मतदानाचा नकाराधिकार अर्थात
‘नोटा’
ज्या मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची
इच्छा नसेल ते मतदार आपला मतदानाचा हक्क कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता गोपनीयरित्या
बजावू शकतील कारण आता त्यांच्या साठी उपलब्ध झालाय 'नोटा' चा पर्याय. इलेक्ट्रॉनिक
मतदान यंत्रावर सर्व उमेदवार आणि त्यांच्या चिन्हांखाली 'यापैकी एकही नाही' असा पर्याय
असेल. 'वरीलपैकी एकही नाही' (None of the above) म्हणजेच 'नोटा' (NOTA) नकाराधिकार
वापरणारा मतदार या पर्यायासमोरील बटण दाबून आपला मतदानाचा हक्क बजावेल.
आपल्या राज्य घटनेने प्रत्येक
नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकांचे, लोकांनी निवडून दिलेले आणि लोकांसाठी
असलेले शासन म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत महत्वाचे असते. कारण या मताद्वारेच
आपण लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाची निवड करत असतो. आपल्या
पसंतीचा किंवा आपल्याला योग्य वाटणारा उमेदवार नसेल तर मतदाराला मतदान करावेसे वाटत
नाही. परंतु आता असे वाटत असेल तरीसुद्धा त्याला मतदान करता येऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाच्या
27 सप्टेंबर, 2013 च्या आदेशान्वये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिकांना
नकाराधिकाराचा 'नोटा' हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने
नकारात्मक मतदान करण्याचा नागरिकांचा अधिकार मान्य करून मतदान प्रक्रियेत सर्वच उमेदवारांना
नकार देण्याचा पर्याय समाविष्ट करण्याचा आदेश दिला. जनप्रतिनिधीत्व कायद्यात अशी तरतूद
आहे. परंतु त्यासाठी मतदाराला अर्ज करावा लागतो. आता या निर्णयामुळे अर्ज करण्याची
गरज भासणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी 'नोटा' हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर तशी सुधारणा करण्यात आली आहे.
1 डिसेंबर, 2013 पासून झालेल्या
राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या, नगर परिषदा/ नगर पंचायती आणि
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र
हे देशातील पहिले राज्य आहे.
अलिकडेच झालेल्या
5 राज्यांच्या विधानसभा तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा/ पंचायत
समित्या, नगर परिषदा/ नगर पंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नकारात्मक मतदानाचा
अधिकार (नोटा) वापरण्यात आला.
निकाल जाहीर करताना
'नोटा' च्या पर्यायासमोर नोंदविलेल्या मतांची संख्या विचारात न घेता ज्या उमेदवाराला
सर्वाधिक मते मिळाली असतील त्याला विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजेच
'नोटा' या पर्यायासमोर नोंदविलेल्या मतांची संख्या सर्वाधिक मते मिळविलेल्या उमेदवारास
मिळालेल्या मतांच्या संख्येपेक्षा जास्त असली तरी त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यासप्रतिबंध
राहणार नाही.
कोणताही उमेदवार योग्य नाही? सारेच सारखे , एकाच माळेचे
मणी असे म्हणत मतदानाच्या दिवशी घरी बसून राहण्यापेक्षा ‘नोटा’चा वापर करा, पण मतदानाचा
हक्क बजावा. कारण लोकशाहीच्या संवर्धनासाठी मताधिकाराचा वापर हा सर्वात महत्त्वाचा
आहे.
- जिल्हा
माहिती कार्यालय,जळगाव
No comments:
Post a Comment