जळगांव, दि. 14 :- ग्रामपंचायत कार्यालयात
दैनंदिन कामकाजासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने कामात गतीमानता आलेली
आहे. परंतू ग्रामस्थांनी गावाच्या
सर्वांगीण विकासाकरिता परस्परांत समन्वय ठेवून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे
प्रतिपदान पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
जळगांव खुर्द येथे आज सकाळी आयोजित
ग्रामपंचायत कार्यालय व संगणक कक्षाच्या लोकार्पण सोहळयात ना. देवकर बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती दिलीप पाटील, उपसभापती विजय नारखेडे, माजी सभापती
गोपाल पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मीक पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ.
लिना पंकज महाजन, विलास बळीराम पाटील, सरपंच सौ. उषा विलास पाटील, उपसरपंच सौ. शांताबाई
गंगाराम पाटील, गट विकास अधिकारी सुनिल दुसाने आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ना. देवकर म्हणाले, जळगावं खुर्द चे
ग्रामपंचायत कार्यालय हे नवीन इमारत व संगणकीकरणामुळे आधुनिक झालेले आहे. त्यामुळे
ग्रामस्थांनी गावातील समस्या व प्रश्न यांचा विचार करुन योजना राबविणे आवश्यक आहे.
त्याकरिता गावामधील राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी समन्वयातून गाव विकासाचे निर्णय
घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी व्हावी म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पदाधिका-यांनी चर्चा करुन
निर्णय घ्यावेत अशी सूचना ना. देवकर यांनी केली. तसेच महिला पदाधिकारी गावाचा
कारभार काटकसरीने नियोजनबध्द पध्दतीने करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
यावेळी सौ. लिना महाजन, गोपाल पाटील, विलास
पाटील, उपसरपंच सौ. शांताबाई चौधरी आदिची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विलास पाटील यांनी केले. यात त्यांनी
जळगांव खुर्द मधील रस्ता दुरुस्ती, नवीन रस्ता मागणी, गटारी योजना आदि
विकास कामांची मागणी केली.
प्रारंभी
ना. देवकर यांचे हस्ते सरस्वती पूजन, डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती निमित्त्
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते जळगांव
खुर्द गावं शंभर टक्के विमा ग्राम योजनेत सहभागी करुन घेतल्याबद्दल विमा
कंपनीच्या अधिका-यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विमा कंपनीने गावाने विमा
ग्राम योजनेत सहभागी झाल्याबद्दल ग्राम विकासासाठी ग्रामपंचायत कार्यलयास 25
हजाराचा धनादेश भेट म्हणून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक
शांताराम पाटील यांनी केले तर आभार सुभाष पाटील यांनी मानले.
हायटेक ग्रामपंचायत
सन 2010 -11 मध्ये स्थानिक आमदार निधीतून जळगाव
खुर्द ग्रामपंचायत कार्यालयासाठी 12.71 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता.
त्या अंतर्गत नवीन इमारत, सुसज्ज सभागृह, अत्याधुनिक संगणक कक्ष, सरपंच व उपसरपंच यांचे दालन, तलाठी कार्यालय आदि कामे
करण्यात आलेली आहेत. सदर कार्यालयातून ग्रामस्थांना संगणकावरुन प्रमाणपत्रे
देण्यात येतात. येथील दैनंदिन कामकाज पूर्णपणे संगणकावर चालत असल्याने सदर
ग्रामपंचायत ही हायटेक ग्रामपंचायत बनली
आहे.
No comments:
Post a Comment