Tuesday, 29 October 2024

जळगावकरांनो.., कमी आवाजाचे फटाके फोडा मात्र सावधगिरीही बाळगा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

              जळगाव, दिनांक 29 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) :   दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सोमवारपासून म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात आहेत तर बाहेर फटाके फोडले जात आहेत. मात्र फटाके फोडतांना आपल्यासोबतच इतरांची, प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांन केले आहे.

             आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की,   दिवाळी साजरी करतांना आपण विषेश लक्ष द्या कि कुठल्याही प्राणी आणि पक्ष्यांना आपला त्रास किंवा इजा होणार नाही. कुठल्याही पक्ष्याला किंवा प्राण्याला त्रास झाला तर आपण 1962 या क्रमांकावर संपर्क करुन ब्यू ॲम्बुलन्स या फिरत्या दवाखान्याशी संपर्क साधावा. जर एखादी व्यक्ती त्या प्राण्याला त्रास देत असेल तर त्यांच्याबद्दल ताबडतोब पोलिसांना सुचना देऊन त्याच्याबद्दल तक्रार नोंदवा.

              दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी साजरी करताना फटाके फोडतांना आपण कुठल्याही प्रकारचे नायलॉन किंवा सिल्कचे कपडे परिधान करु नका. रॉकेट,  बॉब्म सारखे फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घ्यावी. अती आवाजाचे फटाके फोडू नका. कारण त्याचा आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.  या सर्व गोष्टीकडे लक्ष देत दिवाळी आनंदात साजरा करा, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

विधानसभा पूर्वपिठीकेचे जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते झाले प्रकाशन

        जळगाव, दिनांक  29 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी  जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून निवडणुकीचा 1962 पासूनचा मागोवा घेतलेली जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार मतदारसंघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन आज मंगळवार, दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे उपस्थित होते.

                   विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपिठीकेत जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा निहाय 1952 सालापासून 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजय / पराभूत उमेदवार त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. तसेच माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीच्या कामकाज, आदर्श आचार संहितेत ' काय करावे, काय करू नये ' या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसेच या पूर्वपीठिकेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासोबतच प्रथमच या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

            या पुस्तिकेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जिल्हा निवडणूक शाखेचे सहकार्य लाभले आहे.

राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे, जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन

                    जळगाव, दिनांक 29 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : जळगाव येथील जिल्हा कोषागार, कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना आपले हयात प्रमाणपत्र दिनांक 01 नोव्हेंबर २०२४ पासून बँकेमार्फत सादर करावे लागणार आहे, असे आवाहन जळगावचे जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी याबाबतीत प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिलेली आहे.

           यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखेत हयात प्रमाणपत्राच्या याद्या पाठविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक निवृत्तीवेतन धारकांनी त्या यादीवर बँक अधिकाऱ्यासमोर  दिनांक १० डिसेंबर २०२४ पर्यंत स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Monday, 28 October 2024

धनत्रयोदशी, दीपावलीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

          


                  मुंबई, दिनांक 28 ऑक्टोबर : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला धनत्रयोदशी तसेच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. वसुबारस, धनत्रयोदशी पासून सुरु होत असलेला दीपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी व सुख-शांती घेवून येवो ! दीपावलीनिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट क कर्मचा-यांसाठी विभागीय परिक्षेचे नियोजन

          जळगाव, दिनांक 28 ऑक्टाबर (जिमाका वृत्त) :  महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत लेखा विषयक काम करणारे लिपीक वर्गीय (वर्ग ३) कर्मचाऱ्यांसाठी १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग १ व २) ही  डिसेंबर-२०२४ मध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे.

          या परिक्षेचे परिपत्रक https://mahakosh.maharashtra.gov.in च्या employee corner मधील Exams Tab किंवा DAT (mahakosh.in) च्या Notice board वर उपलब्ध आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार येथील वित्त विभागाचे व इतर विभागातील लेखा विषयक काम करणारे वर्ग ३ कर्मचारी ही परिक्षा देऊ शकणार आहे. या पदासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांनी दिनांक 0८ नोव्हेंबर पर्यंत त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज कार्यालय प्रमुखांकडे द्यावयाचे आहेत. या कार्यालय प्रमुखांनी परिक्षेसाठीचे अर्ज छाननी करुन सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक येथे दिनांक १४ नोव्हेंबर पर्यंत पाठवायची आहे. दिनांक १४ नोव्हेंबर ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. तरी या पदासाठी इच्छुक पात्र कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत त्यांचे अर्ज पाठवावे, असे आवाहन नाशिक विभागाचे लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक, महेश मुरलीधर बच्छाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

                  जळगाव, दिनांक 28 ऑक्टोबर (जिमाका वृत्त)) : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदान हक्क बजावता यावा या करीता त्या दिवसासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

             विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात यावी असा आदेश कार्यसन अधिकारी शामकांत सोनवणे यांनी एका परित्रकाद्वारे दिला आहे. निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापना तसेच उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. सुट्टीच्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. जर एखाद्या नियोक्त्याने या तरतुदींचे उल्लंघन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असणार आहे. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

 अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी. मात्र यासाठी त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

Friday, 25 October 2024

जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

              जळगाव, दिनांक 25 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 तारखेपासून लागू करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तो पर्यंत राज्यात आचार संहिता लागू असल्याने अनेक शासकिय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यातील एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे लोकशाही दिन.

         सामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या, अडचणी यांचा तात्काळ निपटारा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्या दालनात नागरिकांच्या सोयीसाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित केला जात असतो. मात्र सध्यास्थितीला राज्यात आचारसंहिता सुरु असल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्यास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी तरतुद नमुद करण्यात आलेली आहे.

       त्यामुळे आचारसंहितेमुळे जिल्हास्तरावरील येत्या नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी म्हणजेच दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभा निवडणूक निकाल अंदाज-एक्झिट पोलवर 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान प्रतिबंध

 

 

  जळगाव, दिनांक 25 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीसाठी येत्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान होणार आहे.

          त्यानुसार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

          विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया होणार तर दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

          भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार बुधवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, दूरदर्शन, आकाशवाणी अशा सर्व प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, बल्क मॅसेज करून घ्यावे लागतील प्रमाणित


जळगाव, दिनांक 25 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार उमेदवारांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य (ऑडीओ-व्हिडीओ) जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती (एमसीएमसी) ची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखेला लागून असलेल्या जागेत माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. विहित नमुना एमसीएमसी कक्षात उपलब्ध आहे. एमसीएमसी समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर 48 तासांमध्ये अर्ज निकाली काढण्यात येतील.

जाहिरात नियमानुसार नसल्यास एमसीएमसी समितीला प्रमाणीकरण नाकारण्याचा अथवा जाहिरातीमध्ये बदल सुचविण्याचा अधिकार आहे. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन जाहिरात सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणिकराणासाठीचा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा. त्यात जाहिरात निर्मिती खर्च, जाहिरात प्रसारण खर्च व कालावधी, उमेदवार किंवा पक्षाचे नाव, स्वतंत्र व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र आदी महत्वाच्या बाबींच्या नोंदीसह जाहिरात संहिता व दृक-श्राव्य चित्रीकरण सीडी किंवा पेनड्राइव्हमध्ये समितीकडे देण्यात यावा. उमेदवार व राजकीय पक्षाच्या ब्लॉग, संकेतस्थळावरील, वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केलेला राजकीय स्वरुपाचा संदेश, मजकूर, छायाचित्र, व्हीडीओ मजकूर राजकीय जाहिरात समजली जाणार नाही, त्यामुळे त्यासाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक नाही. तथापि, जाहिरातीचे प्रमाणीकरण आवश्यक आहे.

एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि त्यापूर्वीच्या दिवशी प्रकाशित करावयाच्या जाहिरातींचे प्रमाणीकरणही आवश्यक आहे.

Thursday, 24 October 2024

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल तर्फे क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ

 


            जळगाव, दिनांक 24 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल तर्फे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धांचा  शुभारंभ २४ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या स्पर्धा २४ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत  भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे  आयोजित केल्या आहेत. 

        या स्पर्धांसाठी उपस्थित जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रिडा ध्वजारोहण करून तसेच सहा. आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, अरुण पवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व बियाणी ग्रुपच्या सचिव डॉ. संगीता बियाणी यांच्या हस्ते क्रिडाज्योत पेटवून स्पर्धांचे उद्धाटन करण्यात आले. आदिवासी थोरपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बॅन्ड पथकाच्या तालावर सहभागी संघांच्या  खेळाडूंनी संचालन करून मानवंदना दिली. पळासखेडा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ऱ्हिदमीक योगासने करून उपस्थितांची मने जिंकली.

        एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या १७ शासकीय आश्रमशाळा व ३२ अनुदानित आश्रमशाळांमधील सुमारे १४०० खेळाडू विद्यार्थी/विद्यार्थिनींनी या स्पर्धांत सहभाग घेतला आहे. खो-खो,कबड्डी, अॅथेलेटिक्स, व्हॉलीबॉल, हॅंडबॉल यासारखे विविध खेळ प्रकारांसाठी या स्पर्धा होत आहेत.

जन्मतः विविध खेळ गूण  अंगी बाळगणाऱ्या अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचा मोलाचा वाटा आहे. याठिकाणी सांघिक व वैयक्तिक खेळात विजेत्या खेळाडूंनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत देखील जास्तीत जास्त पदके जिंकून यावल  प्रकल्पाचे नावलौकिक राखावे असे उद्गार प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.

        जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. नाईक यांनी आदिवासी खेळाडूंना जिल्हा क्रिडा विभागातील तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येईल तसेच यावल प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व शाळांना दर्जेदार क्रिडा साहित्य देण्यात येईल असे आश्वासन दिले. तर भाषणात श्री.विजय शिंदे यांनी सहभागी खेळांडूंना प्रोत्साहित करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

         याप्रसंगी क्रिडा धिकारी सचिन निकम,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील  सहा. प्रकल्प अधिकारी पी.पी.माहुरे, सहा. प्रकल्प अधिकारी पवन पाटील, सहा. प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, सहा. प्रकल्प अधिकारी.लवणे , शिक्षण विस्तार अधिकारी, क्रिडा शिक्षक, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व शासकीय वासतिगृहांतील गृहपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी श्री. संदीप पाटील, सहा. प्रकल्प अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

निवडणूक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करण्याची मिळणार सुविधा

 


             जळगाव, दिनांक 24 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जळगाव शहर विधानसभा मतदार संघाकरीता 20 नोव्हेंबर  रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी जे अधिकारी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आहेत अशा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडील मतदानापूर्वी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


         ज्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या  कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान करुन घेण्याच्या नियोजनासाठी त्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर 12 ड भरून घेणे, त्यांच्यासाठी टपाली मतदान केंद्र उभारणे इत्यादी या बाबींचा सामावेश आहे.  तरी सर्व कर्मचाऱ्यांना एक नोडल अधिकारी नेमून माहितीसह त्यांना या  कार्यालयास 20 ऑक्टोबर रोजी  सायंकाळी 5.00 वाजता आढावा सभेला उपस्थित राहण्याच्या सुचना  कराव्यात आणि  त्यांच्यासोबत नोडल अधिकारी नियुक्ती आदेशाची प्रत पाठवावी. तसेच किती आपल्या अधिनस्त किती कर्मचाऱ्यांना ही सुविधी हवी आहे ? यांच्या लेखी माहितीसह त्यांना पाठवावे जेणेकरुन या विषयाचे नियोजन करणे सुलभ होईल अशा सुचना  उपविभागीय अधिकारी जळगाव तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी दिल्या आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात १८, १९, २०, २३ नोव्हेंबर रोजी मद्यविक्री राहणार बंद

 

            जळगाव, दिनांक 24 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चा कार्यक्रम काही दिवसांपुर्वीच जाहीर झाला आहे. विधानसभा मतदार संघाकरीता जिल्ह्यात बुधवार दिनांक २० नोव्हेंबर  रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यात १८, १९, २०, २३  नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.


            विधानसभा निवडणुक खुल्या, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.


            लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकाराने विधानसभा निवडणुक 2024 च्या कालावधीत संपूर्ण जळगाव जिल्हयात १८, १९, २० व  २३  हे  कोरडे दिवस म्हणून जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


            या अनुषंगाने १८ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६.०० वाजेपासुन मतदान संपण्या अगोदर ४८ तास कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. तर मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी संपुर्ण दिवस आणि  तसेच मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस असणार आहे. त्यासोबतच मतमोजणीचा संपूर्ण दिवस म्हणजेच २३ नोव्हेंबर देखील कोरडा दिवस असेल असे आदेशात नमुद केले आहे.


            सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी या कालावधी व वेळेत मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवाव्यात आणि या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नावे असलेली अनुज्ञप्ती महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ व ५६ अन्वये तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल अशा सुचना  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Wednesday, 23 October 2024

सणासुदीची काळात विशेष मोहिम अंतर्गत सहाय्यक आयुक्तांचे अन्न व्यावसायिंकाना निर्देश

            जळगाव, दिनांक 23 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : दिवाळी सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे  सणासुदीत मोठ्या संख्येने नागरिक वस्तू आणि अन्नपदार्थांची खरेदी करतात.  येणाऱ्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन ईत्यादी अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात भेसळीच्या तक्रारी येतात या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांना सूचना दिल्या आहेत.

 

             या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई इत्यादी अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनातर्फे अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची  विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

 

            प्रशासनातर्फे ग्राहकांना सुरक्षीत व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यावसायिकांना काही सुचना देखील देण्यात आल्या आहेत. यामध्ये मिठाई विक्रेत्यांनी कच्चे अन्न पदार्थ जसे दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी हे परवानाधारक / नोंदणीधारक व्यावसायिकांकडुनच खरेदी करावेत व त्यांची खरेदी बिले जतन करावीत.

 

            तसेच मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यासयोग्य पाण्याचा वापर करावा. मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थाची स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मिठाई विक्रेत्यांनी त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त या बाबत कामगाराची वैद्यकीय तपासणी करावी. मिठाई विक्रेत्यांनी मिठाई तयार करतांना केवळ फुड ग्रेड खाद्यरंगाचाच मर्यादित वापर करावा.

 

            मिठाई विक्रेत्यांनी दुग्धजन्य पदार्थाची मिठाईचे सेवन त्वरित करण्याबाबत ग्राहकांना सुचित करावेत. मिठाई विक्रेत्यांनी माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकुन ठेवावे. मिठाई विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळाच तळण्यासाठी वापरावे. मिठाई विक्रेत्यांनी स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणुन करु नये. मिठाई विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलांवर त्यांच्याकडील FSSAI परवाना क्रमांक नमुद करावा. मिठाई विक्रेत्यांनी दुध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा यासारख्या नाशवंत पदार्थांची वाहतुक योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करावी.

 

            अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नियम व नियमने मधील तरतुदींचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा सुचना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त  सं.कृ.कांबळे यांनी दिल्या आहेत.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार


जळगाव, दिनांक 23 ऑक्टोबर ( जिमाका ) : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदानावेळी मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राशिवाय इतर बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ करिता जळगाव जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार, मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकतात.


मात्र जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र हे पुरावे सादर करता येऊ शकतात अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.



Tuesday, 22 October 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंग

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४
सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या
९१० तक्रारी प्राप्त; यापैकी ८९९ निकाली
३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दिनांक २२ ऑक्टोबर : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ९१० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व मतदारसंघा करिता खर्च निरीक्षकपदी हरकेश मीना आणि रोहीत इंदोरा यांची नियुक्ती

 जिल्ह्यातील सर्व मतदारसंघा करिता खर्च निरीक्षकपदी हरकेश मीना आणि रोहीत इंदोरा यांची नियुक्ती

जळगाव, दिनांक 22 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथील भारत निवडणूक आयोग यांच्याद्वारे जळगाव जिल्हयातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आय.आर.ए.एस.हरकेश मीना आणि आय.आर.एस.सी.ॲण्ड सी.ई रोहीत इंदोरा यांची मा.खर्च निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरकेश मीना हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील "सह्याद्री" विश्रामगृह येथून कामकाज पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 94043 05893 आहे. रोहीत इंदोरा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील "अजिंठा " विश्रामगृह येथून कामकाज पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 94043 05898 आहे.

रोहीत इंदोरा चोपडा, रावेर, भुसावळ, जळगांव शहर आणि जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदार संघातील कामकाज पाहणार आहेत तर हरकेश मीना हे अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर या विधानसभा मतदार संघातील कामकाज पाहणार आहेत.

या सर्व 11 विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांना केवळ निवडणूक संबंधीत कामाकरिता निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत संपर्क करावयाचा असेल त्यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासुन रोज दुपारी 04.00 ते 05.00 या वेळेत कार्यालयीन पत्त्यावर अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 'आय गॉट कर्मयोगी' पोर्टलवर मिळणार प्रशिक्षण; संबंधितांनी अॅप डाउनलोड करावे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 'आय गॉट कर्मयोगी' पोर्टलवर मिळणार प्रशिक्षण; संबंधितांनी अॅप डाउनलोड करावे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जळगाव, दिनांक 22 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आय गॉट कर्मयोगी'अँपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असून संबंधितांनी igot.karmayogibharat हे अॅप डाउनलोड करावे असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्हा निवडणूक कार्यालयाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान पथकात नियुक्त करावयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी आहे. सदर अॅपवर निवडणूक विषयक प्रशिक्षणाशी संबंधीत सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर अॅप डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details... कर्मयोगिभारत ही लिंक दिलेली आहे. निवडणुकीत मतदान पथकातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण या लिंकवर क्लिक करून गूगल प्ले स्टोअर मधून “आय गॉट कर्मयोगी” अॅप डाउनलोड करावे व सदर अॅपवर उपलब्ध करुन दिलेले निवडणूक विषयक प्रशिक्षण साहित्य डाऊनलोड करुन घ्यावे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगीसाठी कक्ष स्थापन

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक
असणाऱ्या विविध परवानगीसाठी कक्ष स्थापन

जळगाव, दिनांक 22 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारांना सभा घेताना किंवा काही कार्यक्रम घेताना अनेक परवानग्या असणे आवश्यक आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विविध परवानग्या देण्यासाठी सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे.
ज्यामध्ये उमेदवारांना जाहिर सभा, चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा घ्यावयाची असेल तर संबंधित पोलीस निरिक्षक/ पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी त्यांना परवानगी देतील. यासाठी उमेदवाराला अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देतांना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांचेकडील ना हरकत दाखला, भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खाजगी संस्था यांच्या मालकीची जागा / मैदान असल्यास संबंधीत संस्थेचे संमत्ती पत्र उप विभागीय अधिकारी यांचा ना-हरकत दाखला लागेल. स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करुन अशा प्रस्तावास मान्यता देतील आणि संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी Annexure D-I मधील प्रपत्र संबधीतांकडून घेतील. तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक आहे.
सभेच्या ठिकाणी पोर्स्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था/ महानगरपालिका/ नगर परिषद/ नगरपालिका/ ग्रामपंचायत/ नगर पंचायत यांची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज, खाजगी जागा असल्यास मालक संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थाची जागा फी, परवाना फी, जाहिरात फी लागणार आहे.
खाजगी जागेवर जाहिरात फलक/ प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था/ महानगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपालिका / ग्रामपंचायत अधिकारी यांची परवानगी आणि अर्ज, खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था, जागा परवाना फी, पोलिस नाहरकत दाखला लागणार आहे.

विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात उमेदवारांकरिता प्रचार वाहन परवानगी आणि मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना संपूर्ण जिल्हयात प्रचार वाहन परवानगी निर्गमित करणे करिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता असते. यासाठी अर्ज, आर.सी.बुक, वाहनाचा इन्शुरन्स, टॅक्स भरण्याची पावती, पीयुसी, वाहनांचे फिटनेस सर्टीफिकेट, बाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना-हरकत दाखला, वाहनाच्या चारही बाजुचा फोटो, पोलिस ना-हरकत दाखला, व्यवसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
उमेदवाराच्या तात्पुरत्या प्रचार कार्यालयासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी असणे आवश्यक आहे. ज्यात अर्ज, खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, पोलिस ना-हरकत दाखला लागणार आहे.
हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने अपर जिल्हादंडाधिकारी परवानगी देणार आहे. यासाठी अर्ज (अ) हेलीकॉप्टर उतरविणे पुर्वी किमान 24 तास अगोदर अर्ज सादर करणे (ब) प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा तपशिल (क) प्रवासाबाबत तपशिल (ड) हेलीकॉप्टर उतरविण्याचे ठिकाण नमूद केलेले असावे. यासोबतच पोलीस अधिक्षक यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, मनपा/ नपा/ ग्रामपंचायत यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभाग ना-हरकत प्रमाणपत्र, अग्निशमक दल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, रुग्ग्णवाहिका उपलब्धतेबाबत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
.
ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी संबंधित पोलीस स्टेशन निरीक्षक किंवा प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. या परवानगी साठी अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी नंतर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी परवानगी घ्यावी लागणार आहे.
शाळेचे मैदानावर सभा घेण्यासाठी ना-हरकत दाखला मिळवण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज, शाळा व्यवस्थापन ना-हरकत प्रमाणपत्र, पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

सोशल मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीया, Bulk SMS , प्रिंट मिडीयावर जाहिराती, प्रसिध्द करावयाच्या असतील MCMC कमीटीच्या संमतीने जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डींग्ज, बॅनर, पोस्टर्स इ. प्रचार साहित्य स्वत:च्या खाजगी इमारतीवर लावण्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी इमारतीवर झेंडे, पोस्टर्स, बॅनर्स, लावणेसाठी परवानगी देतांना संबंधित जागा मालकाची संमती, ठरलेल्या भाडयांच्या रकमेचा तपशिलाची कागदपत्रे, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे, वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पध्दतीने पोस्टर्स प्रदर्शन करणेची दक्षता संबंधीतांनी घेणेची अट याची पुर्तता करणे आवश्यक आहे.
यासोबतच मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोड शो करण्यासाठी संबंधित पोलीस निरिक्षक/पोलिस स्टेशन प्रभारी यांच्या परवनगीसोबत अर्जदाराचा अर्ज, पदयात्रा-रॅलीचा मार्गाचा आराखडा, वाहनासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, पदयात्रा - रॅलीच्या मार्गाच्या आराखडयास वाहतूक पोलीसांची परवानगी, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक आहे.

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज !

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज !
निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन

जळगाव, दिनांक 22 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये जळगाव जिल्हा कोणतीही कसर सोडत नाही. निवडणुकांना आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना, निवडणूक अधिकारी सुरळीत आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक चेकलिस्टचे काटेकोरपणे पालन करत आहेत. ज्यामध्ये तणावमुक्त वातावरण सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले, सूक्ष्म नियोजन, सक्षम व्यक्तींना योग्य कार्य सोपवणे, संपूर्ण भूमिका-आधारित प्रशिक्षण आयोजित करणे आणि नियमित पाठपुरावा सुनिश्चित करणे यावर जोर देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याबाबतची बांधिलकी रिटर्निंग अधिकाऱ्यांना दिलेल्या तपशीलवार सूचनांमध्ये दिसत आहे. या सूचनांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांचादेखील समावेश आहे. त्यात प्रामुख्याने

नामांकन प्रक्रिया:
नामनिर्देशन केंद्रे शाई पॅड, शिक्के, स्टेपलर, स्केल आणि जांभळ्या पेनसह सर्व आवश्यक स्टेशनरीने काळजीपूर्वक सुसज्ज असतील. अचूक टाइमस्टॅम्प सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल घड्याळे कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी उपकरणांसह समक्रमित केली जातील. नामांकन प्रक्रिया कोणत्याही चकाकीशिवाय कॅप्चर करण्यासाठी कॅमेऱ्याचे स्पष्ट कोन राखले जातील. ईआरओ-नेट आणि इलेक्टोरल सर्च यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे प्रस्तावकांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी समर्पित टीम्स असतील. सुरक्षा ठेव प्रक्रिया नियुक्त अधिकाऱ्यांसह सुव्यवस्थित केल्या जातील आणि साठवण व्यवस्था सुरक्षित केली जाईल. उमेदवारांना सर्व आवश्यक साहित्य पद्धतशीर रीतीने प्राप्त होईल, पावतीसाठी सर्वसमावेशक दस्तऐवजासह, कोणतीही संदिग्धता दूर केली जाईल.

परवानग्यांसाठी सिंगल विंडो सिस्टीम:
निवडणूक काळात आवश्यक असलेल्या विविध परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वित केली जाणार आहे . उपलब्ध परवानग्यांच्या प्रकारांबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध होतील. स्टँडर्ड ॲप्लिकेशन फॉरमॅट्स आणि चांगल्या प्रकारे परिभाषित कार्यप्रणालीमुळे कार्यक्षमता आणखी वाढेल. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी रॅलीसाठी उपलब्ध सार्वजनिक मैदानांची माहिती आणि मागणी केलेल्या वाहनांची यादी प्रदान केली जाईल. एक सर्वसमावेशक संप्रेषण योजना आणि प्रमाणित नकार स्वरूप संभाव्य विवाद कमी करण्यात मदत करेल.

प्रोएक्टिव्ह कंट्रोल रूम मॉनिटरिंग:
निवडणुकीच्या सर्व पैलूंचा सक्रियपणे मागोवा घेण्यासाठी कंट्रोल रूम निष्क्रिय अनुपालन मॉनिटरिंगच्या पलीकडे जाणार आहे. यामध्ये ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेटच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, घरबसल्या मतदानाच्या प्रगतीचा मागोवा घेणे, मतदारांच्या मतदानाच्या डेटाचे विश्लेषण करणे आणि सेक्टर ऑफिसर्स आणि फ्लाइंग स्क्वाड्सच्या ठिकाणांवर अपडेट राहणे समाविष्ट आहे. स्पष्ट मानक कार्यप्रणाली, एक मजबूत संप्रेषण योजना आणि रिटर्निंग ऑफिसरने प्रमाणित केलेले रजिस्टर कार्यक्षम ऑपरेशन सुनिश्चित करेल. नियंत्रण कक्ष तक्रारींना त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी सुसज्ज असेल, सतत ट्रॅकिंग आणि 90 मिनिटांत निराकरण सुनिश्चित करेल.

व्यापक मीडिया मॉनिटरिंग:
एक मजबूत मीडिया मॉनिटरिंग सिस्टम प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मागोवा घेणार आहे. यामध्ये स्थानिक प्रकाशने, वर्तमानपत्रे, यूट्यूब चॅनेल, राजकीय व्यक्ती आणि उमेदवारांच्या सोशल मीडिया क्रियाकलाप आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल्सचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे. पत्रकार आणि YouTube चॅनेल ऑपरेटर्सच्या नियमित बैठकांमुळे जबाबदार अहवाल आणि मुक्त संवादाला प्रोत्साहन मिळेल. संभाव्य उल्लंघने ओळखण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेल सामग्रीचे विश्लेषण करून बातम्यांचे लेख आणि सोशल मीडिया पोस्ट्सची तपशीलवार नोंद ठेवली जाईल. MCC उल्लंघनाच्या तक्रारींसाठी फ्लाइंग स्क्वॉड पाठवण्यापासून ते द्वेषयुक्त भाषण, खोट्या बातम्या आणि पेड न्यूजच्या संभाव्य घटनांना संबोधित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सहकार्य करण्यापर्यंत हा सेल योग्य कारवाई करेल.

सेक्टर अधिकाऱ्यांची बहुआयामी भूमिका:
ग्राउंड लेव्हलवर निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सेक्टर ऑफिसर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे . ते बूथ लेव्हल ऑफिसर्सवर देखरेख ठेवण्यासाठी, मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर देखरेख करण्यासाठी आणि मतदान पक्षांवर देखरेख करण्यासाठी जबाबदार असतील. आवश्यक दुरुस्ती, तंबू, कुलर, वेबकास्टिंग सुविधा आणि पिण्याचे पाणी यांसारख्या खात्रीशीर किमान सुविधा मतदान केंद्रांवर सुनिश्चित करणे हे प्रमुख प्राधान्य असेल. ते ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी पिक-अप आणि ड्रॉप सेवा, व्हीलचेअर प्रवेशयोग्यता आणि बाल संगोपन केंद्रांची स्थापना यासह किमान किमान सेवांची सोय करतील. त्यांच्या जबाबदाऱ्या आरोग्य सहाय्य केंद्रांवर देखरेख ठेवणे, घरच्या मतदान प्रक्रियेवर देखरेख करणे, प्रभावी मतदार स्लिप वितरण सुनिश्चित करणे आणि मतदार सहाय्य उपक्रमांना सुलभ करणे यापर्यंत विस्तारित असेल.

स्ट्राँग रूमसाठी कडक सुरक्षा उपाय:
स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक सुरक्षा योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये सुरक्षा दलांसाठी एक स्पष्ट परिमिती निश्चित करणे, पोलिसांशी सल्लामसलत करून बॅरिकेडिंग योजना लागू करणे आणि सशस्त्र रक्षक, फोकस लाइट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे धोरणात्मकरीत्या स्थानबद्ध करणे समाविष्ट आहे. मजला चिन्हांकित करणे, आवश्यक नागरी कामे, अंतर्गत वीज पुरवठा खंडित करण्याची यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि भाराचे मूल्यांकन यांचा सामावेश आहे.

Monday, 21 October 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४
सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त;
यापैकी ७७३ निकाली ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दिनांक २१ ऑक्टोबर : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ७७३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ

जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण
संस्थेत प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ

जळगाव, दिनांक 21 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : इयत्ता १०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या अनुषंगाने राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण (महिला) या संस्थेतील विविध व्यवसायाच्या शिल्लक जागांसाठी प्रवेश प्रक्रीयेत मुदवाढ देण्यात आली आहे. दिनांक १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत मुदवाढ मिळाली असून आता उमेदवार राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरुन प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश प्रक्रिया सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु झाली आहे.

सदरच्या समुपदेशन फेरीसाठी दिनांक ३० ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे वरीष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. दिनांक २४ ते ३० ऑक्टोबर 2024 या कालावधीत एकत्रित समुपदेशन फेरीमध्ये पूर्वी राहीलेले उमेदवार व नव्याने अर्ज सादर केलेले उमेदवार यांना प्रवेश घेता येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला प्रवेश अर्ज भरण्यासाठी व निश्चीतसाठी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0 0 0 0 0 0 0

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल,

मुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दिनांक 21 : पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. सुरुवातीला राज्यपालांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेले 39 पोलीस अधिकारी व 177 पोलीस अमलदारांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली.
शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचून दाखविल्यानंतर पोलीस बँड पथकाद्वारे सलामी शस्त्र धून वाजविण्यात आली. यावेळी गणवेशधारी अधिकारी व जवानांनी सलामी दिली तसेच पोलिसांतर्फे अभिवादन रूपात बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. राज्यपालांनी निमंत्रित देश-विदेशी पाहुणे,वरिष्ठ पोलीस अधिकारी व हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Thursday, 17 October 2024

नाशिक उपजिल्हाधिकारी महेश जमधडे यांची निवडणुकीसाठी जळगाव येथे सेवावर्ग

नाशिक उपजिल्हाधिकारी महेश जमधडे यांची
निवडणुकीसाठी जळगाव येथे सेवावर्ग

जळगाव, दिनांक 17 ऑक्टोबर ( जिमाका ) : जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी महेश जमधडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) ल.पा. नाशिक यांची सेवा उपजिल्हाधिकारी (महसूल), जळगांव म्हणून वर्ग केली असून ते मुक्ताईनगर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.

आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे अधिसूचित केलेल्या पदाशी संबंधित उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात सेवावर्ग करण्याबाबत अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत.त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महेश जमधडे यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे. 

0 0 0 0 0 0 0 0 0

राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

नवी दिल्ली, दिनांक 17 ऑक्टोबर : महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार व स्मिता शेलार उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले.