मतदानाचा पवित्र हक्क बजावून
लोकशाही बळकट करावी
: प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील
चाळीसगाव, दिनांक 8 एप्रिल :- सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आज तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर महसुल प्रशासनातर्फे मतदार जनजागृती करिता चित्ररथ तयार करण्यात आला असुन या चित्ररथाचे उदघाटन आज प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, नायब तहसिलदार ए.एम.परमार्थी आदि उपस्थित होते.
यावेळी माहिती देतांना प्रांताधिकारी म्हणाले की, भारतीय दंड संहिता कलम 171(ख) नुसार निवडणुक काळात मतदान करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला प्रलोभन किंवा अमिष देणे किंवा इतरांसाठी स्विकारणे हा गुन्हा असुन सदर गुन्हयासाठी 1 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही स्वरुपाची शिक्षा संबंधित व्यक्तीला होऊ शकते. तसेच कोणतीही व्यक्ती एखाद्या मतदाराला त्याचे इच्छे विरुध्द् जबरदस्तीने मतदान करण्यास भाग पाडेल किंवा त्याला कोणत्याही प्रकारची शारीरीक दुखापत करेल, धमकी देईल अशा व्यक्तीला 1 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही स्वरुपाची भारतीय दंड संहिता कलम 171(ग) नुसार संबंधित व्यक्तीला होऊ शकते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मतदान प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा या करिता महसुल प्रशासनाने विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले असुन त्याअनुषंगाने चित्रफित तयार करण्यात आली आहे व ही चित्रफित चित्रपट गृहात चित्रपट सुरु होण्याआधी व मध्यांतराच्या वेळी प्रसारण करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. सदर चित्रफितीचे प्रसारण हे स्थानिक केबलवरुनही सुरु करण्यात आल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले. मतदार जनजागृतीसाठी मतदारांकडुन संकल्प पत्र भरुन घेणे, गावागावात सभा घेऊन मतदान यंत्राचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण देणे, मतदानासाठी प्रबोधन करणे, पोस्टर्स, बॅनर्स लावणे, मोबाईल व्हॅन व्दारे जनजागृती करणे असे विविध प्रकारचे कार्यक्रम महसुल प्रशासनाने हाती घेतले आहेत. महाविद्यालयांमध्ये युवा मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कॅम्पस ॲम्बेसेडरची नियुक्ती केल्याने मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पहाता तालुक्यातील आशा सेवीका व आरोग्य सेवीकांनाही मतदार जागृतीसाठी सहभागी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा मतदार संघातून आजतागायत 47,160 इतके संकल्प पत्र भरुन घेण्यात आले असून मोहिम सुरुच ठेवण्यात आली आहे. यावेळी किमान 75 टक्के पेक्षा अधिक मतदानाचे लक्ष प्रशासनाने निश्चित केल्याचेही यावेळी सांगितले.
शहरातील मतदार जनजागृतीसाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन नगर परिषदेमार्फतही मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment