Wednesday, 25 April 2012

पिप्रींसेकमला मे अखेर पर्यत स्वतंत्र दप्तर द्यावे - ना. देवकर

जळगांव, दिनांक 25:- पिंप्रीसेकम  (भुसावळ) ही मूळ ग्रामपंचायत असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने  पिप्रीसेकमकरिता स्वतंत्र दप्तर व ग्रामसेवक मे अखेर पर्यंत देण्याचे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आलेल्या पिप्रीसेकम ग्रामस्थांच्या विविध मागण्यासंबंधीच्या बैठकीत दिले.
      या बैठकीस भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, भुसावळचे प्रांताधिकारी राहुल मुंडके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं.) राजन पाटील, भुसावळ पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी आदिंसह पिप्रींसेकमचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
      पिंप्रीसेकम येथे दूषित पाण्यामुळे चार लोकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्‍या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा समितीचे सदस्य, ग्रामसेवक आदिवर कायद्यानुसार जी कारवाई करता येईल ती त्वरित करण्याच्या सूचना ना. देवकर यांनी बैठकीत दिल्या. तसेच पिप्रीसेकमच्या रस्त्याचा प्रश्न महाजनकोने सहा महिन्याच्या आत मार्गी लावण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना त्यांनी दिले.
      दीपनगरच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पाकरिता पिप्रींसेकमच्या जमीनी भूसंपादित केलेल्या असल्याने सदरच्या स्थानिक लोकांना दीपनगर प्रकल्पात रोजगार मिळण्याची कारवाई दोन महिन्यात करावी असे ही त्यांनी सांगितले. तसेच पिंप्रीसेकम गावाला पाण्याकरिता महाजनकोने प्रस्ताव पाठवावा त्यावर मुंबई मध्ये बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
      महाजनकोने प्रकल्पाकरिता जमिनी संपादित करत असतांना पिप्रीसेकम ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा, रस्‍ता, वीज, स्कूल बस आदि विविध आश्वासने लेखी स्वरुपात दिलेली असल्याने ती आश्वासने त्यांनी पूर्ण केली पाहिजेत असे ना. देवकर यांनी संबंधित अधिका-यांना सांगितले. तसेच जिल्हाधिका-यांनी सदरची कागदपत्रे तपासून त्वरित कार्यवाही करावी असे त्‍यांनी सूचित केले.

No comments:

Post a Comment