Saturday, 24 December 2016

रस्त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा होणार विकास : सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील


रस्त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा होणार विकास
: सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील
            चाळीसगांव, दिनांक 25 :-  रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सहकार्य करा, सगळे मिळून ग्रामीण भागाचा विकास करु, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
            पाचोरा, भडगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून 17.37 लक्ष खर्चाच्या वरखेडी-सावखेडा रस्त्याचा लोकार्पण सोहळा वरखेडी ता.पाचोरा येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी आमदार किशोर पाटील, सावखेड्याचे सरपंच किरण पाटील, माजी सरपंच गोकुलसिंग परदेशी,  शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख दीपकसिंग राजपूत, ज्ञानेश्वर सोनार माजी जि.प.सदस्य उध्दव मराठे, तहसिलदार दिपक पाटील, सार्वजानिक बांधकाम विभागाचे अभियंता डी.एम.पाटील, ईश्वर परदेशी, सुनिल जाधव, वरखेडीचे ग्रामपंचायत सदस्य जगदीश चौधरी, विजय भोई, दिपक बागुल यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी सहकार राज्यमंत्री ना.पाटील म्हणाले, गेल्या बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली होती.  जिल्ह्यातील प्रसिध्द यात्रोत्सवापैकी एक असलेल्या भैरवनाथांच्या यात्रेस सुरवात होत असून, या झालेल्या रस्त्याच्या कामामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून राज्यात एकाचवेळी 730 कि.मी. लांबीचे नवीन रस्ते तर 30 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सुधारीकरण करण्यात येत असून रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
            2019 पर्यंत रस्त्यांबाबत महाराष्ट्राची स्थिती बदलेल. रस्त्यांची कामे करत असताना नवीन भूसंपादन केले जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जे रस्ते आहेत त्यांचा वापर केला जाईल. मात्र त्यावरील अतिक्रमणे काढली जातील. यासाठी नागरीकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. याबरोबरच या कामांसाठी गुणवत्तेच्या आधारावर ई-टेंडरद्वारे कंत्राटदार निर्धारीत केले जातील. त्यात कोणीही ढवळाढवळ करु नये. कंत्राटदारांकडून कामे गुणवत्तापूर्ण होत आहेत किंवा नाहीत याचीही जनतेने पाहणी करावी. चांगल्या कामासाठी सहकार्य करा, राज्याला निधीची कमतरता नाही, आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या जातील, सगळे मिळून विकास करु, जनतेने बदल सर्वार्थाने स्वीकारावा, असेही ना.पाटील यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावखेडा-चिचफाटा,  लोहारी-वाणेगांव या रस्त्यांचे भुमीपूजन करुन लोहारी गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा  ना.पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.


* * * * * * * *

ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट ग्राहक बना : बाबासाहेब चंद्रात्रे


ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट ग्राहक बना
                                                 : बाबासाहेब चंद्रात्रे
            चाळीसगांव, दिनांक 24 :-  लोकशाही अर्थव्यवस्थेत ग्राहकाचे महत्व मोठया प्रमाणावर आहे. परिस्थितीच्या अभ्यासाने मतदान करुन समाजाच्या अर्थव्यवस्थेला वळण लावण्याचे सामर्थ्य या ग्राहकांकडे आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरीक एकाच वेळी मतदारासोबत ग्राहक पण असतो. दुखावलेला ग्राहक हा रागावलेला मतदार असतो. मतदाराची इच्छा, अधिकार दाबून जसे प्रजातंत्र उभे राहणार नाही. त्याचप्रमाणे अर्थक्षेत्रात ग्राहकांचे अधिकार इच्छा दाबून सामाजिक अर्थव्यवस्था उभी राहणार नाही आणि राहिली तरी ती कल्याणकारी असणार नाही. म्हणून माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असून ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट सिटी प्रमाणेच स्मार्ट ग्राहकही बना असे  प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांनी आज आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले. महसूल प्रशासन व ग्राहक पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय ग्राहक दिन-२०१६ या कार्यक्रमाचे तहसिल कार्यालय चाळीसगांव येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे, तर कार्यक्रमाचे उद्‌घाटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती आशालता चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, विश्वास चव्हाण, किसनराव जोर्वेकर, ग्राहक पंचायतीचे सदस्य सर्वश्री विकास वाणी, अरुण पाटील, यशवंत सोनवणे, सर्पमीत्र राजेश ठोंबरे, ॲड.जितेंद्र पोतदार, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, वाय.आर.पाटील, तहसिलदार कैलास देवरे, तालुका कृषी अधिकारी श्री.राजपुत, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आर.डी.चौधरी  यांच्यासह पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की, अर्थ व्यवस्थेत ग्राहकाचे महत्व असूनही त्याचे अस्तित्व ओळखण्यास कोणी तयार नाही. महागाई, फसवणूक या भडकत्या ज्वालांमध्ये तो रोज होरपळून निघत आहे.  ग्राहक हे आमचे माय-बाप आहेत असे म्हणतच या ग्राहकांचे प्रत्येक व्यवहारात शोषण होत आहे. ग्राहकांचे मोठया प्रमाणावरील अज्ञान, उदासीन वृत्ती, त्याचे असंघटीत स्वरुप यामुळे विक्रीव्यवहारात संघटित व्यापारी वर्गाच्या पुढे हा ग्राहक दुबळा होत आहे. मी स्वत:  व्यापारी वर्गात असूनही मी या विषयावर स्पष्टोक्ती देतांना मला अभिमान वाटतो कारण ग्राहकांचे प्रबोधन होऊन त्यांना न्याय मिळण्यातच मी धन्यता मानतो.  ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर, १९८६ साली पारित झाला असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होऊन प्रत्येक ग्राहकाने ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट ग्राहक होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यानी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे  प्रास्ताविकातून बोलतांना म्हणाले की, ग्राहकांच्या हितसंबंधाचे अनुचित प्रथांपासून संरक्षणे करणे हे आज ग्राहक चाळवळीपुढील मोठे आव्हान आहे. त्यासाठी करावी लागणारी ग्राहक जागृती, वेळप्रसंगी द्यावे लागणारे न्यायालयीन लढे हे सगळेच आव्हानात्मक आहे. कधी ही लढाई असते एकट्याची, त्यासाठी वेळप्रसंगी ग्राहक संघटनांची मदतही घ्यावी लागते, तर कधी ग्राहक संघटना व्यापक ग्राहक हित लक्षात घेऊन प्रतिनिधीक लढे लढतात. पण त्यासाठी समाजातील प्रत्येक ग्राहकाचे सक्षमीकरणे होणं ही काळाजी गरज असल्याचेही तहसिलदार श्री.देवरे यावेळी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे म्हणाले, प्रत्येकवेळी निरक्षर ग्राहक नाडला जातो. नोटबंदीमुळे निरक्षर ग्राहक हा ऑनलाईन पेमेंट पध्दतीमुळे नाडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रत्येक ग्राहकाने आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सर्वकष ज्ञान प्राप्त करणे गरजेचे असून जाहिरात बाजीमुळे होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणूकीपासून सावध राहीले पाहिजे. व  ग्राहकांच्या हक्कासोबत ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान संपादन करुन जागृत ग्राहक बनले पाहिजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुरवठा निरिक्षक संदेश निकुंभ यांनी केले तर आभार नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.

* * * * * * * *

Friday, 23 December 2016

अपुर्ण घरकुले डिसेंबर अखेर पुर्ण करा : प्रकल्प संचालक विक्रांत बागडे

अपुर्ण घरकुले डिसेंबर अखेर पुर्ण करा : प्रकल्प संचालक विक्रांत बागडे
            चाळीसगांव, दिनांक 23 :-  इंदीरा आवास योजनेतंर्गत सन 2010-11 ते सन 2015-16 पर्यंतची अपुर्ण घरकुले डिसेंबर-2016 पर्यंत पुर्ण न केल्यास संबंधितांकडून घरकुलांचे अनुदान वसुल करण्याबाबतची कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बागडे यांनी दिल्या.
            शहरातील सिंधी हॉल येथे नियोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) राजन पाटील, गट विकास अधिकारी अनिल राणे, सहाय्यक गट विकास अधिकारी बी.एस.बागुल, नरेगाचे गटविकास अधिकारी जि.प.जळगांव श्री.चित्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ.लांडे, विस्तार अधिकारी के.एन.माळी, उप अभियंता श्री.बाफणा, पंचायत समिती अंतर्गत असलेले सर्व विभाग प्रमुखांसह सर्व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            या आढावा बैठकीत सन 2010-11 ते 2015-16 पर्यंतच्या अपुर्ण घरकुलांचा वैयक्तीक ग्रामपंचायत निहाय आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत प्रकल्प संचालक श्री.बागडे यांनी  पंचायत समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत तालुक्यातील अपुर्ण घरकुलांबाबत तात्काळ पाठपुरावा करुन संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेशही त्यांनी या आढावा बैठकीत दिले.
            या बैठकीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) राजन पाटील यांनी स्वच्छ भारत अभियानातंर्गत वैयक्तीक शौचालयाच्या कामकाजाबाबत आढावा घेतला असता मार्च 2017 पर्यंत कृती आराखड्यात समाविष्ट 36 गावे ओडीएफ (उघड्यावर शौचविधीपासून मुक्त) करण्याबाबतच्या सुचना उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. तसेच स्वच्छ भारत अभियानातंर्गत कृती आराखड्यात समाविष्ठ ग्रामपंचायतींव्यतीरीक्त इतर ग्रामपंचायतींनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शौचालयाची कामे पुर्ण करण्याचे आवाहन केले.

* * * * * * * *

चाळीसगाव नगर परिषदेने घेतला स्वच्छतेचा ध्यास


चाळीसगाव नगर परिषदेने घेतला स्वच्छतेचा ध्यास
            चाळीसगांव, दिनांक 23 :-  चाळीसगाव नगर परिषदेतर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाची सुरवात नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन केली. यावेळी कार्यालयीन अधिक्षक विजय खरात, अभियंता राजेंद्र पाटील, संजय अहिरे, सचिन राजभोज, गणेश लाड, स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, दिलीप चौधरींसह कार्यालयीन कर्मचारी, वॉर्ड मुकादम व सर्व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने  स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत कार्यक्रमाची अंमलबजावणी म्हणून सकाळी 09:00 वाजता नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णास्मृती उद्यानात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत श्रमदान स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संपुर्ण उद्यानाची साफसफाई करुन जमा करण्यात आलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलण्यात आला. या स्वच्छता मोहिमेस नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला असून या प्रमाणेच स्वच्छता अभियान यापुढेदेखील अविरतपणे सुरु ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री.भालसिंग यांनी कळविले आहे.

* * * * * * * *

Thursday, 22 December 2016

चांगल्या कामाव्दारे आपली ओळख निर्माण करा : आयुक्त एकनाथ डवले


चांगल्या कामाव्दारे आपली ओळख निर्माण करा : आयुक्त एकनाथ डवले
चाळीसगांव, दिनांक 23 :- शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतांना कामाचे स्वरुप आता व्यापक झाले आहे. त्यामुळे पुरस्कार स्विकारतांना आपल्या चांगल्या कामाव्दारे आपली ओळख निर्माण करा असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
विभागीय आयुक्तालयाच्या नियोजन सभागृहात विभागीय महसूल दिनानिमीत्त चाळीसगावचे तत्कालीन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, पाचोऱ्याचे त्तकालीन प्रातांधिकारी गणेश मिसाळ तर चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा गौरव श्री.डवले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त जे.टी. पाटील, उपायुक्त सर्वश्री डॉ.संजय कोलते, श्री.गावडे, श्री.मित्रगोत्री, श्री.खिलारे, उपसंचालक (नगर प्रशासन) श्री. कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सन 2014-15 आणि सन 2015-16 या दोन वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा श्री. डवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.डवले म्हणाले, गेली दोन वर्ष विविध नैसर्गिक परिस्थितीमुळे आपण ऑगस्ट महिन्यात हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही. कारण आपले प्राधान्य पूरपरिस्थिती नियंत्रण, निवडणुका आणि अन्य शासकीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणी हे होते. यावेळी आपण दोन्ही वर्षातील उत्कृष्ट अधिकाऱ्यांना गौरवले आहे.
प्रत्येक अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची चांगली अंमलबजावणी केली. नागरिकांना वेळेवर चांगली सेवा दिली तर त्या कामाची आपोआप पोच मिळत असते. महसूल विभागाच्या कामांचा व्याप वाढला असला तरी हे व्यापक स्वरुपाचे काम आहे. जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजनांची अंमलबजावणी असेल अथवा महाराजस्व अभियान तसेच आता सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले तर त्याचे कौतुक निश्चितच होते, असे ते म्हणाले.
अपर आयुक्त श्री. पाटील यांनी काम करताना सांघिक भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले.
सुरुवातीला उपायुक्त डॉ. कोलते यांनी प्रास्ताविक केले.  सत्कारार्थींच्या वतीने महेश पाटील, मनोज घोडे पाटील, नितीन पाटील, मीनाक्षी राठोड, अमित पवार, एस.डी. पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सन-2014-15 या वर्षातील पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांची नावे
नायब तहसीलदार - एस.जी.पवार, पी.जे.कुलकर्णी, विजय बनसोडे, पी.ए.कासोळे, आर.व्ही. सुराणा.
तहसीलदार - बबन काकडे, नितीन पाटील, महेश शेलार, मीनाक्षी राठोड, शरद घोरपडे
उपजिल्हाधिकारी - महेश पाटील, उदय किसवे, विठ्ठल सोनवणे, नितीन गावंडे, गणेश मिसाळ, वामन कदम.
सन-2015-16 या वर्षातील पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांची नावे
नायब तहसीलदार - अमित पवार,  मिलींद वाघ, आर.डी. तडवी, सुनील समदाणे, सुरेश भालेराव.
तहसीलदार - कैलास पवार,  दत्ता शेजूळ, कैलास देवरे, प्रमोद भामरे, सुधीर पाटील
उपजिल्हाधिकारी - बाळासाहेब वाकचौरे, राहूल पाटील, सुनील गाडे, मनोज घोडे-पाटील, रविंद्र ठाकरे.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विवेक उपासनी यांनी केले तर आभार तहसीलदार मंजुषा घाटगे यांनी मानले.

* * * * * * * *

चाळीसगावात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

चाळीसगावात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
चाळीसगांव, दिनांक 22 :-  तालुका प्रशासनाच्या वतीने शनिवार दिनांक 24 डिसेंबर, 2016 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. उप विभागीय अधिकारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11:00 वाजता तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून तहसिल कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वजन माप, अन्नभेसळ, विज वितरण, घरगुती वापरावयाचा गॅस संबंधीच्या प्रदर्शनाचे  देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
            या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव एज्यकेशन सोसायटीचे सचिव बाबासाहेब चंद्रात्रे,   तालुका व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पंचायत समिती सभापती श्रीमती आशालता साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, ग्रंथमित्र तथा ग्राहक संरक्षण समितीचे आण्णा धुमाळ, तालुकाध्यक्ष  रमेश सोनवणे, लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती आशालता साळुंखे
हे उपस्थित राहणार आहेत.
            तरी आयोजित कार्यक्रमातील चर्चासत्र व प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.


* * * * * * * *

चाळीसगावात भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन


चाळीसगावात भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
चाळीसगांव, दिनांक 22 :-  तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 19 ऑक्टोंबर, 2016 च्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तालुकास्तरावर सन 2016-17 या खरीप पणन हंगामात किमान आधारभुत किमतीवर ज्वारी/बाजरी/मका या भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी सहकारी संघात भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या खरेदी केंद्राचे उद्घाटन तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन शशीकांत साळुंखे, उपाध्यक्ष अभय सोनवणे, संचालक जालम पाटील, तहसिलदार कैलास देवरे, भाऊसाहेब पाटील, शिवाजी आमले, किशोर देशमुख, नानासाहेब पाटील, बापू राठोड, विश्वास चव्हाण, सुभाष पाटील, किशोर देशमुख, नानासाहेब पाटील, सुर्यकांत वाघ, जयाजी भोसले,  गोडावून व्यवस्थापक राजेंद्र कुऱ्हेकर आदि उपस्थित होते
या भरडधान्य खरेदी केंद्रावर खरेदी करण्यासाठी अभिकर्ता म्हणून जिल्हा मार्केटींग फेडरेशन तर उप अभिकर्ता म्हणून शेतकरी सहकारी संघ लि. चाळीसगाव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरची खरेदी ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे खडकी बु. शिवारातील गोदामात करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार कैलास देवरे यांनी कळविले आहे.
तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर भरडधान्य विक्री करण्यासाठी आणतांना स्वच्छ व कोरडे (विक्री योग्य) तसेच ज्वारी, बाजमी, मका यांची 14 टक्के इतके आद्रता असलेलेच धान्य खरेदी करण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी, व अधिकाधिक शेतकऱ्यांनी या भरडधान्य खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.


* * * * * * * *

Tuesday, 20 December 2016

तालुक्याला समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेणार : आमदार उन्मेश पाटील


तालुक्याला समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेणार
                                                              : आमदार उन्मेश पाटील
            चाळीसगांव, दिनांक 20 :-  तालुक्यातील विकास कामांना गती देऊन लोकाभिमुख योजना राबविण्यासह तालुक्याला समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेणार असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत केले.
            यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमती आशालता साळुंखे, समिती सदस्य सुभाष चौधरी, भाऊसाहेब जगताप, भाऊसाहेब खैरनार, संजय पाटील, सुनंदा पाटील, लीलाबाई पाटील, अभिलाषा अहिरे, तहसिलदार कैलास देवरे, न.पा.मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, गट विकास अधिकारी श्री.राणे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, उप अधिक्षक भुमी अभिलेख श्री.अहिरे, शशीकांत साळुंखे, नवोदय राठोड, सर्व ग्रामसेवक आदि उपस्थित होते.
            यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी कामचुकार अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी मनरेगाच्या कामाचा आढावा घेतांना समृध्द महाराष्ट्राची संकल्पना मांडत रोजगार हमी योजनेच्या 11 कलमी कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती देत ही योजना गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामसेवक हा महत्वाचा घटक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत गोठे वाटपाची योजना राबवितांना दुधाळ जनावरांची घ्यावयाची काळजी व डेअरी एक्स्पोच्या माध्यमातून शिबीरांचे आयोजन करुन शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्याच्या सुचना ग्रामसेवकांना दिल्या. याच माध्यमातून तालुका समृध्दीकडून धवलक्रांतीकडे नेऊन तालुक्याचे गतवैभव प्राप्त होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            प्राथमिक आरोग्य केंद्रानी शासनाच्या सुरक्षित मातृत्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच येत्या 29 डिसेंबर रोजी तालुक्यात माताबालसंगोपनासह नेत्र तपासणी शिबीराच्या यशस्वीतेसाठी योगदान देण्याच्या सुचना केल्या. एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत तालुका कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त करत तालुक्यातील 43 कुपोषीत बालकांसाठी दत्तक पालक योजना राबवून तालुक्यातून कुपोषणाचे समुळ उच्चाटन करण्याच्या सुचना केल्या. विज वितरण कंपनीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे यांचे कौतुक केले तर धामणगांव येथील 132 के.व्ही. प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना केल्या. कृषी विभागामार्फत लाभार्थी योजना राबवितांना लोकप्रतिनीधींना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत कृषी विभागाने सुपा बायोटेकच्या सहकार्याने खतयुक्त शिवार योजना तयार करुन तालुक्यात राबविण्याच्या सुचना केल्या. मुद्रा योजनेतंर्गत लिड बँकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन तात्काळ आढावा बैठक लावण्याच्या सुचना सहकार विभागास देण्यात आल्या. सामाजिक वनिकरणाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाच्या मंजूरीसह निधी उपलब्ध असतांनाही स्व.उत्तमराव पाटील वन उद्यानाचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.  वन विभागाचा वन्यजीव विभागामार्फत ग्राम परिस्थितीकीय विकास समित्या गठीत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देऊन आठवड्याभरात समित्या गठीत करुन गॅस वाटपाबाबत नियोजन करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या. कॉक्रीटीकरणाच्या कामातील कामाचा निकृष्ट दर्जा खपवून घेणार नाही. झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडीट करण्यात येणार असून दलीत वस्ती सुधार योजनेतील मंजूर कामात दिरंगाई चालणार नसल्याचे सांगत पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठीचा प्रस्ताव 15 दिवसात दाखल करण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाला देण्यात आल्या.
            नोटबंदीमुळे नागरिकांनी कॅशलेस व्यवहारांवर भर देऊन व्यवहार सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यात पहिली आय.एस.ओ.मानांकन मिळविणारी चितेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती पांडे यांचा आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रस्तावना तहसिलदार कैलास देवरे यांनी तर आभार नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.


* * * * * * * *

Wednesday, 14 December 2016

कौशल्य विकासामुळेच स्वावलंबी होण्यास मदत : श्रीकृष्ण भालसिंग


कौशल्य विकासामुळेच स्वावलंबी होण्यास मदत : श्रीकृष्ण भालसिंग
            चाळीसगांव, दिनांक 14 :- कौशल्य विकासामुळे उमेदवाराच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्याच्यातील व्यवसाय क्षेत्र निवड, करिअर पसंती ओळखुन तो स्वावलंबी होण्यास मदत होते असे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी आज केले.
            कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने शहरातील बापजी रुग्णालयाच्या आवारात आयोजित भव्य अशा महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती संपदा पाटील, सहाय्यक संचालक प्र.ग.हरडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.राजपूत, जिवनदिप कौशल्य विकास संस्थेचे संचालक डॉ.संदीप देशमुख, डॉ.देवरे यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व तालुक्यातील बेरोजगार तरुण, तरुणी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी श्री.भालसिंग म्हणाले. सुशिक्षीत बेरोजगार व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनीधी यांना एका छताखाली आणून उमेदवारांमधील कौशल्य ओळखून त्यांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. कौशल्य विकास ही अशी कार्यपध्दती आहे, ज्याचे उद्दिष्ट उमेदवारांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यात वाढ करणे व त्यास योग्य व्यवसाय/क्षेत्र निवडण्यास प्रवृत्त करणे. एखाद्या उमेदवाराच्या करियरच्या पसंतीबाबत मुल्यमापन करुन त्याच्या जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणारी ही अखंड प्रक्रिया आहे. व्यवसाय मार्गदर्शनामुळे व्यक्तिमत्व विकास व नोकरीक्षम कौशल्यामध्ये वाढ होण्यास मदत होऊन जीवनातील प्रत्येक संकटावर मात करणे शक्य होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. हे मेळावे यापुर्वी जिल्हास्तरावर आयोजित केले जात असत त्याला मिळणार प्रतिसाद व उमेदवारांना स्थानिक ठिकाणी सोय व्हावी या उद्देशाने सदर मेळावे तालुका स्तरावर घेण्यात येत आहेत. या महारोजगार मेळाव्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांसह उद्योजकांची देखील मोठ्या प्रमाणात सोय होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
            यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती संपदा पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणीक प्रमाणपत्र मिळविण्यापुरता मर्यादीत अभ्यासक्रम पुर्ण न करता स्वत:मधील कला गुणांना वाव देऊन कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. शासनामार्फत राबविण्यात येणारा महारोजगार मेळावा हा उपक्रम स्तुत्य असून याचा तालुक्यातील बेरोजगारांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करीत उमेदवारांना भावी वाटचालीस त्यांनी  यावेळी शुभेच्छा दिल्या.
            यावेळी रोजगार मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करतांना सहाय्यक संचालक प्र.ग.हरडे म्हणाले की, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सर्व सुशिक्षीत बेरोजगारांना www.maharojgar.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांचे मुल्यमापन व समुपदेशनासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा आहे.  या संकेतस्थळावर विविध प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, स्पर्धात्मक परिक्षा, विविध अभ्यासक्रमाबाबत माहितीचा शोध घेण्याची ऑनलाईन सुविधा देण्यात आली असून याचा सर्व उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तर या ऑनलाईन सुविधेबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, महाराष्‍ट्रामधील कोणत्‍याही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्‍ये नोंदणी केलेल्‍या नोकरीइच्छुक उमेदवारास व नोंदणीकृत उद्योजकांना अशा रोजगार मेळाव्‍यांमध्‍ये सहभाग घेता येतो. रोजगार मेळाव्‍यामध्‍ये उद्योजकांना त्‍याच ठिकाणी तात्‍काळ आवश्‍यक असे कुशल मनुष्‍यबळ उपलब्‍ध होते तसेच नोकरीइच्छुक उमेदवारांना जागेवरच नोकरी मिळू शकते. रोजगार मेळावे ही योजना महाराष्‍ट्रातील सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये राबविण्‍यात येते ती संकल्पना आता तालुकास्तरावर देखील सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            या महारोजगार मेळाव्यामध्ये सहा मोठ्या उद्योजकांसह तालुक्यातील 22 व्ही.टी.पी.सेंटरचे प्रमुख व सहा मागासवर्गीय विकास महामंडळांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अरुण खैरनार यांनी केले तर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी एस.बी.पाटील, व्ही.एम.काळे यांनी परिश्रम घेतले.
223 उमेदवारांची प्राथमिक निवड
या रोजगार मेळाव्यास तालुक्यातील बेरोजगारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तालक्यातील 400 उमेदवारांनी यात सहभाग नोंदविला तर यामध्ये एकूण 223 उमेदवारांची प्राथमिक निवडही यावेळी करण्यात आली. यामध्ये वेरॉक  प्रा.लि.औरंगाबाद यांनी आय.टी.आय.प्रशिक्षीत 43 उमेदवारांना, धुत ट्रान्समिशन औरंगाबाद यांनी आय.टी.आय.प्रशिक्षीत 69 उमेदवारांना तर नवनाथ फर्टीलायझर औरंगाबाद यांनी 57 , नवकीसान बायोटेक, जळगांव यांनी 32, कोजेट कॉलसेंटर बडोदा यांनी 22 उमेदवारांची जागेवर प्राथमिक निवड करुन नेमणूकीचे आदेश दिले. नेमणूक झालेल्या उमेदवारांना सुमारे 8 ते 10 हजारापर्यंत मासिक वेतनाची सुवर्णसंधी या रोजगार मेळाव्यातून उमेदवारांना मिळाल्याचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांवचे सहाय्यक संचालक प्र.ग.हरडे यांनी कळविले आहे.

* * * * * * * *

Tuesday, 13 December 2016

चाळीसगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन बेरोजगारांनी लाभ घ्यावा : प्र.ग.हरडे सहाय्यक संचालक

चाळीसगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन
बेरोजगारांनी लाभ घ्यावा
                                                : प्र.ग.हरडे सहाय्यक संचालक
            चाळीसगांव, दिनांक 13 :-  तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव यांच्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 10:00 वाजता बापजी हॉस्पीटल, नगरपालीकेच्या बाजूला, चाळीसगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील बेरोजगारांनी मोठ्या संख्येने या रोजगार मेळ्याव्यास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन प्र.ग.हरडे, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 180 रिक्तपदांची मागणी अधिसूचित केली असून नियोक्त्यांकडून देण्यात येणाऱ्या वेतनासह इतर सवलतींबाबत रोजगार मेळाव्यात संबंधित कंपनीचे अधिकारी माहिती देणार आहेत. तर बेरोजगार तरुणांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन विषयी महाराष्ट्र बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. रोजगार मेळाव्यात उद्योजकांकडील विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने  10 वी,  12 वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय. व पदवीधरांनी  रोजगार मेळाव्यास येतांना आपली शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक संचालक श्री.हरडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *