अन्नसुरक्षा पोहोचविण्याचे आव्हान स्विकारा
केंद्रीय कृषीमंत्री
शरद पवार यांचे सरपंच महापरिषदेत आवाहन
जळगाव,
दि.15 - कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी
प्रत्येकाला अन्न उपलब्ध करुन देणे महत्त्वाचे आहे. हे काम अन्न सुरक्षेच्या
माध्यमातून होत आहे. आपल्या गावातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही अन्न सुरक्षा
पोहोचविण्याचे आव्हान गावचे प्रमुख म्हणून आपण सा-यांनी स्विकारावे, असे आवाहन केंद्रीय कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री
शरद पवार यांनी आज येथे केले. सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित ॲग्रोवन सरपंच
महापरिषदेचे उद्घाटक म्हणून ना.
पवार हे राज्यभरातील सरपंचांशी संवाद साधत होते.
येथील जैन हिल्स येथे आयोजित सरपंच महापरिषदेस राज्याचे कृषी, पशुसंवर्धन,
दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या-विमुक्त
जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे,"सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष
प्रतापराव पवार, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, जैन इरिगेशन
सिस्टिम्सचे अध्यक्ष भवरलाल जैन, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे
अध्यक्ष प्रमोद रायसोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना
ना. पवार म्हणाले की,ग्रामपंचायत लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. देशाशी
निगडीत सर्व प्रश्न हे गावातील प्रश्नांशी निगडीत आहे. देशातील 82 टक्के शेतकरी हे
अल्पभूधारक आहेत. लहरी निसर्गामुळे या शेतीवर विसंबून राहता येत नाही. त्यासाठी
पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक थेंब अडवून जिरवून भुगर्भातील
पाण्याची पातळी वाढ़वून आवश्यक तितकेच पानी वापरले गेले पाहिजे. त्यासाठी पिकांचे
नियोजन गावपातळीवर होणे महत्त्वाचे आहे. या कामी सरपंच म्हणून आपण महत्त्वाची
भूमिका बजावू शकतात. पिण्याचे पाणी हे शुद्धच असले पाहिजे. स्वच्छता, चांगले रस्ते
आणि वृक्षवेलींनी नटलेले गाव मनाला आनंद देते. आदर्श गावांसाठी राष्ट्रीय पातळीवर
पुरस्कार मिळविणा-या ग्रामपंचायतीत महाराष्ट्रातील गावांची संख्या दरवर्षी वाढते
आहे, ही समाधानाची बाब आहे.
देशाची
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतीत गुंतवणूक वाढणे महत्त्वाचे आहे. शेतक-यांना
दिलेल्या 72 हजार कोटीच्या कर्जमाफीमुळे नवीन कर्जपुरवठ्याचे मार्ग मोकळे होऊन
शेती क्षेत्रात 6 लाख 90 हजार कोटी पर्यंतचा कर्जपुरवठा वाढला. अन्नधान्य उत्पादन
वाढले. भारत हा जगात तांदूळ निर्यातीत क्रमांक एक वर आहे तर कापूस, गहू आणि साखर
निर्यातीत क्रमांक दोन वर आहे. शेतक-यांनी केलेल्या या परिश्रमामुळे हे शक्य झाले
आणि म्हणूनच देशात अन्न सुरक्षेचा कायदा लागू करता आला. अन्न धान्य उत्पन्नाचे
गेल्या 60 वर्षातले नवे विक्रम आमच्या शेतक-यांनी घडविले. यंदा 263.6 दशलक्ष टन
उत्पादन झाले आहे. हे गावातला तरुण शेतकरी जोमाने कामाला लागल्याचे द्योतक आहे.
ग्रामपंचायतींमध्ये नवी शिकलेली पिढ़ी आणि महिला आल्या त्यामुळे चांगला कारभार होतो
आहे. भावी पिढ़ी संपन्न करायची असेल तर गावच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा आणि शंभर
टक्के उपस्थितीकडे लक्ष द्या. त्यासाठी शाळा समितीवर महिलांची नेमणूक करा.
आत्मविश्वासाने उभी रहिलेली स्त्री ही देशाचा ठेवा आहे हा ठेवा वाढवा असा संदेशही
त्यांनी यावेळी उपस्थित सरपंचांना दिला. ग्रामपंचायत व्यवस्थेतून तुमचे नेतृत्व
उभे राहते, तेव्हा कर्तृत्व सिद्ध करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी
पालकमंत्री सावकारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामविकासासाठी शासनाच्या
विविध योजना असून त्या राबविण्याची जबाबदारी सरपंचांनी पार पाडली तरी चांगले काम
होते, म्हणून सरपंचांनी आपले ग्रामविकासाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी
केले. या निमित्त व्यासपिठावर उपस्थित मान्यवर प्रतापराव पवार, डॉ.
अभय फिरोदीया, प्रमोद रायसोनी आणि भवरलाल जैन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ना. पवार यांच्या
हस्ते अप्पासाहेब पवार यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट ‘वटवृक्ष’चे अनावरण करण्यात
आले.
या कार्यक्रमास विधानभेचे माजी सभापती अरुणभाई
गुजराथी, कविवर्य ना. धो. महानोर,
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, आ. राजीव देशमुख, आ. जगदिश वळवी, आ.
दिलीप वाघ, ॲड. रविंद्र पाटील यांच्यासह
जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक ॲग्रोवनचे
संपादक आदिनाथ चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment