महसूल दिवस हा महसूल साक्षरता अभियान राबवून साजरा करणार !
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगाव, दिनांक
31 जूलै :- 1 ऑगस्ट हा दिवस राज्यभर महसूल दिवस म्हणून
साजरा केला जातो. या वर्षी महसूल दिवस हा महसूल साक्षरता अभियान राबवून साजरा
करणार असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली. 1 ऑगस्ट पासून
महसूली वर्ष सुरु होत असून 1 ऑगस्ट ते 31 जुलै असा महसूली वर्षाचा कालावधी
ठरविण्यात आला आहे करिता 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिवस म्हणून संपुर्ण राज्यात साजरा
करण्यात येत असतो.
महसूल दिनाचे औचित्य साधत पाचोरा
उपविभागात महसूल साक्षरता अभियान राबविण्यात येणार असून प्रत्येक गावातील संबंधित
तलाठी हे महसूल विषयक सर्व बाबींचे शेतकरी , खातेदार यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यात फेरफार नोंदी घेण्याची प्रक्रीया, पिक पहाणी, ई-चावडी, चावडी वाचन, शिवार
रस्ते मोकळे करणे, समाधान योजना, शालेय दाखले वाटप, शालेय शिबीर, आधारवड योजना व
सुवर्णजयंती राजस्व अभियानाबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.
तसेच 1 ऑगस्ट, 2014 रोजी पाचोरा
तालुक्यातील वाघुलखेडा या गावी सुवर्णजयंती राजस्व अभियानातंर्गत भिल्ल जमातीच्या
दोनशे दाखल्यांचे वस्तीमध्ये जाऊन वितरण केले जाणार असल्याचेही त्यांनी कळविले
आहे. पाचोरा व भडगांव तालुक्यातील आधारवड योजनेतील नवीन 2925 लाभार्थ्यांपैकी 215
लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार असून उर्वरीत लाभार्थ्यांनाही आपले
बँक खातेक्रमांक संबंधित तलाठयांकडे त्वरीत देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सुवर्णजयंती राजस्व अभियानातंर्गत उत्पन्न
दाखला, अधिवास दाखला, नॅशनॅलिटी, रहिवास दाखला, व इतर शैक्षणिक कामासाठी लागणारे
दाखल्यांचे वाटप पाचोरा तालुक्यातील 25 माध्यमिक शाळांमध्ये तहसिलदार, नायब
तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत वाटप केले जाणार आहे, तर भडगांव
तालुक्यात एकुण 825 दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. शिवार रस्ते मोकळे
करण्यासाठी मा.विभागीय आयुक्तांनी राबविलेल्या अभियानाच्या अनुषंगाने भडगांव
तालुक्यातील मांडकी येथील शिवाररस्ता लोकसहभागातून मोकळा केलेला असून त्या ठिकाणी
या अभियानास चालना मिळून प्रलंबीत असलेले शिवाररस्ते प्रकरणे मार्गी लावण्यासाठी
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भडगांव तालुक्यातील महिंदळे येथे
दाखले वाटप व रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून दुपारी 05:00 पाचता
प्रांत कार्यालयात महसूल विभागातील गुणवंत कर्मचा-याचा गुणगौरव कार्यक्रमाचे
आयोजनही करण्यात आले असून महसूल दिनी आयोजित महसूल साक्षरता अभियानात सर्व शेतकरी,
ग्रामस्थ, नागरिक, विदयार्थी, यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उप विभागीय अधिकारी
गणेश मिसाळ यांनी केले आहे.
* * * * * * * *