Tuesday, 8 July 2014

लोक सहभागातून झाला शिवार रस्ता मोकळा


लोक सहभागातून झाला शिवार रस्ता मोकळा
                      
            चाळीसगाव, दिनांक 8 जुलै :- पाचोरा तालुक्यातील साजगांव-लोहारी पानंद रस्ता लोकसहभागातून मोकळा झाला असून लोकवर्गणीतुनच या रस्त्याची डागडुजी करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी  कळविले आहे.
            शेती उद्योगाला  आधुनिक यंत्राची  जोड मिळावी,  शेतमालासाठी  दळणवळणाची साधने जागेवर उपलब्ध व्हावी, पावसाळयात शेतक-यांना रस्ता उपलब्ध व्हावा अशा प्रकारच्या विविध समस्यांचे निराकरण होण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी ‍ नाशिक विभागातील सर्व महसूल अधिका-यांना शिवार रस्त्यांचे  प्रश्न निकाली  काढण्याच्या सुचना करुन  विशेष  मोहिम राबविण्यासाठी  आदेशीत केले आहे. तर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुक्यात प्रथमच साजगांव-लोहारी हा शिवार रस्ता गांवक-यांसाठी खुला करुन या मोहिमेचा शुभारंभच केल्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.
            त्याच बरोबर पाचोरा विभागातील इतर शेतक-यांनी देखील या मोहिमेचा लाभ घेऊन आप-आपल्या  शेतातील ‍शिवार रस्ता, पानंद रस्ता खुला करण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही  केले आहे.
            प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश

            साजगांव-लोहारीचा पानंद रस्ता खुला करण्यासाठी गावक-यांपैकी रविंद्र हिम्मत बडगुजर,  शांताबाई विठ्ठल बडगुजर, रामराव पंडीत वाघ, देविदास पंडीत वाघ, कलाबाई  सुभाष वाघ, सुधाकर ओंकार वाघ, भगवान राजधर वाघ सर्व राहणार लोहारी बु. तर प्रकाश भिकन राहुटे, रमेश गिरधर चौधरी राहणार साजगांव यांच्यापैकी रमेश गिरधर चौधरी यांनी शेतामध्ये पाणी जमा होईल करिता या रस्त्यासाठी विरोध केला होता, तर या रस्त्याचे महत्व प्रांताधिका-यांनी पटवून दिल्या नंतर त्यांचाही विरोध मावळून त्यांचा सहभाग व सहकार्य लाभले असून वरील शेतक-यांनी लोकवर्गणीतुन प्रत्येकी  रुपये 3 हजार प्रमाणे रक्कम जमा केली असून उर्वरित कामासाठी लागणारा निधीही स्वत: गोळा करणार असल्याचे कळविले आहे.
या कामी उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार  गणेश  मरकंड, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी, मंडळ अधिकारी कुलकर्णी, तलाठी शहाणे यांनी सदर रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न केले असून गावक-यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ‍ प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आहे.

* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व छायाचित्र  हे  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

                                         * * * * * * * *

No comments:

Post a Comment