जळगांव, दि. 20 :- जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ते 25 फेब्रुवारी 2013 या कालावधीत सागर पार्क येथे मुक्ताई सरस व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या महोत्सवांतून जळगांवकरांना महिला बचत गटांची विविध उत्पादने, खादय संस्कृति स्टॉल तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत महिला स्वयं सहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रम मुक्ताई सरस 2012 -13 होणार आहे. सदर कार्यक्रमात जळगांव जिल्हयातील तसेच इतर जिल्हयातून सुमारे 200 बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे स्टॉल येणार आहेत. यापैकी 40 स्टॉल हे खान्देशी खादय संस्कृतिबाबत असल्याची माहिती श्रीमती उगले यांनी दिली. मुक्ताई सरस प्रदर्शनातून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्कांची बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
खान्देश सांस्कृतिक महोत्सवात दिनांक 21 ते 25 फेब्रुवारी 2013 सायंकाळी 6 ते रात्री 9-30 वाजे पर्यत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये पोवाडा, बंजारा नृत्य, कथ्यक, लोकगीत, समूह नृत्य, लोकनाटय, लावणी, भावगीत, मिमिक्री विडंबन नाटय, भारुड, नाटक नृत्य नाटिका आदि कार्यकम आहेत.
मुक्ताई सरसचे उदघान दिनांक 22 फेब्रुवारी 2013 रोजी सायंकाळी 5 वाजता ना. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते तर पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सदरचे प्रदर्शन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. तरी जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदरच्या महोत्सवास भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी केले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment