राज्यातील
सर्व तालुक्यात प्रशासकीय इमारती उभारणार !
:
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
जळगाव, दि. 17 :- तालुक्यातील विविध
कार्यालये एका छताखाली आल्याने नागरिकांची गैरसोय दूर होऊन नागरिकांची कामे जलद
गतीने होतील यासाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रशासकीय इमारती उभारण्यात
येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रावेर येथील प्रशासकीय
इमारतीचे उद्घाटन प्रसंगी केले.
जळगांव जिल्हयातील रावेर येथे 278.67 लक्ष
रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला. यावेळी माजी
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, कॉग्रेस
अध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे, आमदार
शिरीष चौधरी, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले,
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आदि उपस्थित होते.
मंत्रीमंडळात घेण्यात येणा-या
निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम हे प्रशासनाचे असुन आत्ताच घेतलेल्या कुळकायदा
कलम 43 च्या कार्यवाही बद्दल प्रशासनाचे कौतुक करतांना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले
की, महसुल प्रशासनाने केवळ महसुल जमा करण्याचे काम न करता सामाजिक बांधिलकी जपुन
विविध योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात तसेच शेवटचा माणुस दारिद्र रेषेच्यावर
आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून लोकाभिमुख प्रशासनाची ओळख निर्माण करण्याचे आवाहनही
त्यांनी महसुल प्रशासनास या वेळी केले. यावेळी कुळकायदा कलम 43 चा निर्बंधाचा शेरा
कमी करुन तालुक्यातील 41 खातेदारांचे अर्ज निकाली काढण्यात आले होते. त्यापैकी दोन
शेतक-यांना मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते निर्बंधमुक्त 7/12 चे प्रातिनिधीक
स्वरुपात वाटप करण्यात आले.
यावेळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या आधारवड
योजनेखाली चांगले काम झाले असून आधारवड योजना ही संपुर्ण राज्यात राबविण्यात येईल
यामुळे वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या सामाजिक आर्थिक योजनेत सहभागी करुन
त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री
संजय सावकारे, आमदार शिरीष चौधरी यांचेही समायोचित भाषणे झाली.
आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रुबल
अग्रवाल यांनी प्रशासकीय इमारतीची माहिती करुन दिली व जिल्हा प्रशासनाने
राबविलेल्या आधारवड योजनेबाबत विस्तृत स्वरुपात माहिती दिली. जिल्हयात टंचाई
परिस्थिती आज नसली तरी भविष्यात टंचाई सदृष्य परिस्थीती उदभवल्यास त्यावर मात
करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी यावेळी
सांगितले.
यावेळी प्रशासनाचे विविध अधिकारी,
कर्मचारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.तर
नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले
यांनी आभार मानले.
* * * * *
* * * *
No comments:
Post a Comment