Friday, 9 May 2014

केवळ आश्रयस्थान नव्हे तर जिव्हाळा लावणारे माहेर

केवळ आश्रयस्थान नव्हे तर जिव्हाळा लावणारे माहेर
आशादिप महिला वसतीगृहातील अनात मुलीचा उद्या विवाह

जळगाव, दि.9- येथील महिला बाल विकास विभागातर्फे चालविल्या जाणा-या शासकीय आशादिप महिला वसतिगृहाचे रुपांतर सध्या लग्नघरात झाले आहे.  येथे गेल्या दोन वर्षांपासून आश्रयाला आलेल्या रिना चे लग्न रविवार दि.11 मे 2014 रोजी  होणार आहे. निराधार- निराश्रीत महिलांचे निवासस्थान केवळ संकटकाळी दिलासादायक ठरणारा सुरक्षित निवारा नसून जिव्हाळा लावणारे माहेरही ठरले आहे.
महिला बालविकास विभागातर्फे 1983 पासून जळगाव शहरात हे वसतिगृह  कार्यरत आहे. 16 ते 60 वर्ष वयापर्यंतच्या निराधार निराश्रीत महिला मुलींचे हे निवासस्थान आहे. याठिकाणी परितक्त्या, कुमारी माता, संकटग्रस्त व अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय, संरक्षण, मुलभूत सुविधा  पुरवून तिचे पुनर्वसन करण्यात येते.  याच महिला वसतीगृहात रिना तेजराम वनवे, ही कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेली युवती  सन 2012 मध्ये या वसतीगृहात दाखल झाली.  गेल्या दोन वर्षात तिचे या वसतीगृहात वास्तव्य होते. तिने या काळात ब्युटीपार्लर प्रशिक्षण  पुर्ण केले आहे. आता ती स्वतः आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होऊ शकते. तशातच तिला अहमदनगर जिल्ह्यातील भावी निमगाव ता. शेवगाव येथील देविदास खडके यांच्याकडून विवाहासाठी मागणी आली. देविदास खडके हे सर्वशिक्षा अभियानात विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. परस्पर पसंतीनंतर संस्थेने अहमदनगर जिल्ह्यातील महिला बालविकास अधिका-यांमार्फत तपास करुन गृह अहवाल तयार करण्यात आला. नंतर दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. नंतर लग्नासाठी वराच्या आई वडीलांची संमती घेण्यात आली, आणि त्यानंतर हे लग्न आता रविवारी 11 तारखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे. सो.सु. ग. देवकर प्राथमिक शाळा, मेन स्टेट बॅंक शाखेसमोर, जळगाव येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला  विविध मान्यवर वधुवरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
आता पर्यंत या संस्थेने 69 विवाह जुळवून मुलींना कुटूंबात पोहोचविले आहे. उद्या होणारा विवाह सोहळा हा 70 वा सोहळा असेल. संस्थेत पुर्वी विवाह होऊन आपल्या कुटूंबात विवाह जीवनाची यशस्वी वाटचाल करणा-या 20 जोडप्यांचा सत्कारही या विवाह सोहळ्यात केला जाणार आहे.
सध्या या संस्थेत 21 मुली आश्रयाला आहेत. त्यांच्याही संगोपन ,संरक्षण आणि पुनर्वसनावर संस्था परिश्रम घेत आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जातो. आता पर्यंत या संस्थेत 1419 महिलांनी येथे आश्रय घेतला असून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथे आश्रयाला आलेल्या महिला- मुलींची वैद्यकीय तपासणीपासून ते सर्वप्रकारची काळजी घेतली जाते. त्यांना त्यांचा कल पाहून शिवण काम, ब्युटीपार्लर तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमातून त्यांना सबल केले जाते. केवळ संरक्षण पुनर्वसन यासारख्या प्रक्रियांतून जातांना या मुलींचे परस्पर स्नेहबंध जुळतात. सुयोग्य विवाह करुन आपल्यातल्या एका भगिनीचे पुनर्वसन होतांना पाहून इतर मुलींनाही आनंद झाला आहे. आश्रयगृहाचे माहेरघर होणे हीच या उपक्रमाची खरीखुरी फलश्रृती आहे.

-       मिलिंद मधुकर दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

No comments:

Post a Comment