडे अद्यावत करुन सुसज्ज करणे, अशा सुचना तहसिलदार श्री.देवरे यांनी आयोजित बैठकीत उपस्थितांना केल्या.
             तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात अंगावर विज पडून तीन जणांवर मृत्यू ओढवला अशा वेळी त्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून देण्यात येणारी शासकीय मदतीसाठी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे तहसिलदार कैलास देवरे यांनी कौतुक करत तालुक्यातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बाधितांना तात्काळ मदत पुरविण्यासाठी तत्पर राहून कामकाज केल्यास नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला सहजपणे करता येईल असा विश्वासही तहसिलदार श्री.देवरे यांनी व्यक्त केला.


* * * * * * * *

Friday, 19 May 2017

आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक संपन्न


आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक संपन्न

चाळीसगाव दि. 19 मे (उमाका वृत्तसेवा) : नैसर्गिक आपत्ती व मान्सून पुर्व करावयाच्या कामकाजासाठी तहसिल कार्यालय भडगाव येथे तहसिलदार सी.एम.वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी गट विकास अधिकारी सुभाष जाधव, नायब तहसिलदार अमित भोईटे, मुकेश हिवाळे, विज वितरण कंपनीचे अभियंता शुक्ल, तालुका कृषी अधिकारी जाधव, उमेश शिर्के, संदीप बडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख व सर्व बँक शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार श्री.वाघ यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभाग निहाय आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ग्रामसेवक व तलाठी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून आपत्कालीन परिस्थितीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सज्ज रहावे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ वरिष्ठांना कळविण्याबाबत सुचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संबंधित गावातील कर्मचाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावांच्या याद्या भ्रमणध्वनीक्रमांकासह मागविण्यात आल्या. नगरपरिषदेमार्फत नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी सुचना देण्यात आल्या. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाकलेले इलेक्ट्रीक पोल, धोकादायक लोंबकळणाऱ्या तारा आदि बाबत तात्काळ दुरुस्तीसह यंत्रणा अद्यावत ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेसह रोजगार हमी योजनेतील कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे अशा सुचना उपस्थितांना तहसिलदार श्री.वाघ यांनी दिल्या.
मुद्रा लोन योजनेचा प्रचार व प्रसार करा
            केंद्र शासनाच्या मुद्रा लोन योजनेबाबत संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा आढावा घेण्यात आला यावेळी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करुन मुद्रा लोन योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचनाही तहसिलदार सी.एम.वाघ यांनी यावेळी दिल्या


* * * * * * * *

तालुक्यातील विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द् : आमदार उन्मेश पाटील


तालुक्यातील विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द्
                                     : आमदार उन्मेश पाटील

चाळीसगाव दि. 19 मे (उमाका वृत्तसेवा) : बसस्थानकातील चिखल तुडवित प्रवासास सुरूवात करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांच्या भावना विचारात घेऊन चाळीसगाव बसस्थानाकाचे नुतनीकरणासाठी दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करतांना मनस्वी आनंद होत आहे, तसेच तालुक्यातील प्रत्येक विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी आज केले.
            चाळीसगाव बसस्थानाचे नुतनीकरणासह काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून भरीव निधी व मंजूरी प्राप्त झाल्याने आज या विकास कामांचे भुमीपूजन आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रिडा सभापती पोपट भोळे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, परिवहन विभागाचे विभागीय स्थापत्य अभियंता श्री.चव्हाण, आगार प्रमुख सागर झोडगे, आनन खरात, शेखर बजाज, बाबा चंद्रात्रे, सरदारशेठ राजपूत, सुनिल साहेबराव पाटील, ॲड.सोनवणे, मानसिंग राजपूत, अरुण अहिरे, नानाभाऊ कुमावत आदि मान्यवरांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना आमदार श्री.पाटील म्हणाले, विकासकामांसाठी दळणवळणाची उपलब्धी आवश्यक असते, त्याअनुषंगाने तालुक्यातील रस्ते विकास साधतांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो वा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राज्यासह केंद्रशासनाकडून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करुन तालुक्यातील रस्ते विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगतांना आमदार श्री.पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यातील 136 गावांचा नियमीत संपर्कात येणाऱ्या चाळीसगाव बसस्थानाच्या नुतनीकरणामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण जनतेस मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. नियमीत शैक्षणिक कामासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक सवलतीचे पासेस मिळण्यासाठी ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांमध्ये मासिक सवलती पासेस सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, तसेच तालुक्यातून लांब पल्ल्यांच्या काही बसेस सुरु केल्यास नागरिकांसाठी सोईचे होऊन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल. या प्रमाणेच अजून काही प्रस्ताव परिवहन महामंडळाला आमदार श्री. पाटील यांनी सादर केले असून त्यांची पूर्तता करण्याच्या सुचनाही त्यांनी उपस्थित परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आमदार श्री.पाटील यांनी प्रसार माध्यमांकडून होणाऱ्या टिकाटिपणीमुळे दुर्लक्षीत विकास कामे निदर्शनास आणून दिल्याबद्दल सर्व प्रसार माध्यमांचेही विशेष आभार मानले.
            प्रास्ताविकात परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर म्हणाल्या चाळीसगाव बसस्थानक व आगाराच्या एकूण 1 हेक्टर 53 आर क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये मुख्य बसस्थानाकाच्या नुतनीकरणासाठी 53.39 लक्ष तर वाहनतळासह इतर कामांसाठी 35.69 लक्ष निधीचे वितरण करण्यात येणार आहे. बसस्थानकात 11 बसेससाठी फलाट, एक नियंत्रण कक्ष, एक बसस्थानक प्रमुख कक्ष, एक एटीएस रूम व एक पार्सल रुमचा समावेश करण्यात येणार आहे.  बस स्थानकाच्या कामात बसस्थानकातील फलाटाची उंची वाढविणे, तळाला कोटासह आधुनिक पध्दतीचे फ्लोरींग बसविणे,  ग्रॅनाईट बँचेस, ॲल्युमिनियम विंन्डोज, बसस्थानकास रंगरंगोटीसह संपुर्ण काँक्रिटीकरण, स्वतंत्र नियंत्रण कक्ष इ.चा समावेश राहणार आहे. तसेच पार्कींग एरियाचे काँक्रिटीकरणासह ड्रेनेज लाईनची स्वतंत्र व्यवस्थाही यातुन उभारण्यात येणार असल्याचे श्रीमती खिरवाडकर यावेळी म्हणाल्या.
            यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, विश्वास चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून चाळीसगाव बसस्थानकाच्या नुतनीकरणाच्या वचनपूर्तीच्या अनुषंगाने आमदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले.                                                    

* * * * * * * *

Thursday, 18 May 2017

नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींच्या वारसांना आमदारांच्या हस्ते धनादेश वाटप


नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींच्या वारसांना
आमदारांच्या हस्ते धनादेश वाटप

चाळीसगाव दि. 18 मे (उमाका वृत्तसेवा) : रविवार दिनांक 07 मे, 2017 रोजी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मौजे खेडगांव व मौजे पिलखोड येथील दोन व्यक्तींच्या अंगावर विज कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला होता. या मयतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत होण्यासाठी तालुक्याचे आमदार श्री.उन्मेश पाटील यांनी पाठपुरावा करत आज त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा प्रत्येकी रु. 4 लाखाच्या धनादेशांचे वाटप आमदार  श्री.उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
            चाळीसगांव तालुक्यातील मौजे खेडगांव येथील पितांबर हिरामण सुर्यवंशी (रामोशी) वय 21 वर्षे हा तरुण शेतात कामासाठी गेला असता अचानक विज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. तर तालुक्यातील मौजे पिलखोड येथील किरण सतिलाल माळी (भिल्ल) वय 22 वर्षे हा तरुण पिंप्री शिवारात लाकडे घेण्यासाठी गेला असता अचानक विज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. या दोघा मयतांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आमदार श्री.उन्मेश पाटील व तालुका प्रशासनाच्या वतीने तहसिलदार कैलास देवरे यांनी थेट मयतांच्या निवासस्थानी (खेडगांव व पिलखोड) येथे जाऊन मदतीचा धनादेश मयतांच्या वारसांकडे सुपूर्त केला. यावेळी त्यांच्या समवेत संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, खेडगावचे सरपंच माळी, पंकज साळुंखे, राकेश बोरसे स्थानिक लोकप्रतिनीधींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           

