Saturday, 14 June 2014

बोगस बियाणे विक्री तसेच खत साठेबाजांवर कठोर कारवाई करणार ! जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


बोगस बियाणे विक्री तसेच
खत साठेबाजांवर कठोर कारवाई करणार !
: जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
                     
            चाळीसगाव, दिनांक 14 जून :-  जिल्हयात बोगस बियाणे विक्री तसेच खत साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी चाळीसगांव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामस्थांच्या सभेमध्ये दिले. यावेळी उप विभागीय अधिकारी  मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी वसंत शिंदे आदि उपस्थित होते.
            लोकाभिमुख गतिमान प्रशासनासाठी जिल्हाधिकारी यांनी थेट ग्रामीण भागात जाऊन ग्रामस्थांशी हितगुंज करुन शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी चाळीसगांव तालुक्यातील तरवाडे या गावाला भेट दिली. गावातील साईबाबा मंदीरातील आरतीला उपस्थित राहून मंदीर परिसरातच ग्रामस्थांची सभा घेण्यात आली. या सभेला सरपंच सिंधुताई गरुड, उपसरपंच तुकाराम चौधरी, तंटा मुक्त अभियानचे विलास आप्पा गवळी यांच्यासह तालुका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व तरवाडे गावचे ग्रामस्थ महिला, विद्यार्थी,  मोठया संख्येने उपस्थित होते.
            सर्व प्रथम आधारवड योजनेच्या विशेष मोहिमेंतर्गत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनांचा लाभ ‍मिळविण्यासाठी गावातुन सादर झालेल्या प्रस्तावांचा आढावा जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी घेतला. त्यानंतर प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे व तालुका कृषी अधिकारी वसंत शिंदे यांनी ग्रामीण भागात राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना करुन दिली. तदनंतर जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यात शिवाजी दशरथ चौधरी यांनी बोगस बियाणे विक्री थांबविण्यासाठी तसेच खत साठेबाजाविरुध्द कारवाई करण्याची विनंती केली. ग्रामस्थ भगवान विसपुते, चेतन अमृतकर, सचिन चौधरी, ताईबाई विक्रम सोनवणे, आबा किसन कोळी, निर्मलाबाई पवार, सुनिल प्रकाश निकम, गजाननकृपा महिला बचतगट यांच्या सह ग्रामस्थांनी शिधापत्रीका, अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, कृ‍षि विभागातील सबसिडी, पिण्याचे पाणी,  शौचालय,  प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचा अभाव, स्मशान भुमीच्या समस्या, फरशी पुलाचे काम, विज वितरण कंपनीचे खांब आदि मुलभूत समस्या जिल्हाधिका-यांसमोर मांडल्या तर जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी बोलविलेल्या तालुका प्रशासनातील अधिका-यांना गावक-यांसमक्ष सुचना व मार्गदर्शन करुन त्या तातडीने सोडविण्याच्या सुचना केल्या. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कामकाज प्रगती पथावर असून पुढील महिनाभरात पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार असल्याचेही जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
            ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या आपल्या गावात आल्या असून आपणास मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले तर नाविन्यपुर्ण योजनेत 5 हजार नवीन लाभार्थ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी आधारवड योजना या विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आपल्या प्रस्तावनेतून मांडले.
            साईबाबा मंदीरातील सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी संपुर्ण गावात फिरुन गावातील जनतेशी संवाद साधला, ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, स्वस्त धान्य दुकान, आश्रमशाळेची पहाणी करुन गावातील शेतक-यांकडेच रात्रीच्या जेवणाचा खान्देशी आस्वाद देखील त्यांनी घेतला. बायकांनी आपल्या संस्कृती प्रमाणे श्रीमती अग्रवाल यांचा सत्कार केला. एकुणच तालुक्यातील तरवाडे गावाला भेट देऊन जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले व  तालुका प्रशासनाचे कौतुकही केले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment