पाटणादेवी
चैत्र महोत्सवानिमित्त
भाविकांनी
काळजी घ्यावी
:
तहसिलदार कैलास देवरे
चाळीसगाव दि. 07
(उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील
पाटणादेवी वासंतिक चैत्र महोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या
लक्षणीय असल्यामुळे यात्रोत्सवादरम्यान (दि. 10 ते 12 एप्रिल, 2017) करावयाच्या
उपाययोजनांसदर्भात आज तहसिलदार कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल
कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक (ग्रामीण)
श्री.गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एल.एम.राठोड, आगार व्यवस्थापक सचिन
चाचणे, मंडळ अधिकारी श्री.मोरे, पाटणादेवी संस्थानचे अध्यक्ष श्री.जोशी, तलाठी
श्री.गुरव आदि उपस्थित होते.
पाटणादेवी हे पवित्र ठिकाण असून येथील
पावित्र्य जपण्यासह परिसरातील वन्यजीवांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी
भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन करत तहसिलदार श्री.देवरे म्हणाले भाविकांनी
दर्शनासाठी येतांना सोबत आणलेल्या खाद्यपदार्थ व इतर वस्तुंमुळे परिसरात अस्वच्छता
निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. भाविकांना नवसाच्या कार्यक्रमासाठी ठरवून
दिलेल्या जागेत कार्यक्रम करावा तसेच नवसानंतर उरलेले अन्न इतरत्र न टाकता सोबत
घेऊन जावे. जागेअभावी मोठ्या वाहनांना प्रवेश निषिध्द असल्याची सर्व भाविकांनी
नोंद घ्यावी. वन परिसरात वाहनांसह वाद्याचा तसेच लाऊडस्पिकर यांच्या कर्कश आवाजाचा
वन्यजीवास बाधा होत असल्यामुळे याचा वापर टाळावा. भाविकांना दर्शन रांगेतच मंदिर
संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे प्लास्टिकच्या पाणी
बाटल्या सोबत बाळगू नये, बाळगल्यास त्या इतरत्र फेकु नये. चैत्र महोत्सवानिमित्त
येणाऱ्या सर्व भाविकांनी पाटणादेवी परिसरातील पावित्र्य जपण्यासोबत वन्यजीवांना
बाधा पोहचणार नाही यासाठी वरील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार कैलास देवरे
यांनी केले आहे.
पाटणादेवी यात्रोत्सवासाठी लाखोंच्या
संख्येने भाविक येत असतात या ठिकाणी वन परिसरात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने
तसेच उन्हाळी वातावरणामुळे प्राणी सायंकाळी बाहेर पडत असल्यामुळे भाविकांसाठी
दर्शनाची वेळ ही सकाळी 08:00 ते सायंकाळी 06:00 निश्चित करण्यात आली आहे. सायंकाळी
06:00 ते सकाळी 08:00 या वेळेत या परिसरात कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे
वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी यावेळी सांगितले. दर्शनासाठी येणाऱ्या
भाविकांनी कुठल्याही वन्यजीवाला धोका पोहचवू नये यासाठी वन्य जिव अधिनियम 1972
नुसार दंडास पात्र राहाल असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment