जळगांव, दिनांक 24:- जिल्हयातील कोणत्याही गावाच्या पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन थकबाकी अभावी संबंधित वीज कंपनीच्या अधिका-यांनी जुलै अखेर पर्यत खंडित करु नये. तसेच टंचाईच्या काळात अधिका-यांनी परस्परामध्ये समन्वय ठेवून पाणी टंचाईवर मात करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज सायंकाळी अल्पबचत भवनात घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीत दिले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर, विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे, जि.प. अध्यक्ष ना. खोडपे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. बनसोडे आदि उपस्थित होते. तर बैठकीस आमदार सर्वश्री साहेबराव पाटील, गिरीष महाजन, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, संजय सावकारे, चिमणराव पाटील, राजीव देशमुख आदि लोकप्रतिनिधी सह सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
ना. ढोबळे पुढे म्हणाले की, पाणी पुरवठा विभागाने एमएसईबीच्या पारेषण विभागाकडे 50 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा केलेली आहे. ज्या गावाने पाणी पुरवठा योजनेची वीज थकबाकी रक्कम भरलेली नाही ती या अनामत रक्कमेतून घेतली जाईल. त्यामुळे सदरच्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना वीज पुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा असे त्यांनी सांगितले.
तसेच ज्या गावांमधील पाणी पुरवठा समित्यांनी चूकीच्या पध्दतीने काम केलेले आहे व निधीमध्ये ही अपहार केला आहे अशा समित्यांकडून सदरच्या योजनेचे काम काढून घेऊन समित्या बरखास्त कराव्यात व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना ना. ढोबळे यांनी दिले. तसेच या योजनांवर जि.प. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नियंत्रण ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच सदरच्या गावाच्या पूर्ण योजनांना त्वरीत मंजुरी देण्याचे आदेश ही त्यांनी दिले.
जिल्हाधिका-यांनी टंचाई काळातील योजनांचा दर आठवडयाला आढावा घेऊन माहिती द्यावी तसेच प्रांताधिका-यांनी टंचाई काळात संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करुन त्या विभागातील योजनांची माहिती घेऊन पालकमंत्र्याना द्यावी. तसेच तहसिलदार, गट विकास अधिकारी, पाणी पुरवठयाचे कार्यकारी अभियंता यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेऊन आपल्या भागातील टंचाई सदृश्य गावांमध्ये कोणत्या उपाय योजना करता येतील याची माहिती टंचाई शाखेकडे पाठवावी असे ही त्यांनी सांगितले.
जिल्हयातील सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांनी आपल्या हददीत कूपनलिका घेण्याविषयीचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवावेत व जिल्हाधिका-यांनी अशा प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याचे आदेश ना. ढोबळे यानी दिले.
टंचाईच्या काळात प्रशासनाने अधिक गतीने काम करुन टंचाईवर मात करावी यात दिरंगाई चालणार नाही असे पालकमंत्री ना. देवकर यांनी बैठकीत सांगितले तसेच टंचाई काळात तात्पुरते कच्चे बंधारे टाकून पाणी पुरवठा करता येत असेल त्या ठिकाणी अधिका-यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना ना. देवकर यांनी दिल्या.
ना. खडसे व सर्व लोकप्रतिनिधींनी 50 पैसे आणेवारीची अट जळगांव जिल्हयासाठी शिथील करण्याची मागणी ना. ढोबळे यांचेकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे ना. ढोबळे यांनी सांगितले. तसेच पाणी पुरवठा योजनांमध्ये व टंचाई काळात उपाययोजना मध्ये दिरंगाई करणा-या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी लोकप्रतिनीधींनी केली.
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी टंचाई आराखडयात जिल्हयातील 186 गावांचा समावेश असून त्याकरिता 213 उपाय योजना केल्या असून 1 कोटी 67 लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती बैठकीत दिली. तसेच 35 गावांकरिता 39 विहीर अधिगृहीत केल्या असून जिल्हयातील 4 गावांना 5 टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
सदरच्या बैठकीत ना. ढोबळे यांनी तालुकानिहाय पाणी पुरवठा टंचाईचा आढावा घेतला.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment