ई-भुमिपूजन सोहळाः राज्यातील 28
शहरांसोबत
पाचोरा येथील भुमिगत गटार योजनेचेही
भुमिपूजन
आ.
किशोर पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
चाळीसगाव,दि.13(उमाका वृत्तसेवा): स्वच्छ, सुंदर व
स्मार्ट शहरांसाठी शासन वचनबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील 28 शहरांत अमृत योजनेसह विविध
प्रकल्पासाठी 1622 कोटीची कामे मंजूर करण्यात आली असून मुंबई येथे
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथून राज्यातील 28 शहरातील
कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पाचोरा येथील
भुमिगत गटार योजनांच्या कामाचाही समावेश आहे.
यावेळी मुंबई येथे केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, पाणी पुरवठा व
स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नगर विकास राज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील
यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाचोरा येथे
नगरपरिषदेच्या सभागृहात आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष
शरद पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, नगरसेवक अमोल
शिंदे, मनिष भोसले, महेश सोमवंशी, दत्ता जळे, धर्मेंद्र चौधरी, सतिश चेडे, दादाभाऊ
चौधरी, शीतल सोमवंशी, राम केसवाणी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनीधी व पत्रकार
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरोत्थान अभियानांतर्गत पाचोरा
भुयारी गटार योजनेला 56.96 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये
सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी (ब्रँच शिवर) करिता 42.5 कोटी, सांडपाणी वाहून
नेणारी वाहिनी (ट्रंक मेन) 3.26 कोटी, नदी आणि रस्ता क्रॉसिंग करिता बांधकामासाठी 0.44
कोटी, पंपिंग स्टेशन बांधकाम व डिझाईनसाठी 1.09 कोटी, इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल
कामांसाठी 1.88 कोटी, उर्ध्ववाहिनीसाठी 0.45 कोटी , डिलीवरी चेंबरसाठी 0.02 कोटी ,
मलशुध्दीकरण केंद्रासाठी 7.25 कोटी तर
ॲप्रोच 200 मीटर रस्त्यांसाठी 0.07 कोटी असा एकूण 56.96 कोटी खर्चाचा आराखडा सादर
करण्यात आल्याचे आमदार किशोर पाटील यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. ही सर्व
कामे वेळेत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार
असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.
पाचोरा शहराच्या विकासकामांसाठी भरीव
निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांचे आभार यावेळी बोलतांना व्यक्त केले. तसेच नगर विकास विभाग, महाराष्ट्र
जिवन प्राधिकरण आदी यंत्रणांचेही आभार व्यक्त केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment