Wednesday, 13 February 2013

जलसंधारणाच्या कामांचा निधी योग्य पध्दतीने खर्च करावा - जिल्हाधिकारी

        जळगांव, दि. 13 :- महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान सन 2012-2013 अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी संबंधीत यंत्रणांना वाटप करण्यात आलेला निधी योग्य पध्दतीने व मंजूर केलेल्या कामांवरच खर्च करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
          महात्मा फुले जल व भूमी  संधारण अभियान अंतर्गत जिल्हा अभियान समितीच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, वरिष्ठ भू -वैज्ञानिक ए. आर. वाघमारे, जळगांव उपवनसंरक्षक सुरेंद्र चोपडे, यावल उप वनसंरक्षक श्री. राहुरकर, एनजीओचे प्रतिनिधी डॉ. रंजना बोरसे, डॉ. हेमंत पाटील आदि उपस्थित होते.
          सदरच्या निधीचा वापर कोल्हापूर बंधा-याची दुरुस्ती करणे, गेट टाकणे, पाझर तलावाची दुरुस्ती करणे आदि कामासाठी वापरण्यात यावा. तसेच सदरची कामे करत असतांना संबंधीत गावांमधील लोकांचा सहभाग घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली. तर तलावातील काढलेला गाळ शेतक-यांच्या शेतावर पोहोचला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
           या अभियानातंर्गत यापूर्वी जळगांव जिल्हाला 7 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून त्याअंतर्गत कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,  दुरुस्ती व गेट बसविणे आदिची 3 कोटी 24 लाख 13 हजार 807 रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी दिली. तसेच सदयस्थितीत जिल्हयातील  जळगांव, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगांव, चाळीसगांव व जामनेर तालुक्यांतील जलसंधारणाच्या कामांसाठी 2 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची त्यांनी सांगितले.
           यावेळी अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधी जलसंधारणाच्या कामांबाबत सूचना मांडल्या. यामध्ये सिमेंट बंधा-याची कामे, तलावातील गाळ काढण्यासाठी तसेच खोलीकरणासाठी पोकलेनच्या  वापरास परवानगी आदिचा समावेश आहे. जिल्हयातील जलसंधारणात काम करणा-या एनजीओंनी सदरची कामे करत असतांना लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले

No comments:

Post a Comment