Monday, 17 April 2017

मुद्रा लोनसह कॅशलेस व्यवहाराच्या प्रचार प्रसिध्दीसाठी मेळाव्याचे आयोजन : प्रातांधिकारी शरद पवार

मुद्रा लोनसह कॅशलेस व्यवहाराच्या
प्रचार प्रसिध्दीसाठी मेळाव्याचे आयोजन
                                                                                      :प्रातांधिकारी शरद पवार

       चाळीसगाव,दि.17(उमाका वृत्तसेवा):  मुद्रा लोन योजना ही सामान्य नागरिकांना आपले लहान मोठे उद्योग सुरु करण्यासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना आहे. याव्दारे अर्थसहाय्य प्राप्त करुन आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा लोन योजना व कॅशलेस व्यवहाराबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा लोकसभा सदस्य खा.ए.टी.पाटील व विधानसभा सदस्य आ.उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 19 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पंचयात समितीच्या सभापती स्मितल बोरसे व नगराध्यक्षा आशालता चव्हाण याही उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यात तालुक्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
            या मेळाव्याच्या अनुषंगाने आज तहसिल कार्यालयात तालुक्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसिलदार कैलास देवरे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, ज्ञानेश्वर अमृतकर व विविध बँकांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुद्रालोन लाभधारकांची यादी, आजतागायत वितरीत करण्यात आलेल्या मुद्रा लोनची माहिती, प्रतिक्षेतील मुद्रालोन अर्जदारांचा आढावाही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी घेतला.
            चाळीसगावात आयोजित केलेल्या या मेळाव्यात होतकरु, बेरोजगार आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांमध्ये उद्योजकतेचा विकास होण्यासाठी व त्या करिता मुद्रा बँक योजनेव्दारे त्यांना कर्ज मिळविणेकामी मार्गदर्शन तसेच सर्व सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कॅशलेस व्यवहार जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरिता उद्योजक, बँक व सामाजिक संस्था यांच्याकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.          
                         

* * * * * * * *

No comments:

Post a Comment