Thursday, 3 July 2025

जामनेर मध्ये ‘बहिणाबाई मॉल’चे भूमीपूजन — बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ



जळगाव, दि. 0३ जुलै २०२५ (जिमाका वृत्तसेवा) :

जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहिणाबाई मॉल' या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
या ‘बहिणाबाई मॉल’चे भूमिपूजन दिनांक ३ जुलै २०२५ रोजी गुरुवार, जामनेर तालुक्यातील वाकी रोड परिसरात माजी नगराध्यक्ष सौ. साधना महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करनवाल (भा.प्र.से.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. आर. एस. लोखंडे, श्री. चंद्रकांत बाविस्कर, श्री. जे. के. चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गट अत्यंत गुणवत्तापूर्ण वस्तूंचे उत्पादन करीत असून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार असून, महिला सक्षमीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.”
‘बहिणाबाई मॉल’ हे केवळ विक्री केंद्र नसून, ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे व्यासपीठ ठरणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांची आर्थिक प्रगती सुनिश्चित होणार आहे.

No comments:

Post a Comment