Tuesday, 19 February 2013

माहिती अधिकाराचे कामकाज करित असतांना मानसिकता बदलणे आवश्यक : माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड



चाळीसगांव दि.19:-  शासकीय अधिकारी कर्मचा-यावर लोकसेवक म्हणुन महत्वपुर्ण जबाबदारी आहे त्यामुळे माहितीचा अधिकार बाबतचे कामकाज करित असतांना त्यांच्या मानसिकतेत बदल होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत केले. 
आज तहसिल कार्यालयात आयोजित माहिती अधिकार अधिनियम 2005 या विषयावर मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार शशिकांत हदगल, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड उपस्थित होते. त्यावेळी गायकवाड म्हणाले की, जनता ही विविध प्रकारच्या कराच्या रुपातुन शासनाच्या तिजोरीत रक्कम जमा करत असते आणि त्याचे विनीयोजन करतांना आपले उत्तरदायीत्व बनते की जनतेला अपेक्षीत असलेली माहिती त्यांना वेळेवर उपलब्ध करुन देणे. त्याच बरोबर जनतेनेही मोजकी गरजेची माहिती मागावी त्यामुळे शासकीय कामाचा अपव्यय टाळता येईल. माहिती अधिकाराचे राज्य स्तरावरुन संगणकीकरण करण्यात येत असुन प्रत्येक विभागाने आपले स्वतंत्र संकेतस्थळे सुरु करावी त्यावर माहिती अधिकाराचे सेक्शन 4-1-ब नुसार जनतेला अपेक्षीत असलेली माहिती प्रसिध्द् केल्यास याचा नक्कीच फायदा होईल. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे जनप्रबोधन होण्याकरिता यशदा प्रमाणेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत जनतेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गांच्या समस्या जाणुन त्यावरील उपाययोजना त्यांनी सांगितल्या.
            यावेळी उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी माहितीचा अधिकार कायदा अत्यंत चांगला असुन तो चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी पाचोरा विभागांतर्गत येणा-या महसुल यंत्रणेची स्वतंत्र संकेतस्थळ लवकरच सुरु करण्यात येणार असुन माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयीची संपुर्ण माहिती संकेतस्थळावरुन प्रसिध्द् करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या. या बैठकीचे सुत्रसंचलन आभार तहसिलदार शशिकांत हदगल यांनी मानले.
माहिती आयुक्तांची मेहुणबा-याला भेट
दरम्यान माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मेहुणबारे येथील स्व.दिवान चव्हाण रोपवाटीकेला भेट देऊन स्व.दिवान मास्तर बालोद्यान कोनशिलेचे अनावरण केले. प्रसंगी त्यांच्या पुर्वजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमंत्रीत जेष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्याचबरोबर मेहुणबारे येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची विचारपुस त्यांना देण्यात येणा-या आहाराविषयीची माहिती घेऊन अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणा-या दशपदी, कुपोषण मुक्ती, पोषण आहार विद्यार्थ्यांची उपस्थिती या विषयीची सर्व माहिती जाणुन घेतली.
* * * * * * *

No comments:

Post a Comment