Monday, 9 June 2014

“ आधार वड ” मुळे वंचितांना मिळणार न्याय !

आधार वड मुळे वंचितांना मिळणार न्याय !
: प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

                      
            चाळीसगाव, दिनांक 9 जून :-  राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना, विशेष सहाय्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली आधारवड मोहिम राबविण्यात येत असून यामुळे शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही असे  प्रांता‍धिकारी मनोज घोडे पाटील यांनी  तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त बैठकीत सांगितले.
            आधारवड मोहिमेंतर्गत कालबध्द कार्यक्रमाव्दारे राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनांतर्गत लाभ मिळण्यांस पात्र असलेल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना कामकाजाची रुपरेषा निश्चित करुन देण्यासाठी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  त्यावेळी ते बोलत होते.
समाजातील ‍ निराधार, वृध्द, भूमीहीन, शेतमजूर,विधवा, अपंग, नैसर्गिक अथवा अपघाती  मृत्यु झालेल्या मयत व्यक्तींचे वारस इ. पैकी ज्या व्यक्ती  स्वत:चा उदरनिर्वाह करु शकत नाहीत अशा निराधार व्यक्तीपैंकी पात्र लाभार्थ्यांना उदर निर्वाहाचे साधन म्हणून वरील विविध योजनांतर्गत  शासनाकडून  अनुदान स्वरुपात  दरमहा किंवा एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना बराच कालावधी लागतो. एकंदरीत प्रचलित कार्यपध्दतीमुळे समाजातील वरील घटकांना अर्थसहाय्य मंजूर करण्यास विलंब होत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या या योजनांचा लाभ महसूल विभागामार्फत स्वत:हून पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
प्रशासनातर्फे आजतागायत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजनेचे एकूण 6870 लाभार्थी होते त्यासाठी या योजनेतंर्गत 3110 इतके अर्ज प्रशासनाकडे जमा झाले आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेतंर्गत  1949 लाभार्थी असून 47 नवीन अर्ज जमा करण्यात आले आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य  निवृत्ती योजनेचे 821 लाभार्थी असून 89 नवीन अर्ज जमा झाले आहेत. अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनेचे तालुक्यात आतापर्यंत एकूण 9680 लाभार्थी असून  या ‍ मोहिमेतंर्गत एकूण 2 हजार नवीन लाभार्थींचे उध्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. तर प्रशासनातर्फे आधारवड  मो‍हिम  राबविण्यासाठी अहोरात्र कामकाज सुरु असून  ठरवून ‍दिलेल्या उध्दीष्ठापेक्षा ‍ अधिक लाभार्थी  करण्यात येतील असे  प्रांताधिका-यांनी कळविले आहे.
            या विशेष मोहिमेंतर्गत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनांचा लाभ ‍मिळविण्यासाठी ‍संबंधित व्यक्तीने तहसिल कार्यालयाकडे अर्ज न करता संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांचेकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरून घ्यावयाचे आहेत. अर्ज मंजूरीसाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांची पूर्तता करुन तलाठी व ग्रामसेवकांनीच सदर अर्ज तहसिल कार्यालयात जमा करावेत. त्यामुळे अर्जदारांना तहसिल कार्यालयात येवून अर्ज करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, अर्ज मंजूरीसंदर्भात पाठपुरावा करणे या साठी त्रास सहन करावा लागणार नाही.
                        एकंदरीत शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी हाच प्रमुख उद्देश असून आधार वड मोहिमेचा उद्देश सफल होण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे तसेच प्रांताधिकारी  मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment