मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी
वंचीत राहणार नाही
: खासदार ए.टी.पाटील
चाळीसगाव,दि.19(उमाका वृत्तसेवा): मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहू
देणार नाही यासाठी तहसिल कार्यालयासह पक्ष
कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष उभारून लाभार्थ्यांना अधिकारी, पदाधिकाऱ्यांमार्फत
मार्गदर्शन करण्यात येईल असे प्रतिपादन खासदार ए.टी.पाटील यांनी आज केले.
मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत
जास्त तरुणांना मिळावा तसेच त्यांचा सहभाग वाढावा यासाठी या योजनेचा प्रचार,
प्रसार व समन्वय करण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य अशा मुद्रा
लोन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा आशालता
चव्हाण, पंचायत समिती सभापती स्नेहल बोरसे, संपदा पाटील, के.बी.साळुंखे,
घृष्णेश्वर पाटील, आण्णा कोळी, रंजना सोनवणे, तहसिलदार कैलास देवरे, निवासी नायब
तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, ज्ञानेश्वर अमृतकर, मानसिंग राजपूत, भरत
गोरे यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
मुद्रा योजनेच्या
माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार
तरुणांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील विविध
बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगत खासदार
श्री.पाटील पुढे म्हणाले, या योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना होण्यासाठी
प्रत्येक बँकेत मुद्रा लोन योजनेचे फलक लावण्यात यावेत, तर मुद्रा लोन साठी
नागरिकांना असलेल्या समस्या, तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यासाठी तहसिल कार्यालयात
स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुद्रा लोन योजनेचा
दरमहा आढावा घेण्यात येणार असून ही योजना तळागाळात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात
पोहचावी, या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात असे निर्देशही
त्यांनी दिले. तर नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घेऊन आपले जीवनमान
उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकात
तहसिलदार कैलास देवरे म्हणाले, मुद्रा लोन योजनेतंर्गत शिशु गट, किशोर गट आणि तरुण
गट असून या गटानुसार पात्र लाभार्थ्यांना विविध बँकांव्दारे अर्थसहाय्य देण्यात
येते. मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज
उपलब्ध होऊ शकते. त्याच बरोबर सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी,
भाजीपाला व फळविक्रेते आदी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतूद
करण्यात आली आहे. या योजनेव्दारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि
त्यातून छोटे-मोठे उद्योग निर्माण व्हावे या हेतुने प्रधानमंत्र्यांच्या
संकल्पनेतून मुद्रा योजना राबविली जात आहे. या योजनेची प्रभावी आणि परिणामकारक
जागृती करुन ही योजना अधिक गतिमान आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व बँकांनी
सहकार्य करण्याचे आवाहनही तहसिलदार श्री.देवरे यांनी यावेळी केले.
यावेळी बँक ऑफ
महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांनी योजनेची सविस्तर माहिती सांगतांना लाभार्थ्यांनी
कुठल्याही मध्यस्थाशिवाय बँक व्यवस्थापनाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी
उमंग समाजशिल्पी मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन
करत या योजनेत महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर
मुद्रा लोन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या युनियन बँकेसह बँक ऑफ महाराष्ट्र
च्या बँक अधिकाऱ्यांचा खा.ए.टी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खासदार
ए.टी.पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
यावेळी दारिद्रय
रेषेखालील (बी.पी.एल.) कुटूंबाचा कर्ता प्रमुख व्यक्तीचे निधन झालेल्या
कुटूंबांच्या वारसांना अर्थ सहाय्य देण्यासाठी राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य
योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना आज खासदार ए.टी.पाटील यांच्या हस्ते धनादेशांचे
वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहसिलदार विशाल सोनवणे तर आभार
नानासाहेब आगळे यांनी मानले.
* * * * * * * *