प्रत्येकाने आपलं गाव निर्मल करण्याचा संकल्प
करु या
पालकमंत्री संजय सावकारे यांचे आवाहन
जळगाव, दि. 28 :- आरोग्याची सुरुवात पाणी आणि स्वच्छतेपासून होते.
स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तीक गरज आहे. जळगाव जिल्हा निर्मल करण्याचे आव्हान
आपणा सर्वांसाठीच आहे, प्रत्येक गाव हगणदरी मुक्त करुन आपलं गाव निर्मल करण्याचा
संकल्प प्रत्येकाने करु या,असे आवाहन राज्याचे कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, भटक्या / विमुक्त
जमाती व इतर मागासवर्गींयांचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री
संजय सावकारे यांनी आज केले. निर्मल अभियान कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत
होते.
जळगाव जिल्ह्यातील निर्मल भारत अभियानाअंतर्गत उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व
ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचा-यांसाठी या
कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बॅंकेच्या सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे हे होते. तर
मार्गदर्शनासाठी आदर्शगाव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पोपटराव पवार, कोल्हापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष भारत पाटील
यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव सुनिल चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष
मच्छिंद्र पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, कृषी सभापती कांता
मराठे, महिला व बालविकास विभागाच्या सभापती लीलाताई सोनवणे. उपमुख्यकार्यकारी
अधिकारी गायकवाड, उप मुख्य कार्यकारी
अधिकारी राजन पाटीलआदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भारत पाटील यांनी कोल्हापूर
जिल्हा हगणदरीमुक्त करतांना त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले. स्वच्छतेचा हा
संदेश पोहोचविण्यासाठी जत्रा, सणवारांचे निमित्त साधा. हे अभियान केवळ स्वच्छतेशी
संबंधित नसून आपल्या घरातील महिलांच्या प्रतिष्ठेसाठीही आहे आणि त्यासाठी
लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे उधबोधन त्यांनी याप्रसंगी केले. तर पोपटराव पवार यांनी या कार्यासाठी
प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी
समन्वयाने काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात श्रीमती
उगले यांनी स्वच्छतेच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचे आकडेवारीनिहाय
सादरीकरण केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
* * * * * *
No comments:
Post a Comment