Tuesday, 24 March 2015

लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने जलयुक्त शिवार अभियान राबवावे : प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील


लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने
जलयुक्त शिवार अभियान राबवावे
: प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील

              चाळीसगांव, दिनांक 24 :-  सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 हे धोरण निश्चित करुन राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य आत्मा हा लोकसहभाग आहे. लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने अभियान राबविल्यास अभियान यशस्वी होऊन टंचाईवर यशस्वीपणे मात करणे शक्य होईल असे आवाहन पाचोरा तालुक्यातील लोहारा गावचे प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील यांनी लोहारा येथे केले.
                     राज्य व देशभरातुन अनेक कृषी पुरस्काराने सन्मानित झालेले व सेंद्रीय शेतीमध्ये वेगळी ओळख निर्माण करुन आपल्या यशस्वी कार्याचा ठसा देशभरात उमटविणारे पाचोरा तालुक्यातील लोहा-याचे प्रगतीशील शेतकरी विश्वासराव पाटील यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय कामकाज व अनुभव पहाता त्यांना जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हा स्तरावरील समितीवर तज्ञ सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. त्यांच्या शेतशिवाराची पहाणी करण्यासाठी पाचोरा प्रातांधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष गणेश मिसाळ, तालुका कृषी अधिकारी तथा समिती सदस्य सचिव दिपक ठाकूर, सरपंच अक्षय जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाणी दौ-यात श्री.पाटील बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत लोहारा गावाची निवड झाली असून विश्वासराव पाटील यांच्या कोरडवाहु शेतामध्ये जलसंधारण व मृदसंधारणाबाबत त्यांनी केलेल्या विविध कामांची पहाणी करतांना म्हणाले की, स्वत:च्या खर्चातुन 25 वर्षापुर्वी लोंदडी नाल्यावर केलेला सिमेंट बंधा-यामुळे त्यांच्या शेतीची वाढती उत्पादकता पहाता सर्व शेतक-यांनी शासनाच्या मदतीची वाट न पहाता ज्यांना शक्य असेल त्यांनी छोटे-छोटे बंधारे बांधले पाहिजेत. जिल्हयाभरात ज्या नाल्यांवर कृषी विभाग व लघुसिंचन विभाग यांच्याकडून सिमेंट नालाबांधची कामे झाली आहेत तेथील बांधामध्ये साचलेला गाळ व केरकच-यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. यासाठी  बांधाकाठच्या शेतक-यांनी एकत्र येऊन जे.सी.बी. च्या सहाय्याने खोदकाम करुन गाळ व कचरा काढून नाल्याची खोली व रुंदी वाढविल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढते व काढलेला गाळ हा सुपिक असल्यास शेतामध्ये टाकून शेतीची सुपिकता देखील वाढते. त्यामुळे उत्पादन वाढीवर निश्चीत परिणाम होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
                     लोहा-यामध्ये मागील वर्षी सुमारे 2200 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडीगचे म्हणजेच शेताच्या बांधाचे मजबुतीकरण करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात जिरण्यास मोठी मदत झाली तर भुजल पातळीत देखील मोठया प्रमाणात वाढ झाली. अशा प्रकारची कामे कृषी विभागामार्फत संपुर्ण जिल्हयात करण्यात येत आहे मात्र यामुळे शेतात पाणी साचुन पिकांचे नुकसान व जमीन खराब होईल या अज्ञानामुळे अनेक शेतकरी हे कंपार्टमेंट बंडींग फोडतात व केलेले जलसंवर्धनाचे काम व्यर्थ जाते. शेतक-यांनी चुकीच्या समजावर आधारित राहून असे बांध फोडु नये असे आवाहनही त्यांनी यांवेळी केले.            जिल्हयाभरात ज्या नाल्यांवर कोल्हापुरी पध्दतीने बंधारे झाले आहेत तेथील पाटया हया पावसाळयापुर्वी काढणे व ऑक्टोंबर वा नोव्हेंबर ‍ महिन्यात पुन्हा टाकणे हे काम आसपासच्या शेतक-यांनी स्वयंस्फुर्तीने समिती तयार करुन पुढाकार घेऊन केले पाहिजे. शिवारातील पाणी  जमिनीत जिरविल्यास त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात होऊन चांद्या पासून बांधा पर्यंत संपुर्ण परिसर सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
                     यावेळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ म्हणाले की, मागील दोन वर्षापुर्वी याच गावाला दर दिवसाला 24 टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. त्यावरुन या गावातील पाणी टंचाईची ‍भिषणता लक्षात येते. त्यावर मात करण्यासाठी प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील यांनी जलसंधारणाच्या केलेल्या कामाचा आदर्श सर्व शेतक-यांनी घेतल्यास जिल्हाभरात जल व मृदसंधारणाचे प्रचंड मोठे काम होण्याचा आशावाद व्यक्त केला. तर तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकूर यांनी विश्वासराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांचा सत्कारदेखील केला. यावेळी सरपंच अक्षय जयस्वाल यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व शेतक-यांच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याची हमी घेतली. तर मंडळ अधिकारी महेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

* * * * * * * *

Sunday, 15 March 2015

ग्राहक जागरुक राहिल्यासच तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल : आमदार : उन्मेश पाटील

ग्राहक जागरुक राहिल्यासच
तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल
आमदार : उन्मेश पाटील

              चाळीसगांव, दिनांक 15 :- ग्राहक जागरुक राहिल्यासच तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी आज जागतिक ग्राहक दिनानिमीत्त तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे आयोजित कार्यक्रमात केले. प्रतिमा पुजन करुन प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार उन्मेश पाटील व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार उन्मेश पाटील हे होते.
                     अध्यक्षीय भाषणात आमदार उन्मेश पाटील  म्हणाले की,  ग्राहकांना आपल्या हक्काबद्दल पुर्ण जाणिव असने आवश्यक आहे. काही अज्ञानी ग्राहक व काही अनास्थादर्शक ग्राहकांमुळे ग्राहक हक्कात बाधा निर्माण होऊन व्यापारी व उत्पादक याचा फायदा घेतात. आमदार पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक प्रबोधनासाठी व ग्राहक कायद्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रचार व प्रसार होण्यासाठी मी प्रायोजक म्हणून त्यासाठी वर्तमानपत्रांमधुन जाहिरात पत्रके, मुख्य चौकातील फलकाव्दारे जनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनीधी या नात्याने माझ्याकडून मी स्वत: पंचवीस हजाराची मदत देण्यास तयार आहे. तसेच ग्राहक चळवळ अधिक बळकट होण्यासाठी ग्राहक संघटना, सार्वजानिक क्षेत्रातील संघटना, व्यापारी ठेकेदार, पुरवठादार, बि-बीयाणे व खत विक्रेते यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मौलीक सुचना देखील तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांना केली.
                     ग्राहक पंचायत चाळीसगांव अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चाळीसगांव शाखेचे सचिव तथा ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक रमेश सोनवणे यांनी आप-आपल्या यथोचित भाषणात ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, ग्राहक कायद्याची निर्मीती, उद्देश, ग्राहक कायद्याचा इतिहास, ग्राहकांना मिळालेले न्याय, तक्रार करण्याची पध्दत, या विषयी विस्तृत माहिती देऊन काही प्रबोधनपर उदाहरणे दिली. व उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले.
                     मनुष्य हा आजन्म ग्राहक असतो म्हणून प्रत्येकाने एक जबाबदार ग्राहक बनावे, वस्तु घेतांना त्याची वैधता, आकारमान, दर, योग्यता या सर्व बाबी तपासल्यास आपली फसवणूक होणार नाही असे सांगून या कायद्याविषयी विस्तृत स्वरुपात विश्लेषण आपल्या प्रास्ताविकातुन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले.
                     या प्रसंगी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन चाळीसगांवचे सचिव विकास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहीदास पाटील, शाम शिरोडे, लालचंद बजाज, तालुका भाजपा अध्यक्ष के.बी.पाटील, कृष्णेश्वर पाटील, ग्रहक संघटना सदस्या डॉ.सुनिता घाटे, डॉ.मधुलिका महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बीएसएनएल, एमएसईबी  व वजनमापे कार्यालयाचे प्रतिनीधी, महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ यांनी मानले.

* * * * * * * *