Sunday, 2 October 2016

शहरातील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे : पोलीस निरीक्षक बुधवंत

शहरातील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे
                                            : पोलीस निरीक्षक बुधवंत
चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव शहरात होणा-या चो-या व गुन्हयांना आळा घालण्यासाठी  नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे नागरिकांनी बाहेरगावी जातांना किंवा बाजारात खरेदी  किंवा अन्य कामांसाठी बाहेर जातांना आपल्या शेजारच्यांना योग्य कल्पना द्यावी जेणे करून आपण बाहेरून परत येईपर्यंत आपले शेजारी आपल्या घराकडे योग्यप्रकारे लक्ष ठेवू शकतील.
      बाहेरगावी जातांना आपल्याकडील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी  तसेच आपल्या शेजारी व परिसरातील बंद घरांमध्ये काही संशियत हालचाली आढळल्यास त्वरीत जवळच्या पेालीस चौकीशी किंवा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी चांगल्या दर्जाचे कडी कोंडे व कुलूपांचा वापर करावा, बाहेर जातांना दारे ,खिडक्या व्यवस्थित बंद केल्याची खात्री करूनच घरा बाहेर पडावे. घराच्या परिसरात रात्रीच्या वेळेस चांगला प्रकाश राहील असे दिवे वापरावेत.
      नेहमी बाहेर किंवा बाहेर गावी जातेवेळी  शेजा-यांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करावी तथापि शेजा-यांना आपण बाहेर गावी जात असल्याची कल्पना देत असताना आजूबाजूला अनोळखी वा संशियत व्यक्ती नाही याची प्रथम खात्री करून घ्यावी.
घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी
            शहरातील बहुतांश घरमालक हे आपली वास्तु भाडेतत्वार देत असतात. मात्र अशा भाडेकरुंची माहिती ही नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक असुनही त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळते. यासाठी शहरातील सर्व घरमालकांनी आपल्या भाडेकरुंची माहिती विहीत नमुन्यात त्यांच्या छायाचित्रांसह नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.
            नागरिकांनी अशा स्वरूपाची दक्षता घेऊन सतर्कता बाळगल्यास चो-या व अनुचीत प्रकार रोखण्यास नक्कीच मदत होईल असे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment