Wednesday, 5 June 2013

तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन



जळगांव-दि.5: महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेअंतर्गत पत्रकारांसाठी शासनाने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार जळगांव जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका १५ जून पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार २५ हजार, द्वितीय १५  हजार आणि तृतीय पुरस्कार १०  हजार रुपये आहे. महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी बातमीदारांनी मे २०१2 ते मे २०१3 या कालावधीमध्ये मोहिमेचे प्रसिद्ध केलेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरिता ग्राह्य धरण्यात येईल. पुरस्कारासाठी दिलेल्या कालावधीत वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफीचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार,  स्तभंलेखक, मुक्‍तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी,  इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अ, , क वर्गवारीतील वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून प्रसिद्ध झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.
एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करून संबंधित संपादकांनी त्याचा अर्ज सादर करावा. बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले असेल तर त्यासंबंधीचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकांनी निवड समितीकडे सादर करावा.
पुरस्काराच्या निवड समितीतील सदस्य स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल, तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल.
जळगांव जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, व्दारा जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा जवळ, 1 ला मजला जळगांव 425001 (दूरध्वनी ०२57- 2229628) यांच्याकडे १५ जून पर्यंत पाठवाव्यात. त्या नंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत.

No comments:

Post a Comment