युवकांनी मतदार नोंदणीत सहभाग वाढवावा : प्रांताधिकारी मनोज घोडे
चाळीसगाव दिनांक 14 :- भारत आयोगाच्या सुचनेनुसार आगामी सार्वत्रिक निवडणूक-2014
च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करणे व त्यांचा निवडणुकीमध्ये सहभाग वाढविण्याच्या
उद्देशाने मतदार शिक्षण व सहभागाचा पध्दतशीर कार्यक्रम उप विभागीय अधिकारी, तहसिलदार
तसेच आर्ट ऑफ लिव्हींगच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने
वयाची 18 वर्षे पूर्ण होणा-या युवक, युवतींनी आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा म्हणून
नव मतदार नोंदणी अभियानात सहभाग वाढवून मतदानाचा हक्क प्राप्त करुन घ्यावा असे आवाहन
प्रांताधिकारी मनोज घोडे यांनी आज चाळीसगाव येथे य.ना.चव्हाण महाविद्यालयात आयोजित
कार्यक्रमात केले.
यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे, आर्ट ऑफ लिव्हींगच्या
श्रीमती शर्मा, राहूल वाकलकर, प्राचार्य जाधवसर, नायब तहसिलदार आगळे, नायब तहसिलदार
सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत राज्यातील युवकांचा निवडणूक
प्रक्रीयेत सहभाग वाढविण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे कुलसचिव यांची
कॅम्पस ऍ़म्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिनांक
31.07.2013 च्या शासन निर्णयानुसार प्रबंधकांनी त्यांच्या विद्यापीठाअंतर्गत येणा-या
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची छायाचित्रासह मतदार यादी मध्ये नांव नोंदणी मोठया
प्रमाणात होईल या साठी प्रयत्न करण्याच्या सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.
मतदार
नोंदणीस 25 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी अभियानाची
मुदत ही दिनांक 17 ऑक्टोंबर, 2013 पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र सदर मतदार नोंदणी
अभियानास दिनांक 25 ऑक्टोंबर, 2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने युवकांनी आपला मतदानाचा
हक्क प्राप्त करण्यासाठी संबंधित महाविद्यालयात नियुक्त केलेल्या बी.एल.ओ. कडून तसेच
आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्यकर्त्यांकडून फॉर्म
प्राप्त करुन विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे
यांनी केले आहे. नव मतदार नोंदणी संबंधी काही अडचणी, शंका असल्यास संबंधित बी.एल.ओ.
तसेच तहसिल कार्यालयातील निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा ,असे कळविले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment