जळगांव, दि. 2 :- शासनाकडून शिवाजीनगर व
पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झालेला असून जळगांव
महानगरपालिकेने चालू एसडीआर प्रमाणे सदरच्या पुलाच्या तांत्रीक मंजुरीची रक्कम
त्वरित भरण्याची सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केली.
आज दुपारी 4 वाजता पदमालय शासकीय
विश्रामगृह येथे उड्डाण पुलाच्या कामाबाबत आयोजित बैठकीत ना. देवकर बोलत होते. यावेळी
जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय
अभियंता डी.आर.टेंभुर्णे, महानगरपालिकेचे अभियंता श्री खडके, श्री. भोळे, श्री योगेश बोरोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, भू-संपादन अधिकारी श्रीमती दीपमाला चौरे आदि
उपस्थित होते.
ना. देवकर पुढे म्हणाले शहरात वाहतुकीची
कोंडी मोठया प्रमाणात होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिंप्राळा व शिवाजीनगर
उड्डाण पुलाकरिता निधी मंजुरीचे व समांतर रस्त्याबाबतची रेल्वे बोर्डचे सुमारे 3
कोटीचे रक्कम महापालिकेने लवकर भरणे आवश्यक आहे. सदरची रक्कम त्वरित भरली गेल्यास
उड्डाण पुलाचे काम पुढील दोन – तीन महिन्यात पूर्ण होऊन वाहतुक सुरळीत होईल असे
त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तथा मनपा
आयुक्त श्री. राजूरकर यांनी पुढील दोन
महिन्यात तांत्रिक मंजुरीचे सुमारे 25 लाख रु. व रेल्वे बोर्डाचे 2.99 कोटी रु.
भरण्यात येतील असे सांगितले. त्याकरिता महापालिका निधीची बचत करुन सदरची रक्कम अदा
करेल असे त्यांनी सांगितले.
पिंप्राळा व शिवाजीनगर उड्डाण पुलाचे
रेल्वे जागेत करण्यात येणा-या कामाचे डिझाईन तयार करुन त्याचे अंदाजपत्रक सादर
करण्यात येईल. तसेच महापालिकेने समांतर रस्त्याकरिता 2.99 कोटी अनामत रक्कम जमा
केल्यास सदरच्या कामास परवानगी दिली जाईल, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय
अभियंता डी.आर. टेंभुर्णे यांनी दिली.
यावेळी ना.देवकर यांनी पिंप्राळा,
शिवाजीनगर, म्हसावद रेल्वे उड्डाण पुलाबाबतच्या कामाचा व समांतर रस्ते , बोगदे
आदिचा आढावा घेतला. तसेच म्हसावद उड्डाण पुलाकरिता भू- संपादन बाबत सर्व
शेतक-यांना नियमाप्रमाणे जमिनीचे पैसे मिळाले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment