Saturday, 29 June 2013

आजारी , बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजना



        जळगांव, दि. 29 :- पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळातर्फे दि. 2 मे 2013 पासून सामुहिक प्रोत्साहन योजनेखाली पूनर्जीवनक्षम नसलेल्या आजारी बंद उद्योग घटकांसाठी विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. अशा उद्योग घटकांना विशेष अभय योजनेव्दारे सुलभ निर्गमन पर्याय (इझी एक्झिट ऑप्शन) उपलब्ध करुन देण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. सदरहू योजना एक वर्षासाठी लागू राहील.
        या योजनेचा फायदा घेण्यासाठी उद्योग घटकाने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या कुबेरा चेंबर्स, दुसरा मजला, संचेती हॉस्पीटल समोर, शिवाजीनगर, पुणे 411005 येथील कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

शासनमान्यता प्राप्त नसलेल्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊ नये



       जळगांव, दि. 29 :- ज्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांना केंद्र सरकार डी. जी. ई. टी नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त आहे. अशाच व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये उमेदवारांनी  प्रवेश घ्यावे. कोणत्याही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अथवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण  केंद्रातील व्यवसायास / तुकडीस केंद्र सरकार डी. जी. ई. टी. नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त नसेल तर सदर अभ्यासक्रमासाठी  प्रवेश घेवू नये.
          केंद्र सरकार डी. जी. ई. टी. नवी दिल्ली यांची सलग्नता प्राप्त नसलेल्या शासकीय  / अशासकीय संस्थेतील व्यवसाय / तुकडयामध्ये जर कोणीही  प्रवेश घेतल्यास सदर विद्यार्थ्याना अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेस (NCVT) बसता येणार नाही,  त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार, पालक व संस्थेची राहिल. संचालनालय / शासन त्याबाबत जबाबदार राहणार नाही, यांची नोंद घ्यावी.
        संलग्नता प्राप्त संस्थाची / केंद्राची यादी संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, किंवा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्याकडे उपलब्ध आहे.
          काही शंका असल्यास उमेदवारांनी अधिक माहितीसाठी या संचालनालयाच्या विभागीय कार्यालय तथा संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण अधिकारी, यांच्याशी संपर्क साधावा विभागीय कार्यालयाचे तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे पत्ते व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या  (www.dvet.gov.in ) या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

कायम विना अनुदान तत्वावर प्रशिक्षण संस्था सुरु करणेसाठी ऑन लाईन अर्ज करावे



             जळगांव, दि. 29 :- खाजगी / शासनाचे उपक्रम / मालकीचे उपक्रम, कंपनी एक्ट्खाली नोंदणीकृत आस्थापना किंवा स्पेशल एकॉनॉमी झोनचे प्रमोटर्स ( SEZ) किंवा सोसायटी / ट्रस्टखाली नोंदणीकृत इच्छूक संस्थांकडून कायम विना अनुदान तत्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे, विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत नवीन व्यवसाय  / जादा तुकडी सुरु करणे, विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तिसरी पाळी सुरु करणे ( फक्त अ दर्जा प्राप्त  संस्थांना लागू) अनुदानित / विना अनुदानित  / अभियांत्रिकी  महाविद्यालये / तंत्रनिकेतने यामध्ये कायम विना अनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रमाची दुसरी पाळी सुरु करण्यासाठी नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करतांना  / विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत नवीन व्यवसाय / जादा तुकडी सुरु करतांना संस्थेस एकाच व्यवसायाच्या 2 तुकडयांकरिता एकत्रित अर्ज करणे आवश्यक आहे. ( उदा. जोडारी 1 ली व 2 री तुकडी  विजतंत्री 1 ली व 2 री तुकडी )
             विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन मागविण्यांत येत आहेत. हा अर्ज संचालनालयाची वेबसाईट  www.dget.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छूक नोंदणीकृत संस्थांनी पात्रतेच्या अटी, अर्ज करण्याची पध्दती, अर्जावर होणारी कार्यवाही व इतर सविस्तर माहिती या वेबसाईटवरुन उपलब्ध करुन द्यावी. तसेच यापूर्वी केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यांची ऑनलाईन प्रकिया ही पूर्ण वर्षभर सुरु राहील. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करतांना काही अडचण उदभवल्यास 022-22620603 या क्रमांकावर , desk12@dvet.maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा अडचणीबाबत व इतर पत्रव्यवहार फक्त ई-मेल व्दारेच करण्यात यावा.

2 जुलै रोजी अप्रेंटीस भरती मेळावा



            जळगांव दि. 29 :- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जळगांव या कार्यालयाने दि. 2 जुलै 2013 रोजी अधिक दोन स्तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांतील इयत्ता 12 वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी (ॲप्रेंटिस) भरती मेळावा शासकीय तांत्रिक विद्यालय, जी. एस. ग्राऊंडच्या बाजुला, जळगांव येथे सकाळी 12.30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन  जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जळगांव यांनी केलेले आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी रोख व्यवस्थापन प्रणालिची पूर्तता करावी



          जळगांव, दि. 29 – जळगांव कोषागाराअंतर्गत असलेल्या एकूण 166 आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, शासन निर्णय वित्त विभाग दि. 22 जानेवारी 2013 अन्वये सी. एम. पी. (रोख व्यवस्थापन प्रणाली) व्दारे थेट आदात्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करणेबाबत आदेशित केलेले आहे. सदर प्रणालीची अंमलबजावणी होणेसाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अदाता नोंदणी आवेदन पत्र भरुन कोषागारात तात्काळ सादर करावीत. गोपनीय पासवर्ड पाकीटासोबत दिलेला युझर किएशन फॉर्म ( पोर्टल फॉर्म) भरुन कोषागाराकडे सादर करावा, कोषागारातून फाईल ॲप्रुव्ह करणेसाठी युझर आयडी व पासवर्डचे सीलबंद पाकीट प्राप्त करावे.
            वापरकर्त्याना युझर आय. डी. व पासवर्ड चे हस्तातंरण करतांना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचे कडून विहीत नमुन्यात फॉर्म भरुन घेऊन तो स्टेट बॅक ऑफ इंडिया यांचेकडे या कोषागारामार्फत पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दि. 2 जुलै 2013 पर्यत वरील बाबींची पुर्तता करुन समक्ष या कोषागारात 2 प्रकारचे फॉर्म दाखल करुन व गोपनीय पासवर्डचे पाकीट घेवून जाण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यांनी केले आहे.

Friday, 28 June 2013

कृषी व पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम



जळगांव, दि. 28 :- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
             शनिवार दिनांक  29 जून 2013 रोजी सकाळी 7.30 वा. महाराष्ट्र एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 9 ते 11 वा. निवासस्थानी आगमन व राखीव, सकाळी 11 ते 12 वा. भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 12.00 वा. जळगांवकडे शासकीय वाहनाने प्रयाण, दुपारी 1.00 वा. पदमालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आगमन व राखीव, दुपारी  1.30 वा. वडाळा - वडाळी ता. चाळीसगांवकडे  शासकीय वाहनाने प्रयाण, दुपारी 2.30 वा. शहीद गणेश अहीरराव यांचया कुटूंबीयांची सांत्वनपर भेट, दुपारी 3.00 वा. शासकीय वाहनाने जळगांवकडे प्रयाण, दुपारी 4.00 वा. पदमालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आगमन व राखीव, सायं. 5.00 वा. भुसावळकडे शासकीय वाहनाने प्रयाण,  6.00 वा. भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव व मुक्काम.

Thursday, 27 June 2013

जिल्हा नियोजन समितीची बैठक 4 जुलैला



           जळगांव. दि. 27 :- जिल्हा नियोजन समितीची बैठक ना. श्री. संजय सावकारे राज्यमंत्री कृषी, पशुसंवर्धन दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 4 जुलै 2013 रोजी दुपारी 2.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे आयोजित केली आहे. असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांनी कळविले  आहे.

Wednesday, 5 June 2013

तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन



जळगांव-दि.5: महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेअंतर्गत पत्रकारांसाठी शासनाने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार जळगांव जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका १५ जून पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार २५ हजार, द्वितीय १५  हजार आणि तृतीय पुरस्कार १०  हजार रुपये आहे. महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी बातमीदारांनी मे २०१2 ते मे २०१3 या कालावधीमध्ये मोहिमेचे प्रसिद्ध केलेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरिता ग्राह्य धरण्यात येईल. पुरस्कारासाठी दिलेल्या कालावधीत वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफीचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार,  स्तभंलेखक, मुक्‍तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी,  इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अ, , क वर्गवारीतील वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून प्रसिद्ध झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.
एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करून संबंधित संपादकांनी त्याचा अर्ज सादर करावा. बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले असेल तर त्यासंबंधीचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकांनी निवड समितीकडे सादर करावा.
पुरस्काराच्या निवड समितीतील सदस्य स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल, तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल.
जळगांव जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, व्दारा जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा जवळ, 1 ला मजला जळगांव 425001 (दूरध्वनी ०२57- 2229628) यांच्याकडे १५ जून पर्यंत पाठवाव्यात. त्या नंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत.

कापूस पणन महासंघाचे महाकॉट बियाणेच्या दरात कपात



      जळगांव, दि. 5 :- व्यवस्थापकीय संचालक कापूस पणन महासंघ यांचे दि 4 जून 2013 च्या पत्रानुसार महासंघाचे महाकॉट बियाण्यांचे निर्धारीत दर   रु. 930 /- प्रती पॉकेट यामध्ये प्रती पॉकीट रु. 55/- कपात करुन बियाणे  रु. 875/- प्रतीपॉकेट विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
     जळगांव विभागात आज अखेर ‘‘महाकॉट,‘‘ ‘‘महाकॉट-सुपर,‘‘ ‘‘महाकॉट जल‘‘ या तीन वाणांचे 21800 पॉकेट जळगांव, चोपडा धुळे, येवला व पाचोरा येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
    महाकॉट बियाणे रु. 875/- प्रती पॉकेट उपलब्ध आहेत असे विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी  कापूस उत्पादक पणनमहासंघ जळगांव यांनी कळविले आहे

Tuesday, 4 June 2013

क्रीडांगण विकास अनुदान योजना



           जळगांव, दि. 4 :- शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या विभागामार्फत क्रीडांगण विकास योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून सदरची योजना जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव यांचेमार्फत जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे.
            शासनाचे क्रीडा धोरणानुसार या योजनेअंतर्गत जिहयातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच विविध खेळांच्या विकासासाठी कार्यरत असणा-या पंजीबध्द संस्था, क्रीडा  मंडळे, युवक मंडळे, महिला मंडळे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये आणि आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणा-या आश्रमशाळा यांना उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा गुण विकसित करण्यासाठी सुयोग्य क्रीडांगण व क्रीडांगणावर मुलभूत सुविधा जिल्हया मोठया प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, आर्थिक मदत देण्यात येते. त्या अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मीटर अथवा 400 मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडागंणास कुंपण घालणे, विविध खेळांची प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधन गृह बांधणे, पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे या प्रत्येक बाबींकरीता खर्चाचे अंदाजे 50 टक्के किंवा कमाल रुपये 2 लाख यापैकी कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणून दोन हप्त्यात देण्यात येते.
            याकरिता संस्थेच्या मालकीची किंवा दीर्घ मुदतीच्या करारावर ( 33 वर्षाचे वर) उपलब्ध असलेली सुयोग्य आकारमानाची सलग जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे, 200 मीटर अथवा 400 मीटर धावनमार्ग करता येईल अशी सुयोग्य आकाराची व सलग जमीन असणे आवश्यक आहे.
            सदरच्या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज व योजनेविषयीच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यख भेट देवून संपर्क साधावा व दिनांक 30 जून 2013 पर्यत योजनेचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करुन या शासकीय योजनाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील या  कळवितात.                

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या सुवर्ण संधी



         जळगांव, दि. 4 :- संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत दिनांक 8 सप्टेंबर 2013 रोजी घेण्यात येणा-या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता एम्प्लॉयमेंट न्युज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात दिनांक 25 मे 2013 मध्ये प्रसिध्द झालेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जून 2013 आहे. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस  (CDS)  या परिक्षेव्दारे कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येत असते. जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परिक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरुन पाठवतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक शारिरिक वयोगट पात्रतेनुसार पात्र  आहेत अशाच उमेदवारांची निवड परिक्षापूर्व तयारी साठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे करण्यात येणार आहे. सीडीएस परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी http://www.upsconline.nic.in  या वेबसाईट चा वापर करण्यात यावा.
          वयोमर्यादा आय.एम.ए , 02 जुलै 1990 ते 01 जुलै 1995 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, नेव्हल ॲकेडमी 02 जुलै 1990 ते 01 जुलै 1995 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, एअरफोर्स ॲकेडमी 02 जुलै 1991 ते 01 जुलै 1995 च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी 02 जुलै 1989 ते 01 जुलै 1995 च्या दरम्यान जन्मलेले विवाहीत व अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी (महिलांकरिता) 02 जुलै 1989 ते 01 जुलै 1995 च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत मुलं नसलेल्या विधवा पुन्हा विवाह न केलेल्या, मुलं नसलेल्या घटस्फोटीत भारतीय महिला
       शैक्षणिक पात्रता : आय.एम.ए व ओ. टी. ए मान्यताप्राप्त विदयापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा समकक्ष, नेव्हल ॲकेडमी अभियांत्रीकी पदवीधर/ बी.ई , एअरफोर्स ॲकेडमी मान्यताप्राप्त विदयापीठाचा (भौतिक शास्त्र व गणित 10 +2 स्तर विषयासह) पदवीधर किंवा बी. ई
             कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या परिक्षेची तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे (महाराष्ट्रातील नवयुवकांसाठीच) दिनांक 18 जून 2013 ते 31 ऑगस्ट 2013 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. निवास व प्रशिक्षणाची सोय शासनातर्फे मोफत करण्यात आलेली असून भोजन ( दररोज रुपये 54/- घेऊन) अल्पदरात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
            तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे दिनांक 13 जून 2013 रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मुळ प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर त्याची प्रिंट घेऊन मुलाखतीचे वेळेस दाखविल्या शिवाय उमेदवाराची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे वेळी वस्तुनिष्ठ पध्दतीची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे कडून घेतली जाईल.
             अधिक माहिती करीता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253 -2451031- 2451032 येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यख अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे.

चाळीसगांव येथे शासकीय मुलींचे वसतीगृह प्रवेश



          जळगांव, दि. 4 :- चाळीसगांव येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहामध्ये अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, विमुक्ती जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय विदयार्थ्यानींना प्रवेश देण्यात येतो.
          वस्तीगृहामध्ये इयत्ता 8 वी, 11 वी, एफ. वाय.बी.ए. बी. कॉम , बी. एस्सी, व इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून प्रवेश देण्यात येतो. प्रवेशीत विदयार्थीनीना शासनामार्फत मोफत निवास, दोनवेळेचे भोजन, क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, दरमहा 600 प्रमाणे निर्वाह भत्ता, व शालेय गणवेश इत्यादी सोयीसुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. तरी गरजु विदयार्थींनींनी शासकीय वस्तीगृह, चाळीसगांव येथे शासकीय सुटीचा दिवस सोडुन संपर्क साधावा असे अधिक्षिका मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह, चाळीसगांव जि जळगांव यांनी कळविले आहे.

Monday, 3 June 2013

लोकशाही दिनात 52 तक्रारी अर्ज दाखल



जळगांव  दि. 3  :- जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिनात जनतेकडून तक्रारी अर्ज सकाळी 10 ते 12 वेळेत स्वीकारण्यात आले तक्रारी अर्जाचा तपशिल खातेनिहाय पुढीलप्रमाणे .  
अधिक्षक भूमी अभिलेख 7, अधिक्षक अभियंता  म. रा. वि. वि. कंपनी 1,   उप आयुक्त पशुसंवर्धन जळगांव, 1, उप विभागीय अधिकारी पाचोरा 1, उप विभागीय अधिकारी  भुसावळ 1, उप विभागीय  अधिकारी जळगांव 3, जिल्हा पोलिस अधिक्षक, जळगांव 10, भूसंपादन अधिकारी ( पी ए एल ए क्यू) जळगांव 1, महसूल शाखा जि. का. जळगांव 3, गृह शाखा जि. का. 1, जिल्हा पुरवठा अधिकारी  5, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव 7, जिल्हा उपनिबंधक सहकारी  संस्था 3, मुख्याधिकारी  भुसावळ 1, मुख्याधिकारी सावदा 1, तहलिसदार रावेर 1, तहसिलदार एरंडोल 1, तहसिलदार धरणगांव 1, तहसिलदार जळगांव 1, उप प्रादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रक 1, उपवन सरंक्षणक जळगांव 1 अशा एकुण  52  तक्रारी संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे

Saturday, 1 June 2013

बोदवड येथे मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरु


            जळगांव, दि. 1 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय  वसतिगृह बोदवड, जि. जळगांव या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या इयत्ता 8 वी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या गरजू विद्यार्थ्याना कळविण्यात येते की, या वसतिग़ृहात सन 2013-2014 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनु. जमाती, वि. जा. भ. ज. विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय, अनाथ, व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा असल्यास विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. परिपुर्ण भरलेला अर्ज अंतिम परिक्षेचा निकाल लागल्यापासून 15 दिवसांच्या आत वसतिगृहात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम वसतिगृहाच्या प्रवेश अर्जासोबत व कार्यालयात पाहावयास मिळतील. तरी गरजू विद्यार्थ्यानी वसतिगृह प्रवेशासाठी संपर्क साधावा असे गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोदवड, जि. जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.       

अंमळनेर येथे मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात प्रवेश सुरु



              जळगांव, दि. 1 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय (समाजकल्याण) विभागामार्फत अधिक्षिका मागासवर्गीय मुलींचे (नवनिर्मित) शासकीय वसतीगृह अंमळनेर, बस स्टॅडच्या पाठीमागे, दुर्गा हॉस्पीटल जवळ, देशमुख बंगला, अंमळनेर जि. जळगांव या वसतिगृहाकरीता सन 2013 -2014 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिकदृष्टया मागासवर्ग, अपंग, अनाथ. अनु. जाती, अनु. जमाती, वि. जा. भ. ज, विशेष मागासप्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यालय व महाविद्यालय विभागातील गरजू विद्यार्थीनींनीसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रवर्गातील जागेसाठी विद्यालयीन व महाविद्यालयीन विभागाकरिता छापील अर्ज विनामुल्य वाटप सुरु आहे. सदर अर्ज अधिक्षिका मागासवर्गीय मुलींचे (नवनिर्मित) शासकीय वसतीगृह अमळनेर, बस स्टॅडच्या पाठीमागे, दुर्गा हॉस्पीटल जवळ, देशमुख बंगला, अंमळनेर जि. जळगांव येथे उपलब्ध आहेत. वसतीगृह प्रवेश त्या - त्या  प्रवर्गातील राखीव जागेवर गुणवत्तेनुसार दिला जातो. प्रवेशितांना वसतीगृहामार्फत निवास, भोजन,. शैक्षणिक साहित्य, पुस्तके, निर्वाह भत्ता इत्यादी सोई सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात.
           तरी गरजू विद्यार्थीनींनी प्रवेश अर्जासाठी वरील पत्यावर संपर्क साधावा. अर्जासोबत गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो अर्जास लावणे व घरचा दुरध्वनी क्रमांक इत्यादी छायांकित कागदपत्रांची पुर्तता करुन साक्षांकित प्रतित जोडणे आवश्यक आहे.