Tuesday, 31 December 2024

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा : मुख्य सचिव सुजाता सौनिक

        

        मुंबईदिनांक १ : नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्थानियोजित साधूग्रामनागरिकांची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजित आराखडा सादर करावाअशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

          सन २०२७-२८ या वर्षात  नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजनासंदर्भात मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तापरिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठीनगरविकास विभाग- १ चे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तानगरविकास विभाग- २ चे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोंविदराजपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेनाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडामपर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मानाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्रीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

            मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या कीसिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सोयीसुविधांची कामेसाधूग्राममध्ये साधू-महंताची निवासव्यवस्थावाहनतळ उभारणेनागरिकांची सुरक्षाकायदा व सुव्यवस्थापरिसर सुशोभीकरणगोदावरी नदी आणि उपनद्या संवर्धनशुद्धीकरण व सुशोभीकरणग्रीन झोनगर्दीचे सनियंत्रणआरोग्य तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर अनुषंगिक कामे याबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर बैठका घेऊन कामे अंतिम करून त्याचा आराखडा राज्यस्तरावर सादर करावा.

         सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरील कामांचा आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीत बैठका आयोजित केल्या जाव्यातसर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करावेया कामांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करावीजेणेकरून नियोजित कामांमध्ये आवश्यक तिथे सुधारणा करण्यासाठी मदत होईलअशा सूचनाही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाममहापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव, दिनांक 1 जानेवारी (जिमाका वृत्त ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी दिली आहे.
या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मातोश्री ग्रामसमृधी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारींच्या सुचना

जळगाव, दिनांक 1 जानेवारी (जिमाका वृत्त ) : गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

        जळगाव जिल्हयातील अनेक शेतकरी शेतात जाण्याकरीता तसेच शेतमाल शेतातून बाहेर काढण्याकरीता वारंवार रस्त्यांची मागणी करीत असतात. यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक असल्याने रस्ते कालबध्द रितीने खुले करणे व मातोश्री ग्रामसमृधी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे या करीता कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात 10 टप्प्यात 1 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान गट विकास अधिकारी, उपअधिक्षक, भूमी अभिलेख व तहसिलदार यांच्या सहाय्याने रस्ता खुला करणे व जे रस्ते खुले करण्यात येतील असे रस्ते मातोश्री ग्रामसमृधी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत घेऊन कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यान्वयन संबंधीत तालुक्याचे गटविकास अधिकारी हे करणार आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरिक्षक यांच्या सहकार्यने ग्रामीण भागातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग कालबध्द रितीने खुले करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबधित अधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

पाळधी गावात 1 व 2 जानेवारी दरम्यान कलम 163 लागू! उपविभागीय दंडाधिकारींनी दिले आदेश


जळगाव, दिनांक 1 जानेवारी (जिमाका वृत्त ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे 31 डिसेंबर रोजी रात्री 10.00 वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. या वादातून पाळधी गावात काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना घडल्या. मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून परिस्थिती नियंत्रणात आणलीकाही काळानंतर पुन्हा काही भागांमध्ये जाळपोळ करण्यात आल्याने पाळधी व लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत राहावी याकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चे आदेश लागू करण्यात आला आहे.
एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन पाळधी या संपूर्ण गावाचे हद्दीत दिनांक 01/01/2025 रोजी सकाळी 03.30 वाजेपासून ते दिनांक 02/01/2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपावेतो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चे आदेश लागू करीत असल्याचा आदेश दिला आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती / संस्था / संघटना यांच्या विरुध्द प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे सदरचा आदेश अत्यावश्यक सेवा उदा. रूग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असे निवृत्ती गायकवाड यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ६ व ७ जानेवारी रोजी करिअर मेळाव्याचे आयोजन


जळगाव, दिनांक 31 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षणधिकारी कार्यालय, जि.प. जळगाव व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ६ व ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या करिअर मेळाव्यात पहिल्या दिवशी तज्ञांमार्फत विद्यार्थी व पालकांना करिअर समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्यात ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी निवडी, क्षमता, व्यक्तीमत्व, याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. तर दुस-या दिवशी जिल्हयातील नियाक्तांमार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या करिअर मेळाव्याचे आयोजन जळगाव येथील अॅड. बबन बाहेती, ज्यू. कॉलेज, रोझलँड इंग्लिश स्कूल शेजारी, ख्वॉजामिया दर्गा चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. या मेळाव्याअंतर्गत उद्योजक त्यांच्या कडील रिक्त पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण होणारे व १८ वर्ष वय पूर्ण होणा-या विद्यार्थ्यांस नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे इच्छूक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असून इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी या करिअर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी; गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 31 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : जळगाव येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. रोहन पाटील यांनी ०४ चार किलो गर्भपिशवी गाठीची अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडली.

तसेच आज ३० डिसेंबर रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. मिलींद चौधरी जळगाव यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (LAVH) दोन महिला रुग्णांवर यशस्वीपणे पार पाडली.
या दोन्हीं वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला यांनी रुग्णांना योग्य भूल देऊन अति जोखमीची अशी शस्त्रक्रिया पार पाडली व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. नम्रता आच्छा, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली बावस्कर तसेच सहाय्यक अधिसेविका श्रीमती. संगीता शिंगारे, परिसेविका श्रीमती. रूपाली जोशी व अधिपरिचारीका श्रीमती. वैशाली भालेराव, श्रीमती. दिपाली बढे, ऋतुजा काळे, श्रीमती. नम्रता नागपुरकर, श्रीमती. तुळसा माळी व कक्षसेवक श्री. विशाल परदेशी, एजाज तडवी यांनी तसेच शस्त्रक्रिया विभागातील इतर सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
    जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी) जळगाव येथे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.

जळगाव जिल्हयातील अवैध वाळु उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक संपन्न


जळगाव, दिनांक 30 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले व अवैध वाळु वाहतुकीदरम्यान होणा-या अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामदक्षता समितीच्या सदस्यांची बैठक 30 डिसेंबर रोजी जळगाव येथील जिल्हा नियोजन समिती येथे संपन्न झाली. यात ग्राम दक्षता समितीने अवैध उत्खनन रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले असून प्रशासनाकडून ग्राम दक्षता समितीस पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे उपस्थित होते.
जळगाव जिल्हयात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकामी स्थापन करण्यात आलेल्या महसुल विभागातील पथकातील अधिकारी / कर्मचारी यांच्यावर मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहेत. तसेच अवैध बाळु उत्खनन व वाहतुकीदरम्यान महामार्ग व इतर रस्त्यावर अवैध वाळूचे डंपर, ट्रॅक्टर यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावरील उपयोजनाकरिता या बैठकित चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्राम दक्षता समितीने गौणखनिज रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनीही पोलिसांना याबाबत कारवाई करण्याबाबत तसेच ग्रामदक्षता समितीला मदत करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
जळगाव जिल्हयातील जळगाव, एरंडोल, धरणगाव, मुक्ताईनगर, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळिसगाव या तालुक्यातील गावांच्या तलाठी व पोलिस पाटील, तहसिलदार, ग्रामसेवक व सरपंच तसेच संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव, पोलिस निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी सर्व गावातील सरपंच यांना सुचना देण्यात आल्या. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी 5 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

 

जळगाव, दिनांक 30 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” सन 2024-25 सर्व स्तरांवर राबविण्यात येत आहेत. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करणे तसेच अभियान व स्पर्धेशी संबंधित सर्व बाबीवर कार्यवाही करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या संकेतस्थळाची लिंक "pragatiabhiyan.maharashtra.gov.in" ही आहे. या पोर्टलवर सर्व स्तरावरील स्पर्धेचे प्रस्ताव सादर करणे, प्रस्तावांची छाननी तसेच स्पर्धेशी संबंधित कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.
तसेच या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पेर्धेसाठी सर्व स्तरावर प्रस्ताव स्विकारण्याची मुदत दि. 16 ते 31 ऑक्टोबर 2024 अशी होती. मात्र आता स्पेर्धेसाठी ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी दि. 05 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 5 जानेवारी पर्यंत "राजीव गांधी प्रशासकीय गतिमान (प्रगती) अभियान व स्पर्धा" या योजनेत सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Thursday, 26 December 2024

महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

     

           जळगाव, दिनांक 26 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

          गुरुवार, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुंबई विमानतळ येथुन विशेष विमानाने जळगावकडे प्रस्थान. सायंकाळी 7.20 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. स्वागत समारंभ कार्यक्रम : खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ रा.जळगाव यांची कन्या चि.सौ.कां.ईशानी, स्थळ : बिग बाजार, खान्देश मिल शॉपींग कॉम्लेक्स, रेल्वे स्टेशनजवळ, जळगाव. संपर्क : खासदार श्रीमती स्मिता वाघ 94222 79335. रात्री 8.15 वाजता जळगाव विमानतळ येथुन विशेष विमानाने मुंबईकडे प्रस्थान.

#जळगाव जिल्ह्यात #स्वामीत्व योजने अंतर्गत २७ डिसेंबर रोजी #सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करताना लाभाथ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्हयात स्वामित्व योजने अंतर्गत ६० गांवामध्ये सनद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (SVAMITVA) योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देतांना संबधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे, गावातील मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करणे, हे स्वामीत्व योजनेचे स्वरूप आहे.
जळगाव जिल्हयात स्वामीत्व योजने अंतर्गत चोपडा तालुक्यातील २ गावे, यावल तालुक्यातील ५ गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील ६ गावे, बोदवड तालुक्यातील १६ गावे, भुसावळ तालुक्यातील ३ गावे, जळगाव तालुक्यातील १ गावे, पाचोरा तालुक्यात २७ गावे, असे एकुण ६० गावांमध्ये सनद वाटप करण्यात येणार आहे. तरी गावातील जास्तीत जास्त नागरीकांना स्वामीत्व योजने अंतर्गतचे मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख एम. पी. मगर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केले आहे.

5 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या #MPSC परिक्षेचे आता 2 #फेब्रुवारी रोजी आयोजन


जळगाव, दिनांक 26 डिसेंबर ( जिमाका ) : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 05 जानेवारी, 2025 रोजी घेण्यात येणार होती. मात्र ही परिक्षा आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकानुसार दिनांक 02 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. 05 जानेवारी रोजी घेण्यात येणारी परिक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार जळगाव मुख्यालयात खालील सर्व परीक्षा उपकेंद्रावर दिनांक 02 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
मूळजी जेठा महाविदयालय, स्वामी विवेकानंद भवन, 1 ला व तळ मजला, जळगाव, केंद्र क्र. 1 8888085383/9021552949,
मुळजी जेठा महाविदयालय, स्वामी विवेकानंद भवन, 2 रा मजला, जळगाव, केंद्र क्र.2 8888085383/9021552949,
विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश मेडीयम स्कुल, ग. न. 176, वाघ नगर, जळगाव. 7350827370,
ओरीयन सीबीएससी इग्लिश मेडीयम स्कुल, एम.जे. कॉलेज कॅम्पस, प्रभात कॉलनी, जळगाव. 9834243675,
रावसाहेब रुपचंद माध्यमिक विद्यालय, जिल्हा पेठ, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जिल्हापेठ, जळगांव. 8830258244, 9423974751,
सेंट लॉरेन्स हायस्कुल, 515, ढाकेवाडी, पंचमुखी हनुमान मंदिर जवळ, लाठी शाळेच्या मागे, जळगाव 9970895317,
यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय, स्मशान भूमि जवळ, मेहरुण, जळगांव 9923289974,
काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, एस.टी. वर्कशॉप जवळ, विठ्ठल पेठ, जळगाव. 9823318080,
मिल्लत हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, रीलायन्स पेट्रोल पंप जवळ, NH-6, मेहरुण, जळगांव. 8793568631,
पी.एन. लुंकड कन्या शाळा, चैतन्य नगर, गणेश कॉलनी जवळ, जळगाव. 9158332396,
महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, प्रेम नगर, पिंप्राळा रोड, जळगाव. 9423487916,
ओ.टी. झांबरे माध्यमिक विदयालय, एम जे कॉलेज जवळ, जळगाव. 9890171542,
डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविदयालय, जिल्हा पेठ, जिल्हा रोड, जळगाव. 9850824370,
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीअम स्कुल, ख्वॉजामियाँ चौक, जळगांव. 0257-2252455/2251747/9840905610,
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनीअर सेकंडरी स्कुल, सुयोग कॉलनी, एम.जे. कॉलेज जवळ, जळगाव. 8983933848,
शासकीय अभियांत्रिकी महाविदयाल, नॅशनल हायवे नं.6, जळगाव. 8554887653,
एम.ऐ. आर. अँग्लो उर्दू हायस्कुल अॅड हाजी नूर मोहम्मद चाचा ज्यु. कॉलेज, प्रताप नगर, जळगाव. 7020399700,
जी एच रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, गट न 57/1, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव. 9657724181/9604010444,
विदया इग्लिश मेडीअम हायस्कुल, डि मार्ट जवळ, मेहरूण, जळगांव 0257-22633330/9561832453/8380877311,
रोझलँड इग्लिश मेडीयम स्कुल, 238, ख्वॉजामिया रोड, जळगाव. 8605049758/8554036455,
इकरा शाहीन उर्दू हायस्कुल, ममता हॉस्पिटल जवळ, मेहरूण, जळगाव. 8087513183/7276742180,
बहिणाबाई माध्यमिक विदयालय, गट नं. 104, भगवान नगर, जळगाव. 7588813316/9403942943,
सेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विदयालय, जिल्हा पेठ, स्टेट बँक मुख्य शाखे जवळ, जळगाव, 9860503324.
सदर परीक्षेकरीता जळगाव मुख्यालयातील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी तसेच सदरहू परीक्षा उपकेंद्रातील कर्मचारी यांनी परिक्षेसंदर्भात सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जळगावच्या तहसिलदार डॉ.ज्योती गुंजाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जळगाव जिल्ह्यात येत्या २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा यलो अलर्ट ! नागरिकांना सतर्कतेचा इशारा


जळगाव, दिनांक 26 डिसेंबर ( जिमाका ) : भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या ईशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात येत्या २७ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २७ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वादळीवारा आणि गारपीटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतीशिल उपाययोजना कराव्यात. हवामानाबाबत अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Wednesday, 25 December 2024

वीर बालदिवस निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


मुंबई, दिनांक २६ : वीर बालदिवस निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

'दिलखुलास', कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांची मुलाखत




मुंबई, दिनांक 25 डिसेंबर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'मौखिक आरोग्य आणि खबरदारी' या विषयावर ठाणे जिल्हा, शासकीय रूग्णालयाच्या, दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

जगभरात मौखिक आरोग्याच्या दृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध असून दातांची कीड, हिरड्याचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखूमुळे होणारे मुखाचे आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात याचा समावेश होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याअनुषंगाने मौखिक आजाराचे प्रकार आणि या आजारांबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत 'दिलखुलास' कार्यक्रमातून डॉ. अर्चना पवार यांनी माहिती दिली आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात डॉ. पवार यांची मुलाखत शुक्रवार दि. 27, शनिवार दि. 28, सोमवार दि.30 आणि मंगळवार दि.31 डिसेंबर 2024 तसेच बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, निवेदक सुचिता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

मुंबई, दिनांक 25 डिसेंबर : 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.
28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.
29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन



मुंबई, दिनांक 25 : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दिनांक २५) राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

 


नागपूर, २५ डिसेंबर : दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी, नागपूर येथील शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन




मुंबई, दिनांक 25 : देशाचे दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव सचिन कवडे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Tuesday, 24 December 2024

महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोल्यात संपन्न

  




        जळगाव, दिनांक  24 डिसेंबर (जिमाका ) : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालय, कृषी नगर, अकोला येथील डाँ. के. आर. ठाकरे सभागृहात शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली. सन २०२३-२४ या वर्षात महाबीजने एकूण ५,७६,२१९ क्विंटल बियाणे खरीप/रब्बी व उन्हाळी हंगामात विक्री केलेले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाबीजची एकूण आर्थिक उलाढाल ५३७५६.७४ लक्ष रुपये आहे.

             वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला महाबीज भवन येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषि राज्यमंत्री महाबीजचे प्रथम अध्यक्ष स्व. नानासाहेब सपकाळ यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महाबीज भागधारकांचे संचालक वल्लभराव देशमुख, डाँ रणजीत सपकाळ व महाबीज विभागप्रमुख उपस्थित होते.

             सभास्थळी महाबीजच्या वतिने भागधारकांना महाबीज कृषी उत्पादनांची माहिती होण्याकरिता विविध दालणे थाटण्यात आली होती. त्यामध्ये ऊती संवर्धित केळी, संकरित पपई, मका, चारा पिके खरिप/रब्बी हंगामातील पिक बाण, भाजीपाला बियाणे व प्रात्यक्षीक व माहिती सादर करण्यात आली.

             अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आयुक्त रावसाहेब भागडे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभराव देशमुख, डाँ रणजित सपकाळ, कृषी विद्यापिठाचे प्रतिनीधी विठ्ठल सरप पाटील महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी रामदास सिध्दभट्टी राष्ट्रीय बीज निगम चे हेमंत चिरमूरकर व महाबीजे विभाग प्रमुख उपस्थित होते.

          व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर आणि आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे यांनी बीजोत्पादक भागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर योग्य निर्णय घेतले. तसेच संचालक वल्लभराव देशमुख व संचालक डाँ रणजीत सपकाळ यांनी भागधारकांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन करुन बीजोत्पादक भागधारकांचे समाधान केले, संचालन जितेंद्र सरोदे यांनी केले तर आभार विवेक ठाकरे यांनी मानले.

उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तर्फे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ; पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ

       जळगाव, दिनांक 24 डिसेंबर ( जिमाका ) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महामंडळामार्फत उपकंपनी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ आणि उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय या दोन उपकंपन्या सुरू केल्या असून या अंतर्गत योजना राबविण्यात येत आहे आहे.

             जळगाव जिल्हा कार्यालय येथील उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तर्फे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे ज्याअंतर्गत बँकेमार्फत लाभार्थ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज वितरित केले जाणार आहे. यासोबतच गटकर्ज व्याज परतावा योजना देखील राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांना 50 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे. या दोन्ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात असुन अर्जदारांनी vjnt.in या वेब प्रणालीवर अर्ज करणे अनिवार्य आहे.

             यासोबतच उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळातर्फे २५% बीज भांडवल कर्ज योजना आणि १ लाखांपर्यंत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. २५% बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत महामंडळाचा सहभाग २५% यात महामंडळ नियमावली राहील व राष्ट्रीय कृत बँक सहभाग ७५% यास बँकेची नियमावली राहील असे एकुण रुपये ५ लक्ष असुन योजनेचे २०२४-२०२५ या आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. रु १,००,०००/- थेट कर्ज योजना अंतर्गत महामंडळाचा सहभाग १००% राहणार आहे.

             थेटकर्ज योजनेसाठी गरजूंनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट दयावी व अर्जासाठी जातीचा दाखला व आधार कार्डची प्रत सोबत आणवी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या ०२५७-२९९३४०२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. इच्छुक विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच, विशेष मागास प्रर्वगातील नवउद्योजक तसेच बेरोजगार युवक युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवडे यांनी केले आहे.

जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत 'वन जीपी वन बीसी' प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन


      जळगाव, दिनांक 24 डिसेंबर (जिमाका) : जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत 'वन जीपी वन बीसी' प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १८ ते २३ डिसेंबर 2024 दरम्यानच्या या सहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षणात युवक-युवतींना बँकिंग प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी मदत होणार आहे. प्रशिक्षणानंतर दिनांक २४ डिसेंबर 2024 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) मार्फत अंतिम परीक्षा घेण्यात आली.

         परीक्षे दरम्यान RSETI संचालक सुमित कुमार झा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षक संजीवनी मोरे आणि दिग्विजय खंबायत, कार्यालयीन सहाय्यक सचिन मराठे, अश्विनी मराठे आणि कल्पेश धिवरे यांनीही कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

खाजगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासनाचे नाव, पाटी किंवा स्टीकर लावल्यास होणार कारवाई; सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारींची माहिती

 

       जळगाव, दिनांक 24 डिसेंबर (जिमाका):  महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन, नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

            जर अशा प्रकारची वाहने ज्यावर महाराष्ट्र शासन नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून वाहने रस्त्यावर फिरतांना आढळून आली तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

            खाजगी वाहनांवर किंवा वाहनांत महाराष्ट्र शासन अशा पाटी किंवा बोध चिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियन व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

एकलव्य गॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये सन २०२५-२६ प्रवेश पूर्व स्पर्धा परिक्षेत सहभागी होण्याचे विद्यार्थांना आवाहन

             जळगाव, दिनांक 24 डिसेंबर (जिमाका) :  आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील प्रवेशासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ६वी च्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याची स्पर्धा परिक्षा घेवुन गुणानुक्रमे ३० मुले व ३० मुली या प्रमाणे प्रत्येक एकलव्य स्कुल मध्ये प्रवेश देण्यासाठी तसेच इयत्ता ७वी ते ९वी च्या वर्गातीन अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दिनाक २३ फेब्रुवारी  २०२५ रोजी परिक्षा होणार आहेत. या परिक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना  दिनांक  १० जानेवारी २०२५ पर्यंत आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत.

              शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता.अमळनेर, जि.जळगाव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता.जामनेर, जि.जळगांव या दोन परिक्षा केंद्रावर स्पर्धा परिक्षा रविवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी इयत्ता ६ वीच्या सकाळी ११ ते ०१ यावेळेत आणि इयत्ता ७वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते ०२  या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

                जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षा मध्ये इयत्ता ५वी च्या वर्गात शिकत असून, परीक्षेला बसलेले आहेत व पूढील वर्षी इयत्ता ६वी मध्ये तसेच ७वी ते ९वी मध्ये प्रवेश घेणार आहेत अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत. अर्जाचा नमुना यावल प्रकल्प कार्यालय तसेच मुख्याध्यापक व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहे.

               या परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इयत्ता ५वी पास ते ९वी च्या विद्यार्थ्यां करीता पूर्णतः खुली आहे. या परिक्षेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. सहा लाखाच्या आत असावे, तसेच  पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे, अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे, अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित राहणार आहे, तरी जास्तीत-जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक प्रकल्प अधिकारी अरुण पवार  यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत.

Monday, 23 December 2024

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळातर्फे जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची माहिती


जळगाव, दिनांक 24 डिसेंबर ( जिमाका ) : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमात जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड झाली असल्याची घोषणा केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केली. जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने क्लस्टर विकास कार्यक्रम अंतर्गत ५५ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यातील प्रथम टप्यात संपूर्ण देशभरात १२ क्लस्टर पायलट प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.

ज्यात जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. जळगावची फलोत्पादन विकासातील क्षमता आणि श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या प्रयत्नांमुळे ही निवड शक्य झाली आहे.

क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब, पायाभूत सुविधा उभारणी जसे की पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज आणि शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे.

जळगाव येथील पायलट प्रकल्प इतर क्लस्टरसाठी एक आदर्श ठरेल आणि फलोत्पादन क्षेत्रातील शाश्वत उपायांचा आदर्श निर्माण करेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि भारताला फलोत्पादनाच्या जागतिक निर्यातीत अग्रणी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ व स्थानिक प्रशासन या प्रकल्पाच्या यशासाठी एकत्रित प्रयत्न करतील आणि जळगावला फलोत्पादन क्षेत्रातील प्रगतीचे एक उज्ज्वल उदाहरण बनवतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.