Wednesday, 25 July 2012

सर्व जिल्ह्यात ई-टेंडरींग पद्धतीने वाळूचे लिलाव होणार - बाळासाहेब थोरात


मुंबई, दि. 25 : सध्या यवतमाळ, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या आठ जिल्ह्यात ई-टेंडरींग पद्धतीने वाळूचे लिलाव होत आहेत. यामध्ये अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्यातील सर्व‍ जिल्ह्यांमध्ये वाळूचे लिलाव ई-टेंडरींग पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देतांना दिली.
            शासनाला सन 2011-12 मध्ये वाळू लिलावाद्वारे रुपये 1 हजार 244 कोटी तर सन 2012-13 च्या जून अखेर 226 कोटीचा महसूल मिळाला आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसिलदार, पोलीस, परिवहन विभागातील अधिकारी यांची पथके तयार करण्यात आली आहे. सन 2011-12 मध्ये अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात 551 गुन्हे दाखल करण्यात आले असून 696 आरोपिंना अटक करण्यात आली आहे. यामुळे 50 कोटी रुपये दंडात्मक  रुपाने शासनास उत्पन्न मिळाले असल्याची माहिती श्री.थोरात यांनी दिली. खनिज विकास निधी गावा गावापर्यंत पोहचविण्याचा शासनाचा प्रयत्न असून हा निधी गावातील रस्त्यांच्या बळकटी करणासाठी वापरण्यात येणार असल्याचे श्री.थोरात यांनी यावेळी सांगितले.
            सध्या 24 जिल्हे चौपदरीकरणाने जोडण्यात आले असून राज्यातील सर्व जिल्हे चौपदरीकरणाने जोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. राज्यातील रस्त्यांच्या विकासामुळे औद्योगिक कृषी विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पथकर नाक्यांवरील कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक पथकर नाक्यावर संगणकीकृत पावती देण्याचे सुरु करण्यात आले आहे. तसेच पथकर नाक्यांवर ईलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात येणार आहेत. या फलकांवर पथकर वसुलीचा कालावधी, नुतनीकरणाचा दिनांक, कर्ज देणाऱ्या बँकेची माहिती इत्यादी दर्शविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे ईलेक्ट्रॉनिक फलक जालना-अहमदनगर मार्गा दरम्यानच्या पथकर नाक्यांवर लावण्यात आले आहे.
            मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता या मार्गाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी कन्सल्टंशी संदर्भातील निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. राज्यात 178 पथकर नाके कार्यरत असून त्यापैकी 32 राष्ट्रीय महामार्गाचे, 81 सार्वजनिक बांधकाम विभागाचे व 65 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहेत. यापैकी 22 पथकर नाके बंद करण्यात आले असल्याची माहिती श्री.क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
            सदरचा अतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावावरील चर्चेत सदस्य सर्वश्री विरेंद्र जगताप, एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे, बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, धैर्यशील पाटील, सुधीर मुनगंटीवार, सरदार तारासिंग, आशिष जयस्वाल, वैजनाथ शिंदे, अबू आजमी, नाना पटोले आदींनी भाग घेतला.
0 0 0 0

No comments:

Post a Comment