Saturday, 24 December 2016

ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट ग्राहक बना : बाबासाहेब चंद्रात्रे


ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट ग्राहक बना
                                                 : बाबासाहेब चंद्रात्रे
            चाळीसगांव, दिनांक 24 :-  लोकशाही अर्थव्यवस्थेत ग्राहकाचे महत्व मोठया प्रमाणावर आहे. परिस्थितीच्या अभ्यासाने मतदान करुन समाजाच्या अर्थव्यवस्थेला वळण लावण्याचे सामर्थ्य या ग्राहकांकडे आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरीक एकाच वेळी मतदारासोबत ग्राहक पण असतो. दुखावलेला ग्राहक हा रागावलेला मतदार असतो. मतदाराची इच्छा, अधिकार दाबून जसे प्रजातंत्र उभे राहणार नाही. त्याचप्रमाणे अर्थक्षेत्रात ग्राहकांचे अधिकार इच्छा दाबून सामाजिक अर्थव्यवस्था उभी राहणार नाही आणि राहिली तरी ती कल्याणकारी असणार नाही. म्हणून माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असून ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट सिटी प्रमाणेच स्मार्ट ग्राहकही बना असे  प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांनी आज आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले. महसूल प्रशासन व ग्राहक पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय ग्राहक दिन-२०१६ या कार्यक्रमाचे तहसिल कार्यालय चाळीसगांव येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे, तर कार्यक्रमाचे उद्‌घाटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती आशालता चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, विश्वास चव्हाण, किसनराव जोर्वेकर, ग्राहक पंचायतीचे सदस्य सर्वश्री विकास वाणी, अरुण पाटील, यशवंत सोनवणे, सर्पमीत्र राजेश ठोंबरे, ॲड.जितेंद्र पोतदार, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, वाय.आर.पाटील, तहसिलदार कैलास देवरे, तालुका कृषी अधिकारी श्री.राजपुत, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आर.डी.चौधरी  यांच्यासह पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की, अर्थ व्यवस्थेत ग्राहकाचे महत्व असूनही त्याचे अस्तित्व ओळखण्यास कोणी तयार नाही. महागाई, फसवणूक या भडकत्या ज्वालांमध्ये तो रोज होरपळून निघत आहे.  ग्राहक हे आमचे माय-बाप आहेत असे म्हणतच या ग्राहकांचे प्रत्येक व्यवहारात शोषण होत आहे. ग्राहकांचे मोठया प्रमाणावरील अज्ञान, उदासीन वृत्ती, त्याचे असंघटीत स्वरुप यामुळे विक्रीव्यवहारात संघटित व्यापारी वर्गाच्या पुढे हा ग्राहक दुबळा होत आहे. मी स्वत:  व्यापारी वर्गात असूनही मी या विषयावर स्पष्टोक्ती देतांना मला अभिमान वाटतो कारण ग्राहकांचे प्रबोधन होऊन त्यांना न्याय मिळण्यातच मी धन्यता मानतो.  ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर, १९८६ साली पारित झाला असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होऊन प्रत्येक ग्राहकाने ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट ग्राहक होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यानी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे  प्रास्ताविकातून बोलतांना म्हणाले की, ग्राहकांच्या हितसंबंधाचे अनुचित प्रथांपासून संरक्षणे करणे हे आज ग्राहक चाळवळीपुढील मोठे आव्हान आहे. त्यासाठी करावी लागणारी ग्राहक जागृती, वेळप्रसंगी द्यावे लागणारे न्यायालयीन लढे हे सगळेच आव्हानात्मक आहे. कधी ही लढाई असते एकट्याची, त्यासाठी वेळप्रसंगी ग्राहक संघटनांची मदतही घ्यावी लागते, तर कधी ग्राहक संघटना व्यापक ग्राहक हित लक्षात घेऊन प्रतिनिधीक लढे लढतात. पण त्यासाठी समाजातील प्रत्येक ग्राहकाचे सक्षमीकरणे होणं ही काळाजी गरज असल्याचेही तहसिलदार श्री.देवरे यावेळी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे म्हणाले, प्रत्येकवेळी निरक्षर ग्राहक नाडला जातो. नोटबंदीमुळे निरक्षर ग्राहक हा ऑनलाईन पेमेंट पध्दतीमुळे नाडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रत्येक ग्राहकाने आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सर्वकष ज्ञान प्राप्त करणे गरजेचे असून जाहिरात बाजीमुळे होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणूकीपासून सावध राहीले पाहिजे. व  ग्राहकांच्या हक्कासोबत ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन जागृत ग्राहक बनले पाहिजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुरवठा निरिक्षक संदेश निकुंभ यांनी केले तर आभार नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment