Friday, 19 May 2017

तालुक्यातील विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द् : आमदार उन्मेश पाटील


तालुक्यातील विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द्
                                     : आमदार उन्मेश पाटील

चाळीसगाव दि. 19 मे (उमाका वृत्तसेवा) : बसस्थानकातील चिखल तुडवित प्रवासास सुरूवात करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांच्या भावना विचारात घेऊन चाळीसगाव बसस्थानाकाचे नुतनीकरणासाठी दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करतांना मनस्वी आनंद होत आहे, तसेच तालुक्यातील प्रत्येक विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी आज केले.
            चाळीसगाव बसस्थानाचे नुतनीकरणासह काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून भरीव निधी व मंजूरी प्राप्त झाल्याने आज या विकास कामांचे भुमीपूजन आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रिडा सभापती पोपट भोळे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, परिवहन विभागाचे विभागीय स्थापत्य अभियंता श्री.चव्हाण, आगार प्रमुख सागर झोडगे, आनन खरात, शेखर बजाज, बाबा चंद्रात्रे, सरदारशेठ राजपूत, सुनिल साहेबराव पाटील, ॲड.सोनवणे, मानसिंग राजपूत, अरुण अहिरे, नानाभाऊ कुमावत आदि मान्यवरांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना आमदार श्री.पाटील म्हणाले, विकासकामांसाठी दळणवळणाची उपलब्धी आवश्यक असते, त्याअनुषंगाने तालुक्यातील रस्ते विकास साधतांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो वा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राज्यासह केंद्रशासनाकडून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करुन तालुक्यातील रस्ते विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगतांना आमदार श्री.पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यातील 136 गावांचा नियमीत संपर्कात येणाऱ्या चाळीसगाव बसस्थानाच्या नुतनीकरणामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण जनतेस मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. नियमीत शैक्षणिक कामासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक सवलतीचे पासेस मिळण्यासाठी ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांमध्ये मासिक सवलती पासेस सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, तसेच तालुक्यातून लांब पल्ल्यांच्या काही बसेस सुरु केल्यास नागरिकांसाठी सोईचे होऊन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल. या प्रमाणेच अजून काही प्रस्ताव परिवहन महामंडळाला आमदार श्री. पाटील यांनी सादर केले असून त्यांची पूर्तता करण्याच्या सुचनाही त्यांनी उपस्थित परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आमदार श्री.पाटील यांनी प्रसार माध्यमांकडून होणाऱ्या टिकाटिपणीमुळे दुर्लक्षीत विकास कामे निदर्शनास आणून दिल्याबद्दल सर्व प्रसार माध्यमांचेही विशेष आभार मानले.
            प्रास्ताविकात परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर म्हणाल्या चाळीसगाव बसस्थानक व आगाराच्या एकूण 1 हेक्टर 53 आर क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये मुख्य बसस्थानाकाच्या नुतनीकरणासाठी 53.39 लक्ष तर वाहनतळासह इतर कामांसाठी 35.69 लक्ष निधीचे वितरण करण्यात येणार आहे. बसस्थानकात 11 बसेससाठी फलाट, एक नियंत्रण कक्ष, एक बसस्थानक प्रमुख कक्ष, एक एटीएस रूम व एक पार्सल रुमचा समावेश करण्यात येणार आहे.  बस स्थानकाच्या कामात बसस्थानकातील फलाटाची उंची वाढविणे, तळाला कोटासह आधुनिक पध्दतीचे फ्लोरींग बसविणे,  ग्रॅनाईट बँचेस, ॲल्युमिनियम विंन्डोज, बसस्थानकास रंगरंगोटीसह संपुर्ण काँक्रिटीकरण, स्वतंत्र नियंत्रण कक्ष इ.चा समावेश राहणार आहे. तसेच पार्कींग एरियाचे काँक्रिटीकरणासह ड्रेनेज लाईनची स्वतंत्र व्यवस्थाही यातुन उभारण्यात येणार असल्याचे श्रीमती खिरवाडकर यावेळी म्हणाल्या.
            यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, विश्वास चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून चाळीसगाव बसस्थानकाच्या नुतनीकरणाच्या वचनपूर्तीच्या अनुषंगाने आमदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले.                                                    

* * * * * * * *

No comments:

Post a Comment