महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी शासन बांधील
- पालकमंत्री संजय सावकारे
जळगाव, दि. 25 :- देशात महिलांची संख्या निम्मी आहे. त्यामुळे
त्यांना समान अधिकारही मिळाले पाहिजेत. महिलांना त्यांचे हक्क मिळ्वून देण्यासाठी
शासन बांधील आहे. त्यांना उद्योग व्यवसायात समान संधी देणे यासाठीही शासन
प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,
रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, भटक्या / विमुक्त जमाती
व इतर मागास वर्गींयांचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय
सावकारे यांनी आज केले. ते भुसावळ येथे महिला उद्योजकांच्या मेळाव्यात बोलत होते.
भुसावळ येथे ब्राह्मण संघात महिला उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन
पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना श्री. सावकारे
म्हणाले की, महिलांचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. आपल्या कुटुंबाला हातभार
लागावा म्हणून आज अनेक महिला नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपले कर्तृत्व सिद्ध
करीत आहेत. ज्या ज्या क्षेत्रात महिलांना संधी मिळाली आहे त्या - त्या क्षेत्रात
महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातही अनेक महिलांनी आपले व्यवसाय कौशल्य सिद्ध केले
आहे. व्यापार व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर गुणवत्तेत तडजोड करु नका असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रजनी सावकारे म्हणाल्या की, महिलांच्या
कलागुणांना वाव मिळावा म्हणून हे व्यासपीठ आहे. सा-यांनीच नौकरीच्या मागे धावण्यापेक्षा
व्यवसाय करावा. एक स्वयंरोजगार करणारी व्यक्ती ही इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन
देत असते. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगाराची संधी
उपलब्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या उदघाटनप्रसंगी भुसावळ पं.स.
सभापती मंगला झोपे, आरोग्य सभापती शारदा झोपे, ब्राह्मण संघाच्या उपाध्यक्षा रुपा
कुलकर्णी, मेळाव्याच्या आयोजक रजनी
सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते. रविवार दि. 27 पर्यंत हा मेळावा सुरु राहणार
असून महिला उद्योजकांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले
आहे व त्याची विक्रीही सुरु आहे.
*
* * * * * * *
उपवर मुलींच्या लग्नासाठी ठेवीची रक्कम थेट बॅंक खात्यात
जमा
करण्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांचे आदेश
जळगाव, दि. 25 :- उपवर मुलींच्या लग्नासाठी संतोषीमाता मर्चंट सह. पत संस्थेतील ठेवण्यात
आलेल्या ठेवींचा ठेवीदारांना परतावा करतांना आरटीजीएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या
बॅंक खात्यात रक्कम जमा करावी,असे आदेश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, भटक्या / विमुक्त
जमाती व इतर मागास वर्गींयांचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे
पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज दिले. त्यासाठी सर्व ठेवीदारांनी आपले बॅंक खाते
राष्ट्रीयकृत बॅंकेत सुरु करावे, असे आवाहनही श्री. सावकारे यांनी ठेवीदारांना
दिले.
उपवर मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सावकारे यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, जिल्हा
विशेष लेखा परिक्षक धीरज चौधरी, तालुका उपनिबंधक डॉ. गार्डी तसेच ठेवीदारांचे
प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सहकार विभागाच्या वतीने माहिती सादर करण्यात
आली संतोषी माता मर्चंट सह. पत संस्थेत
उपवर मुलींच्या विवाहासाठी 146 ठेवीदारांच्या ठेवी होत्या. त्यापैकी 34 ठेवी आढळून
आल्या नाहीत. उर्वरित 112 पैकी 6 ठेवीदारांच्या ठेवी पूर्ण परत करण्यात आल्या
होत्या. तर सहा जणांची नावे दोनदा आढळली होती. उर्वरित 100 ठेवीदारांपैकी
ज्यांच्या ठेवींची रक्कम 1 लाखांपर्यंत होती त्या 69 जणांना 100 टक्के रक्कम
म्हणजे एकूण 30 लाख 86 हजार इतकी रक्कम
देण्यास मंजूरी देण्यात आली होती. तर उर्वरित 30 जणांना ज्यांच्या
ठेवींच्या रकमा 1 लाखापेक्षा अधिक होत्या त्यांना 75 टक्के रक्कम परत करावी, असे
सुचविण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. सावकारे यांनी या ठेवीदारांनाही पूर्ण
100 टक्के रकमेचा परतावा करण्यात यावा, असे
आदेश दिले. तसेच या रकमांचा परतावा देतांना रक्कम ठेवीदाराच्या थेट खात्यात
आरटीजीएस प्रणालीद्वारे जमा करावी अशी सुचनाही केली. या निर्णयामुळे आता 91 लाख 87
हजार 846 रुपये रकमेचा परतावा ठेवीदारांना करण्यात येणार आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment