Friday, 25 November 2016

नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज : प्रातांधिकारी शरद पवार


नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
                                                : प्रातांधिकारी शरद पवार

चाळीसगांव,दिनांक 25 :-  नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाबरोबरच 17 प्रभागातील 33  नगरसेवक उमेदवारांच्या जागांसाठी 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
            चाळीसगाव शहरात एकूण 103 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर 6 कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत. शहरात 81 हजार 305 मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी 103 मतदान केद्रांची रचना करुन मतदान यंत्राची तपासणी व सिलिंग झाले आहे. तर याची चाचणी देखील तहसिल कार्यालयाच्या आवारात घेण्यात आल्याचे प्रातांधिकारी श्री.पवार यांनी कळविले आहे.
            प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. दरम्यान सर्व मतदान केंद्रावर क्रमांक टाकण्याची कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 200 पोलीस कर्मचाऱ्यांसह 150 गृहरक्षक (होमगार्ड) दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
            निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पडणार असून नागरिकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
मतदान केंद्रासह मतमोजणी स्थळाची केली पहाणी
            दरम्यान शहरातील मतदान केंद्रासह मतमोजणीसाठी निश्चित झालेल्या जिमखान्यातील स्थळाची पहाणीही यावेळी करण्यात आली यावेळी निवडणूक निरीक्षक दिलीप स्वामींसह निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरिक्षक आदिनाथ बुधवंत, नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment