Saturday, 12 April 2014

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी हे मतदान प्रक्रियेतील महत्वाचे घटक : निवडणुक निरीक्षक डॉ.अवतारसिंग


मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी हे
 मतदान प्रक्रियेतील महत्वाचे घटक
                                                          : निवडणुक निरीक्षक डॉ.अवतारसिंग

            चाळीसगाव, दिनांक 12 एप्रिल :-  मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी हे मतदान प्रक्रियेतील महत्वाचे घटक असुन आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ही निष्ठापुर्ण व निपक्षपातीपणे पार पाडण्याची महत्वपुर्ण जबाबदारी ओळखुन कामकाज केल्यास अडचण येणार नाही असे मुख्य निवडणुक निरीक्षक डॉ.अवतार सिंग यांनी चाळीसगांव येथील वैभव मंगल कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना सांगितले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  काय करावे व काय करु नये याविषयीचे मार्गदर्शन करुन अंध व अपंग मतदारांच्या मतदानाविषयीची कार्यपध्दतीही त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचा-र्यांना समजावून सांगितली.
                या वेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सोनार, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार सुर्यवंशी, मंडळ अधिकारी निकुंभ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी  म्हणून  यावेळी तब्बल 1500 अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षण शिबीरास उपस्थित होते.
                या प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदान केंद्रामध्ये छायाचित्र किंवा चित्रीकरण करण्यास निवडणुक आयोगाने मनाई केली आहे. तरी मतदान केंद्रामध्ये छायाचित्र अथवा चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्याबाबत सांगितले. त्याच बरोबर मॉकपॉल चे प्रात्यक्षिक देणे, घोषणापत्र, अहवाल व विविध नमुने भरण्याविषयी आवश्यक ते मार्गदर्शनही प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थितांना केले. त्याच बरोबर याठिकाणी मतदार मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी निवडणुक कर्तव्यावर असणा-या सर्व अधिकारी कर्मचा-यांनी आपल्या स्वत:च्या मतदानासाठी ई.डी.सी. फॉर्म भरुन देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणु‍क निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची पहाणी
निवडणुक प्रशिक्षणांनतर मुख्य निवडणुक निरीक्षक डॉ.अवतार सिंग यांनी  अल्पसंख्याक असलेल्या मतदान केंद्रांना  तसेच तालुक्यातील दुर्गम भागातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रांची पहाणी व तेथील सोयी सुविधांविषयीची सर्व माहिती जाणून घेतली यावेळी त्यांच्या समवेत तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख मुख्याधिकारी रविंद्र जाधव व महसुल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पहाणी दरम्यान त्यांनी  चाळीसगांव शहरातील मतदान केंद्र काद्रीया एज्युकेशन तहसिब हायस्कुल येथील मतदान केंद्र क्रमांक 204 ते 209 तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीतील  मतदान केंद्र कं. 219 तसेच राष्ट्रिय विद्यालय येथील मतदान केंद्रं. क्रं. 187, 190 व 197 यांच्यासह ग्रामीण भागातील टाकळी, पिलखोड येथील मतदान केंद्रांची पहाणी केली. तसेच मतदान साहित्य ठेवण्यात येणा-या स्ट्राँग रुमची पहाणी देखील निवडणुक निरीक्षकांनी  यावेळी केली व चाळीसगांव प्रशासनाने केलेल्या निवडणुक कार्यक्रमाच्या तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  
निवडणु‍क कामात हलगर्जीपणा करणा-यांवर कडक कारवाई करणार : प्रांताधिकारी मनोज घोडे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 ची जबाबदारी ज्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी या कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याच्या सुचनाही सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी या प्रशिक्षण शिबीरात केल्या आहेत. तसेच या प्रशिक्षण शिबीरास अनुपस्थित राहणा-या कर्मचा-यांना देखील नोटीसा बजावून त्यांच्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या बाबतचे खुलासा पत्र मागविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीची जबाबदारी म्हणजे केवळ डयुटी म्हणून नाही तर आपणही देशाचे नागरिक असुन देशाचे आपण काही देणे लागतो, तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आपलाही हातभार याठिकाणी लागावा ही भावना मनात ठेवून कर्तव्य बजवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment