Tuesday, 30 September 2014

अंगणवाडी सेवीकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा ! महिलांशी थेट संपर्क असल्याने होणार फायदा : नायब तहसिलदार विशाल सोनवणे


अंगणवाडी सेवीकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा !
महिलांशी थेट संपर्क असल्याने होणार फायदा
: नायब तहसिलदार विशाल सोनवणे

            चाळीसगांव,दिनांक 01:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघासाठी किमान 75 टक्के मतदानाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असून परदेशी बोर्डींग सभागृहात अंगणवाडी सेविकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी  नायब तहसिलदार विशाल सोनवणे,  महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत, मास्टर ट्रेनर प्रा.डि.एल.वसईकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस आदि उपस्थित होते.
            भारत निवडणूक आयोगाने स्वीप-2 हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने दिलेल्या नऊ मुद्यांचा  तपशि ल  श्री.सोनवणे यांनी उपस्थित ‍ महिलांना समजाऊन सांगितला तर एकूण लोकसंख्येमधील  महिलांचे प्रमाण आणि एकूण मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे (Gender Ratio) यावर अधिक भर देण्यात आला. अंगणवाडी सेविकांचा ग्रामीण भागात थेट महिलांशी येणार संपर्क लक्षात घेता महिला मतदारांमधील मतदानाविषयी असलेली उदासिनता घालविण्याची जबाबदारी प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी घ्यावी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्याव असे आवाहनही श्री. सोनवणे यांनी ‍ उपस्थित अंगणवाडी सेविकांना केले.
            यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.वनिता सोनगत म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन कामकाजातील गृह भेटी व माता बैठकीतून प्रबोधन करतांना आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. व दिलेले लक्ष यशस्वीपणे पुर्ण करावे. मतदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान हा संदेश घराघरात पोहचवून मतदारामध्ये जनजागृतीचे काम यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी त्यांनी उपस्थितांना सांगितले.
            यावेळी मास्टर ट्रेनर प्रा.डि.एल.वसईकर यांनी मतदान यंत्राविषयी  माहिती देऊन मतदान यंत्राचे प्रात्याक्षिक दाखविले. मतदारांमध्ये जनजागृती करतांना आपल्याला एकही उमेदवार पसंत नसेल तर नोटा चा वापर करावा परंतु मतदान करावेच मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजवावा अशा प्रकराचे प्रबोधन आपल्यामार्फत गावोगावी करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिल कार्यालयातील ज्ञानेश्वर अमृतकर, विशाल मराठे, गिरीश पाटील यांनी योगदान दिले.

                                                        * * * * * * * *

No comments:

Post a Comment