Friday, 16 August 2024

मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना

 

मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जिल्ह्यातील अनेक बहिणीच्या खात्यात जमा, बहिणींनीकडून आनंद व्यक्त

जळगाव, दिनांक 16 ऑगस्ट ( जिमाका वृत्त ) : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3 हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यावर यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी सागर पार्कवर झालेल्या महिलांच्या मेळाव्यात राखी पौर्णिमेची ओवाळणी लवकरच मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तारखेच्या दोन दिवस आधीच पैसे आल्यामुळे बहिणी आनंद व्यक्त करत आहेत.

जळगाव मधील ज्या महिलांना 3 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, काही बहिणींना प्रतिनिधीक विचारले असता, सौ सुनिता दिलीप चांदेलकर म्हणाल्या, 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला, आमच्या मुलाच्या शिक्षणा करता तुम्ही 3000/-रुपये दिल्या बदल मी तुमची आभारी आहे' तर सौ. वंदना विनोद आवारे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला. रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्ही ओवाळणी म्हणून  ३०००/- रुपये बहिणीला दिले, खुप आनंद वाटला.

श्रीमती मोनिका महाजन या आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाल्या, आम्हाला वाटले नव्हते एवढ्या लवकर पैसे मिळतील. पैसे आल्याचा मेसेज बघून आनंद वाटला. सुनिता धनगर या अंगणवाडी मदतनीस आहेत, त्या म्हणाल्या,  मला तर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाच, पण आम्ही ज्या महिलांचे फॉर्म भरून घेतले त्या महिला पैसे जमा झाल्याचे फोन  करून आनंद व्यक्त करत आहेत.

जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी 5 लाख 33 हजार 791 एवढे अर्ज आले आहेत. तालुकानिहाय अर्ज पुढील प्रमाणे आणि कंसात पात्र झालेल्या लाभार्थी बहिणींची टक्केवारी आहे.

जळगाव-79,350 (97.11), जामनेर- 52,071 (98.72), चाळीसगाव- 51,308 (98.41), रावेर-46,386  (98.57), पाचोरा- 40,165 (97.23), चोपडा- 38,244 (97.21), भुसावळ-36,350 (98.01), अमळनेर- 33,921 (99.29), यावल- 33,482 (98.02), पारोळा- 24,927 (97.59), मुक्ताईनगर- 23,237 (98.04), भडगाव- 20,681 (96.71), एरंडोल- 20,148 (96.19), धरणगाव- 19,853 (99.14), बोदवड- 13,668 (98.71)  आधार सिडींग जोडणीचे काम सुरु आहे. हा लाभार्थी बहिणींचा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाने दिली.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment