Tuesday, 20 December 2016

तालुक्याला समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेणार : आमदार उन्मेश पाटील


तालुक्याला समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेणार
                                                              : आमदार उन्मेश पाटील
            चाळीसगांव, दिनांक 20 :-  तालुक्यातील विकास कामांना गती देऊन लोकाभिमुख योजना राबविण्यासह तालुक्याला समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेणार असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत केले.
            यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमती आशालता साळुंखे, समिती सदस्य सुभाष चौधरी, भाऊसाहेब जगताप, भाऊसाहेब खैरनार, संजय पाटील, सुनंदा पाटील, लीलाबाई पाटील, अभिलाषा अहिरे, तहसिलदार कैलास देवरे, न.पा.मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, गट विकास अधिकारी श्री.राणे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, उप अधिक्षक भुमी अभिलेख श्री.अहिरे, शशीकांत साळुंखे, नवोदय राठोड, सर्व ग्रामसेवक आदि उपस्थित होते.
            यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी कामचुकार अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी मनरेगाच्या कामाचा आढावा घेतांना समृध्द महाराष्ट्राची संकल्पना मांडत रोजगार हमी योजनेच्या 11 कलमी कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती देत ही योजना गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामसेवक हा महत्वाचा घटक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत गोठे वाटपाची योजना राबवितांना दुधाळ जनावरांची घ्यावयाची काळजी व डेअरी एक्स्पोच्या माध्यमातून शिबीरांचे आयोजन करुन शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्याच्या सुचना ग्रामसेवकांना दिल्या. याच माध्यमातून तालुका समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेऊन तालुक्याचे गतवैभव प्राप्त होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            प्राथमिक आरोग्य केंद्रानी शासनाच्या सुरक्षित मातृत्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच येत्या 29 डिसेंबर रोजी तालुक्यात माताबालसंगोपनासह नेत्र तपासणी शिबीराच्या यशस्वीतेसाठी योगदान देण्याच्या सुचना केल्या. एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत तालुका कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त करत तालुक्यातील 43 कुपोषीत बालकांसाठी दत्तक पालक योजना राबवून तालुक्यातून कुपोषणाचे समुळ उच्चाटन करण्याच्या सुचना केल्या. विज वितरण कंपनीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे यांचे कौतुक केले तर धामणगांव येथील 132 के.व्ही. प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना केल्या. कृषी विभागामार्फत लाभार्थी योजना राबवितांना लोकप्रतिनीधींना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत कृषी विभागाने सुपा बायोटेकच्या सहकार्याने खतयुक्त शिवार योजना तयार करुन तालुक्यात राबविण्याच्या सुचना केल्या. मुद्रा योजनेतंर्गत लिड बँकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन तात्काळ आढावा बैठक लावण्याच्या सुचना सहकार विभागास देण्यात आल्या. सामाजिक वनिकरणाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाच्या मंजूरीसह निधी उपलब्ध असतांनाही स्व.उत्तमराव पाटील वन उद्यानाचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.  वन विभागाचा वन्यजीव विभागामार्फत ग्राम परिस्थितीकीय विकास समित्या गठीत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देऊन आठवड्याभरात समित्या गठीत करुन गॅस वाटपाबाबत नियोजन करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या. कॉक्रीटीकरणाच्या कामातील कामाचा निकृष्ट दर्जा खपवून घेणार नाही. झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडीट करण्यात येणार असून दलीत वस्ती सुधार योजनेतील मंजूर कामात दिरंगाई चालणार नसल्याचे सांगत पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठीचा प्रस्ताव 15 दिवसात दाखल करण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाला देण्यात आल्या.
            नोटबंदीमुळे नागरिकांनी कॅशलेस व्यवहारांवर भर देऊन व्यवहार सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यात पहिली आय.एस.ओ.मानांकन मिळविणारी चितेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती पांडे यांचा आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रस्तावना तहसिलदार कैलास देवरे यांनी तर आभार नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment