Wednesday, 11 September 2024

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 





राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी साधला
विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संघटनांशी संवाद

जळगाव, दिनांक 11 सप्टेंबर ( जिमाका ) : जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीबरोबर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी संवाद साधला. यात वकील, डॉक्टर, शिक्षण,सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते , सांस्कृतिक क्षेत्रात कामकरणारे कलावंत, खेळाडू, अशासकीय सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रसार माध्यम यांच्याबरोबर त्यांच्या विषयांशी निगडित विषयावर चर्चा केली. त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच स्थानिक विषयांबाबत त्यांनी प्रशासनास कार्यवाहीबाबत सूचना केल्या. जे विषय शासनस्तरावर आहेत त्यासंदर्भात पाठपुरावा करु असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

या चर्चा मध्ये प्रामुख्याने महिलांची सुरक्षा, मुलींना स्वसुरक्षा विषयक प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी मुद्दाम होऊन प्रयत्न करण्याची गरज राज्यपालांनी अधोरेखित केली. याबरोबरच जिल्ह्यातील औद्योगिक वाढीसाठी जे अडथळे येतात ते दूर करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करावेत. प्लास्टिक इंडस्ट्रीज समोरच्या समस्या ऐकून त्याचा पाठपुरावा करण्याबरोबर जिल्ह्यातील सर्व उद्योग आणि व्यावसायिकांनी सोलार एनर्जीचा वापर करून सोलार सारख्या महत्त्वाच्या विषयाला प्रोत्साहन देण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढावी म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करून बास्केटबॉल सारख्या साधने उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने प्रयत्न करावे असेहीं राज्यपालांनी सांगितले.

आदिवासींना वनपट्टे दिले आहेत, त्या वनपट्टेधारकांना सामान्य शेतकऱ्यांना जी लाभ दिले जातात ते लाभ मिळावेत राजभवनाकडून पाठपुरावा करण्यात येईल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जळगाव मध्ये एकलव्य स्कूलचा प्रस्ताव तयार करण्याचे सांगून आदिवासींच्या शाळांमध्ये अधिकाधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सीसीटीव्ही सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जिल्ह्यातील संस्कृती, त्या जिल्ह्यातील बलस्थाने, त्या जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्यपाल म्हणून सरकारला वेळोवेळी सल्ला देताना महाराष्ट्राच्या नसा समजून घेणे मला गरजेचे वाटतं म्हणून राज्याचा दौरा करत असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
0000000

No comments:

Post a Comment