* * * * * * * *

Monday, 15 May 2017

संगणकीकृत अभिलेख व ई-फेरफार पडताळणीसाठी चावडी वाचनाचे आयोजन : तहसिलदार कैलास देवरे

संगणकीकृत अभिलेख व ई-फेरफार पडताळणीसाठी
चावडी वाचनाचे आयोजन
                                                :तहसिलदार कैलास देवरे

       चाळीसगाव दि. 15 मे (उमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या ई-फेरफार कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 01 ऑगस्ट, 2017 पासून सर्व सातबारा उतारे तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी खातेदारांना त्यांचा सातबारा पडताळणीसाठी व त्यात दुरुस्ती असल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचनासाठी दिनांक 16 ते 21 मे, 2017 दरम्यान 7 मंडळस्तरावरील 61 गावांमध्ये  चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करणेबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या संबंधित सजेवर उपस्थित राहून चावडी वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            तालुक्यातील एकूण 136 गावांपैकी 61 गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामकाज 98 टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने पहिल्या टप्प्यात ( दि 16 ते 21 मे, 2017) या गावांमध्ये चावडी वाचनाचे नियोजन असून उर्वरित गावांचे संगणकीकरणाचे काम अंतीम टप्प्यात असून त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचे नियोजनही लवकरच प्रसिध्द करुन तालुक्यातील संपुर्ण सातबारा संगणकीकरणाचे कामकाज महिन्याभरात पुर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल प्रशासनास तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असेही तहसिलदार श्री.देवरे यांनी कळविले आहे.
            चावडी वाचनाच्या नियोजित कार्यक्रमात दिनांक 16 ते 18 मे, 2017 या कालावधीत चाळीसगांव मंडळातील 3 गावे, शिरसगांव मंडळातील 6 गावे, बहाळ मंडळातील 10 गावे तर हातले मंडळातील 3 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दिनांक 16 ते 19 मे, 2017 दरम्यान मेहुणबारे मंडळातील 13 गावे, दिनांक 16 ते 21 मे, 2017 दरम्यान तळेगांव मंडळातील 9 गावे तर दिनांक 16 ते 22 मे, 2017 या कालावधीत खडकी मंडळातील 17 गावे असे पहिल्या टप्प्यातील 61 गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            चाळीसगांव तालुक्यातील  136 गावांमधील एकूण सातबाऱ्यांची संख्या ही  1 लाख 37 हजार 81 इतकी असून आजतागायत 1 लाख 17 हजार 146 इतक्या सातबाऱ्यांचे संगणकीकरणाचे काम पुर्ण झाले असून त्याची टक्केवारी 85.5 टक्के इतकी आहे. एकूण 136 पैकी 61 गावांचे संगणकीकरणाचे कामकाज 98 टक्क्यापेक्षा अधिक पुर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यात 61 गावांची निवड चावडी वाचनासाठी करण्यात आली आहे. संगणकीकरणाच्या कामाचा आवाका अधिक असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःशी संबंधीत 7/12 वेबसाईटवरून डाऊनलोड करून अथवा तलाठी यांचेकडील अभिलेख पाहण्यासाठी चावडी वाचनात सहभाग घेऊन आपापल्या 7/12 वर चुका असल्यास योग्य त्या पुराव्यासह दुरुस्ती असल्यास तसा अर्ज करुन दुरुस्ती करुन घ्यावी व  प्रशासनास सहकार्य करावे असे तहसिलदार श्री.देवरे यांनी कळविले आहे.


* * * * * * * *

Monday, 8 May 2017

कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने अनुदान तत्वावर कृषी औजारांसाठी अर्ज सादर करा : तालुका कृषी अधिकारी राजपूत

कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने अनुदान तत्वावर
कृषी औजारांसाठी अर्ज सादर करा
: तालुका कृषी अधिकारी राजपूत
             
       चाळीसगाव दि. 8 मे (उमाका वृत्तसेवा) :  सन 2017-18 या वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती - समृध्द शेतकरी ही मोहिम राबवून या मोहिमेतंर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या आढावा बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार सुधारित कृषी औजारे शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी विहित प्रपत्रातील अर्ज कृषी विभागाकडे सोमवार दिनांक 15 मे, 2017 पर्यंत सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेतंर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर इ. औजारे प्रती वैयक्तीक लाभार्थीस एक औजार याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.  या योजनेतंर्गत सामुहिक अथवा गटनिहाय कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य सुध्दा देण्यात येणार आहे. दिनांक 15 मे, 2017 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांमधुन जिल्हा स्तरावर सोडत पध्दतीने निवड करुन पुर्वसंमती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
            या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी थेट संपर्क साधून या योजनेचा तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी  मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी केले आहे.


* * * * * * * *

Saturday, 6 May 2017

आदर्श आमदार ग्राम वाघळीच्या 835 प्रस्तांवाना तात्काळ मंजूरी द्या : आमदार उन्मेश पाटील


आदर्श आमदार ग्राम वाघळीच्या 835 प्रस्तांवाना तात्काळ मंजूरी द्या !
आढावा बैठकीत आमदार उन्मेश पाटीलांनी दिले निर्देश
             
       चाळीसगाव दि. 6 मे (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील आदर्श आमदार ग्राम म्हणून वाघळी या गावाची निवड करण्यात आली आहे. या गावातील 450 शोषखड्डे, 225 शौचालये व 160 गोठे असे एकूण 835 प्रस्ताव मंजूरीसाठी आले असून येत्या 13 मे, 2017 पर्यंत या सर्व प्रस्तावांना मंजूरीसह लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्याचे निर्देश आज आढावा बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी दिले.
            या बैठकीला जि.प.कृषी सभापती पोपट भोळे, पंचायत समिती सभापती सौ.स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, सदस्य सुनिल साहेबराव पाटील, भाऊसाहेब केदार, कैलास निकम, रुपाली साळुंखे, अजय पाटील, मायाबाई पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, सरपंच विकास चौधरी तहसिलदार कैलास देवरे, गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
            आपले गाव आपला आपला आराखडा सादर करतांना आदर्श आमदार ग्राम विकास कामांसाठी कुठलाही विशेष निधी दिला जात नाही. परंतु तालुक्याचा विकास साधतांना एक आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नियोजन समितीसह आमदार निधी वापरुन शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून आदर्श ग्राम निर्मीतीचा आपला मानस आहे. यासाठी राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना आमदार श्री.पाटील यांनी उपस्थितांना दिल्या.
            वाघळी गावातील 1318 कुटूंबाचा सर्व्हे पुर्ण झाला असून या गावातील 2293 हेक्टर शेत जमीनीचे 1400 खातेदारांची शेतजमीन संपुर्ण सिंचनाखाली आणण्यासाठी या गावाची जलयुक्त शिवारात निवड करण्यात आली आहे. गावातील सर्व शाळा डिजीटल करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले वितरीत करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. गावातील 27 कुपोषीत बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधींनी दत्तक घेऊन गाव कुपोषणमुक्त करण्याचा निर्धारही करण्यात आला.  तर महसूल प्रशासनामार्फत महाराजस्व अभियानातंर्गत वाघळी गावात शिबीराचे आयोजन करुन ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले वाटप करण्याच्या सुचनाही महसूल प्रशासनास यावेळी देण्यात आल्या.
मोतीबींदू मुक्त गावाचा मानस
            गावातील एकही नागरिकास मोतीबींदू राहणार नाही यासाठी आरोग्य प्रशासनाने शिबीराचे आयोजन करुन मोतीबींदूची तपासणी व शस्त्रक्रीया करुन संपुर्ण गांव मोतीबींदूमुक्त करण्याच्या सुचनाही आमदार श्री.पाटील यांनी  यावेळी दिल्या. शासनाच्या विविध योजनांचे लाभ यापुढे रोख स्वरुपात देण्यात येणार नसल्याने गावातील 100 टक्के नागरिकांचे बँक खाते उघडली जाणार असून प्रत्येक बँक खातेधारकांचा बारा रुपये भरून विमा उतरविण्यात येणार.  तसेच शासनाच्या मुद्रा लोन योजनेतून सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी चालना देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. गावात व्यायामशाळा, वाचनालय, वृक्षलागवड, स्वच्छता अभियान, आरोग्य व शिक्षण या मुलभूत गरजांची पुर्तता होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करणे अपेक्षीत आहे. केवळ कागदोपत्री कामे न करता ग्रामस्थांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून काम करणे हे प्रत्येक शासकीय अधिकारी व  कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे आणि हे त्यांनी लोकसेवक या नात्याने पार पाडणेही गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
                       

* * * * * * * *

Friday, 5 May 2017

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कामांना गती द्यावी : आमदार उन्मेश पाटील


सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कामांना गती द्यावी
                         : आमदार उन्मेश पाटील
             
       चाळीसगाव दि. 5 मे (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कामांना गती द्यावी असे निर्देश आज तहसिल कार्यालयात आयोजित तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी दिले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पोपट भोळे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, सदस्य सुनिल साहेबराव पाटील, शशीकांत साळुंखे, भाऊसाहेब खैरनार, लिलाबाई पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, भाऊसाहेब जगताप, तहसिलदार कैलास देवरे, गट विकास अधिकारी मधुकर वाघ, प्रकल्प अधिकारी, वनक्षेत्रपाल(प्रा.) संजय मोरे, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्तार अधिकारी अे.बी.राणे, के.एन.माळी, लागवड अधिकारी खैरनार, अे.आर.चंदिले, सर्प मित्र राजेश ठोंबरे, ज्ञानेश्वर अमृतकार आदि उपस्थित होते.
            तालुका प्रशासनाचा आढावा घेतांना सर्वप्रथम मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी तसेच माता बालसंगोपनासाठी महिला व बाल कल्याण विभागाने शासनाच्या योजनांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागाच्या अंजेड्यावरील उन्नत शेती-समृध्द शेतकरी अभियानावर विशेष भर द्यावा. 1 ते 7 जुलै दरम्यान होणारी 4 कोटी वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी वनविभागासह सामाजिक वनिकरण व इतर सर्व विभागांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. भारनियम करतांना प्रामाणिक ग्राहकांवर होणारा अन्याय लक्षात घेता विज गळती व विज चोरी रोखण्यासाठी महावितरणने विशेष पथकांची नियुक्ती करावी. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व बायोमॅट्रीक हजेरी तपासणीअंती केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. कुटूंब कल्याण, लिंग गुणोत्तर, गरोदर माता नोंदणी, माता मृत्यू दर, मानव विकास मिशन कार्यक्रमासह आरोग्य यंत्रणेने विशेष खबरदारी घेण्याच्या सुचनाही आमदार श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.
            पुढे बोलतांना आमदार श्री.पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल शाळा केल्याने शासनातर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी व महसूल प्रशासनाने समन्वय साधून मोहिम राबवावी. जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे मिशन मोडमध्ये करण्याच्या सुचना केल्या तर एक पाऊल धवलक्रांतीकडे टाकत पशुधन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी ग्रामीण भागात शिबीरांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार कैलास देवरे यांनी केले तर आभार निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.

* * * * * * * *

Wednesday, 3 May 2017

सर्व शासकीय तथा अशासकीय कार्यालयांनी वृक्षलागवडीत सक्रीय सहभाग नोंदवावा : तहसिलदार कैलास देवरे


सर्व शासकीय तथा अशासकीय कार्यालयांनी
वृक्षलागवडीत सक्रीय सहभाग नोंदवावा
                               : तहसिलदार कैलास देवरे

       चाळीसगाव,दि.3 मे (उमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्यभरात 4 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच सर्व शासकीय कार्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी आज केले.
            तहसिल कार्यालयात वृक्षलागवडीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी मधुकर वाघ, वनक्षेत्रपाल(प्रा.) संजय मोरे, वनक्षेत्रपाल (वन्यजिव) एल.एम.राठोड, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्तार अधिकारी अे.बी.राणे, के.एन.माळी, लागवड अधिकारी खैरनार, अे.ई.तायडे, अे.आर.चंदिले, ज्ञानेश्वर अमृतकार आदि उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार श्री.देवरे म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस 364 रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. गांवपातळीवरील स्मशान भुमी, नदीकाठ, गावाचे जोडरस्ते अशा ठिकाणी वृक्षलागवडीचे नियोजन करावयाचे आहे. त्याच बरोबर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत 1 ते 7 जुलै दरम्यान शासन निर्णयानुसार वृक्षलागवड करावयाची आहे. त्यासाठी वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या जागेचे जी.पी.एस.रिडींग/अक्षांश रेखांशसह आवश्यक असलेल्या रोपांचे मागणीपत्र सोमवार दिनांक 15 मे, 2017 पर्यंत वनक्षेत्रपाल (प्रादेशिक), चाळीसगांव यांच्या कार्यालयात पाठविणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
वृक्षलागवडीसाठी हरित सेना ही संकल्पना राबविण्यात येणार

राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33 टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण 20 टक्केच असल्याने लक्षणीय वाढ करण्यासाठी येणाऱ्या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्याकरिता अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या महाराष्ट्र हरित सेनेचा सदस्य होऊ शकतो
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी/अधिकारी (कार्यरत तसेच सेवा निवृत्त दोन्ही वर्गाचे अधिकारी), खाजगी संस्थांचे कर्मचारी/ अधिकारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी
सामुहिक स्वरुपात सुद्धा सदस्य नोंदणी करता येईल
निमशासकीय संस्था, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था इत्यादींना महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होणे शक्य आहे.
सदस्य कसे होता येईल
महाराष्ट्र हरित सेनेच्या सदस्यत्वासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी.

हरितसेना महाराष्ट्राच्या सदस्य/स्वयंसेवकाची भूमिका

वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरीता सामुहीक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत साज-या केल्या जाणा-या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतीक वन दिन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभाग, वनमहोत्सव कालावधीत वन विभागामार्फत राबविल्या जाणा-या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणासंबंधीत सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली इत्यादी जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग.


* * * * * * * *

Monday, 1 May 2017

महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न


महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ
आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न
                                                                       
       चाळीसगाव,दि.1 मे (उमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि 1 मे, 2016 रोजी सकाळी 8:00 वाजता चाळीसगावचे आमदार श्री.उन्मेश पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड कवायत मैदान,चाळीसगाव येथे ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी राष्ट्रगीत आनंदीबाई बंकट विद्यालयाच्या श्रावणी गितेश कोटस्थाने आणि स्नेहल बाळासाहेब सापनर या विद्यार्थिनींनी म्हटले. ध्वजारोहणानंतर आमदार श्री.उन्मेश पाटील यांना पोलीस व गृहरक्षक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राष्ट्रध्वजास वंदन व संचलन समारंभानंतर आमदार श्री. उन्मेश पाटील यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       याप्रसंगी पचायत समिती सभापती सौ.स्मितल बोरसे, उप सभापती श्री.संजय भास्कर पाटील, नगराध्यक्षा सौ.आशालता चव्हाण, नगर सेविका अलका गवळी, नगर सेवक संजय पाटील, आनंद खरात, अरुण मोतीलाल आहिरे, रमेश शिंपी, स्वातंत्र्य सैनिक, तालुका प्रशासनाच्या वतीने चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी  शरद पवार, अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, तहसिलदार कैलास देवरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच तहसिल कार्यालयातील सर्व नायब तहसिलदार, कर्मचारी, विविध शासकीय विभागातील  अधिकारी- कर्मचारी, नागरिक विद्यार्थी  मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

Wednesday, 19 April 2017

मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहणार नाही : खासदार ए.टी.पाटील


मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहणार नाही
: खासदार ए.टी.पाटील

       चाळीसगाव,दि.19(उमाका वृत्तसेवा): मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहू देणार नाही  यासाठी तहसिल कार्यालयासह पक्ष कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष उभारून लाभार्थ्यांना अधिकारी, पदाधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल असे प्रतिपादन खासदार ए.टी.पाटील यांनी आज केले.
            मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा तसेच त्यांचा सहभाग वाढावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वय करण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य अशा मुद्रा लोन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पंचायत समिती सभापती स्नेहल बोरसे, संपदा पाटील, के.बी.साळुंखे, घृष्णेश्वर पाटील, आण्णा कोळी, रंजना सोनवणे, तहसिलदार कैलास देवरे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, ज्ञानेश्वर अमृतकर, मानसिंग राजपूत, भरत गोरे यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार तरुणांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगत खासदार श्री.पाटील पुढे म्हणाले, या योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना होण्यासाठी प्रत्येक बँकेत मुद्रा लोन योजनेचे फलक लावण्यात यावेत, तर मुद्रा लोन साठी नागरिकांना असलेल्या समस्या, तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यासाठी तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुद्रा लोन योजनेचा दरमहा आढावा घेण्यात येणार असून ही योजना तळागाळात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोहचावी, या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले. तर नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी प्रास्ताविकात तहसिलदार कैलास देवरे म्हणाले, मुद्रा लोन योजनेतंर्गत शिशु गट, किशोर गट आणि तरुण गट असून या गटानुसार पात्र लाभार्थ्यांना विविध बँकांव्दारे अर्थसहाय्य देण्यात येते. मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याच बरोबर सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते आदी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेव्दारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून छोटे-मोठे उद्योग निर्माण व्हावे या हेतुने प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून मुद्रा योजना राबविली जात आहे. या योजनेची प्रभावी आणि परिणामकारक जागृती करुन ही योजना अधिक गतिमान आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही तहसिलदार श्री.देवरे यांनी यावेळी केले.
            यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांनी योजनेची सविस्तर माहिती सांगतांना लाभार्थ्यांनी कुठल्याही मध्यस्थाशिवाय बँक व्यवस्थापनाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी उमंग समाजशिल्पी मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत या योजनेत महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर मुद्रा लोन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या युनियन बँकेसह बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँक अधिकाऱ्यांचा खा.ए.टी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खासदार ए.टी.पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
            यावेळी दारिद्‌रय रेषेखालील (बी.पी.एल.) कुटूंबाचा कर्ता प्रमुख व्यक्तीचे निधन झालेल्या कुटूंबांच्या वारसांना अर्थ सहाय्य देण्यासाठी राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना आज खासदार ए.टी.पाटील यांच्या हस्ते धनादेशांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहसिलदार विशाल सोनवणे तर आभार नानासाहेब आगळे यांनी मानले.

* * * * * * * *

Monday, 17 April 2017

मुद्रा लोनसह कॅशलेस व्यवहाराच्या प्रचार प्रसिध्दीसाठी मेळाव्याचे आयोजन : प्रातांधिकारी शरद पवार

मुद्रा लोनसह कॅशलेस व्यवहाराच्या
प्रचार प्रसिध्दीसाठी मेळाव्याचे आयोजन
                                                                                      :प्रातांधिकारी शरद पवार

       चाळीसगाव,दि.17(उमाका वृत्तसेवा):  मुद्रा लोन योजना ही सामान्य नागरिकांना आपले लहान मोठे उद्योग सुरु करण्यासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना आहे. याव्दारे अर्थसहाय्य प्राप्त करुन आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा लोन योजना व कॅशलेस व्यवहाराबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा लोकसभा सदस्य खा.ए.टी.पाटील व विधानसभा सदस्य आ.उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 19 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पंचयात समितीच्या सभापती स्मितल बोरसे व नगराध्यक्षा आशालता चव्हाण याही उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यात तालुक्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
            या मेळाव्याच्या अनुषंगाने आज तहसिल कार्यालयात तालुक्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसिलदार कैलास देवरे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, ज्ञानेश्वर अमृतकर व विविध बँकांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुद्रालोन लाभधारकांची यादी, आजतागायत वितरीत करण्यात आलेल्या मुद्रा लोनची माहिती, प्रतिक्षेतील मुद्रालोन अर्जदारांचा आढावाही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी घेतला.
            चाळीसगावात आयोजित केलेल्या या मेळाव्यात होतकरु, बेरोजगार आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांमध्ये उद्योजकतेचा विकास होण्यासाठी व त्या करिता मुद्रा बँक योजनेव्दारे त्यांना कर्ज मिळविणेकामी मार्गदर्शन तसेच सर्व सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कॅशलेस व्यवहार जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरिता उद्योजक, बँक व सामाजिक संस्था यांच्याकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.          
                         

* * * * * * * *